Next
लान्स क्लुसनरची खणखणीत कामगिरी
सतीश स. कुलकर्णी
Friday, May 03 | 03:00 PM
15 0 0
Share this story

बाराव्या विश्वचषकस्पर्धेला ३० मेपासून सुरुवात होत असून क्रिकेटची पंढरी असलेल्या इंग्लंडमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. या निमित्ताने विश्वचषकस्पर्धेतील काही घटना, प्रसंग, गमतीजमती आणि खेळाडूंच्या पैलूंवर प्रकाश टाकणारी ही लेखमालिका.

निर्णायक क्षणी गळपटणारा, मोक्याच्या क्षणी दम कोंडणारा म्हणजे ‘चोकर.’ दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हे लेबल लागलं १९९९च्या विश्वचषकस्पर्धेत! ऑस्ट्रेलियाविरुद्धचा उपांत्य सामना जिंकता जिंकता बरोबरीत सुटला आणि अंतिम सामना खेळण्याचं स्वप्न उद्ध्वस्त झालं. ते हताशपणे पाहण्याची वेळ आली त्यावेळी मैदानात असलेल्या लान्स क्लुसनर याच्यावर! प्रामुख्यानं त्याच्याच अष्टपैलू खेळामुळे त्याच्या संघानं इथवर झेप घेतली होती. परंतु निर्णायक क्षणी संघानं कच खाल्ली, तेव्हा तोच तिथे होता. त्या अपयशाचं माप त्याच्या पदरात पुरेपूर घालण्यात आलं. नायक तो आणि काही प्रमाणात खलनायकही तोच!
इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, वेल्स आणि द नेदरलँड्स यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा १४ मे ते २० जून दरम्यान झाली. डझनभर देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतूनच बांगलादेश व स्कॉटलंड यांचं पदार्पण झालं. स्पर्धेचं स्वरूपही काहीसं बदललं. दोन गट, त्यात साखळी सामने आणि प्रत्येक गटातील पहिले तीन संघ ‘सुपर सिक्स’मध्ये. त्यातील पहिले चार संघ उपांत्य फेरीत असं स्वरूप असलेल्या स्पर्धेत एकूण ४२ सामने झाले. पांढऱ्या ड्युक चेंडूचा वापर, बरोबरीत सुटलेला पहिलाच सामना, नवा विश्वविजेता देण्याची चार स्पर्धांची खंडित झालेली परंपरा, गट साखळीतील गुण ‘सुपर सिक्स’मध्ये पुढे नेण्याची पद्धत (पॉइंट्स कॅरी फॉरवर्ड), ‘अ’ गटात झिम्बाब्वेचे बलाढ्य भारत व दक्षिण आफ्रिका संघांविरुद्ध विजय, ही काही या स्पर्धेची वैशिष्ट्यं.
लान्स क्लुसनर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याची अष्टपैलू कामगिरी तेवढी खणखणीत होतीच मुळी. ‘अ’ गटातील साखळी सामन्यांमध्ये क्लुसनरच्या खेळानंच संघाला पराभवाच्या उंबरठ्यावरून विजयाच्या महाद्वाराकडे नेलं. मधल्या फळीत खाली येणाऱ्या या डावखुऱ्या फलंदाजानं अफलातून खेळ केला. तो पहिल्यांदा बाद झाला ते ‘सुपर सिक्स’मधील न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत. गेविन लार्सननं त्रिफळा उडवून त्याला बाद करता येतं, हे दाखवून दिलं. चौथा किंवा पाचवा गोलंदाज म्हणून क्लुसनरच्या हाती कर्णधार चेंडू द्यायचा. अवघड होऊ पाहणाऱ्या भागीदाऱ्या त्याच्या उजव्या हाती मध्यमगती गोलंदाजीनं मोडून संघाला दिलासा दिला. सलग तीन वेळा आणि एकूण चारदा तो सामन्याचा मानकरी ठरला. फलंदाजीच्या सरासरीत तो अव्वल ठरला. संघाचे प्रमुख गोलंदाज अॅलन डोनाल्ड व शॉन पोलॉक यांच्यापेक्षा जास्त बळी त्याच्या खात्यावर होते.
क्लुसनरच्या खेळाची झलक गटातील पहिल्याच सामन्यात भारताविरुद्ध दिसली. चौथा गोलंदाज म्हणून चेंडू हातात पडल्यावर त्यानं सचिन तेंडुलकर, अर्धशतकवीर राहुल द्रविड व कर्णधार महंमद अझरुद्दीन यांचे बळी मिळवले. आठव्या क्रमांकावर येऊन त्यानं चार चेंडूंमध्ये नाबाद १२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेनं हा सामना चार गडी राखून जिंकला. विश्वविजेत्या श्रीलंकेवर मिळवलेल्या ८९ धावांच्या विजयाचा मानकरी लान्स ठरला. त्यानं नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४५ चेंडूंमध्ये नाबाद ५२ (पाच चौकार व दोन षटकार) करत नवव्या व दहाव्या जोडीसाठी तब्बल ७७ धावांची भर घातली. मग उपुल चंदना, चमिंडा वास व प्रमोदया विक्रमसिंघे यांना बाद केलं ते फक्त २१ धावांचं मोल देऊन. सामन्याचा मानकरी स्वाभाविकपणे तोच ठरला.
पुढच्या दोन्ही सामन्यांवर छाप होती क्लुसनरचीच. यजमान इंग्लंडवर १२२ धावांनी मिळवलेल्या दणदणीत विजयात त्याच्या ४० चेंडूंतील ४८ धावांच्या (तीन चौकार व एक षटकार) नाबाद खेळीचं महत्त्व मोठं होतं. गोलंदाजी करताना सहा षटकांमध्ये फक्त १६ धावा देऊन एक गडी बाद केला. केनियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेनं सात गडी व नऊ षटकं राखून विजय मिळवला. सलामीवीरांनी ६६ धावांची भागीदारी करूनही केनियाला १५२ धावांपर्यंतच मजल मारता आली. क्लुसनरनं साडेआठ षटकांत फक्त २१ धावा मोजून टिकोलो, ओडुम्बे यांच्यासह पाच फलंदाजांचे बळी मिळवले. शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला झिम्बाब्वेनं हरवलं. त्यांनी ठेवलेल्या २३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लान्सच्या संघाची अवस्था सात बाद १०६ होती. क्लुसनरनं (५८ चेंडू, नाबाद ५२, ३ चौकार व २ षटकार) दोन महत्त्वाच्या भागीदाऱ्या केल्या. त्यामुळेच पराभवाचं अंतर खूप कमी झालं.
‘सुपर सिक्स’मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला हरवताना दक्षिण आफ्रिकेच्या मदतीला पुन्हा धावला क्लुसनरच! विजयासाठी २२१ धावा हव्या असताना त्यांची अवस्था सहा बाद १३५ होती. समोर अक्रम, शोएब अख्तर, अजहर महमूद, सकलेन मुश्ताक असे बिनीचे गोलंदाज होते. आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या क्लुसनरनं कॅलिसबरोबर सातव्या विकेटसाठी ४१ आणि नंतर बाऊचरबरोबर नाबाद ४५ धावांची भागी केली. त्याची खेळी होती ४१ चेंडू, नाबाद ४६, प्रत्येकी तीन चौकार व षटकार. डावातील ४६व्या षटकांत त्यानं शोएब अख्तरला मिडविकेटवरून षटकार खेचला आणि लगेच फाइन लेगला चौकार मारला. गोलंदाजी करताना एक बळी मिळवला आणि एका धावचीतला हातभार लावला. पुन्हा एकदा तोच सामन्याचा मानकरी ठरला. न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळूनही त्याला काही करता आलं नाही. स्पर्धेत तो पहिल्यांदाच बाद झाला, ते अवघ्या चार धावांवर. ती कसर त्यानं दोन बळी घेऊन भरून काढली. हार पत्कराव्या लागलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही क्लुसनर चमकला. त्याच्या २१ चेंडूंतील ३६ धावांमुळेच संघाला २७१ धावांची मजल मारता आली. रिकी पाँटिंगला बाद करून त्यानं शतकी भागीदारी केलेली चौथी जोडी फोडली.
उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेची गाठ पुन्हा ऑस्ट्रेलियाशी पडली. बर्मिंगहॅम इथे १७ जून रोजी झालेला व विलक्षण रंगलेला हा सामना बरोबरीत सुटला. सरस गुणांच्या आधारे कांगारूंनी अंतिम फेरी गाठली. विजयासाठी २१४ धावांचे लक्ष्य कॅलिस (५३) व जाँटी ऱ्होडस (४३) यांनी जवळ आणलं होतं. त्याचवेळी शेन वॉर्ननं (चार बळी) सामना चुरशीचा केला. आठव्या क्रमांकावर आलेल्या क्लुसनरनं (१६ चेंडूंत नाबाद ३१) संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. शेवटच्या षटकात ९ धावा हव्या होत्या. डॅमियन फ्लेमिंगच्या पहिल्या दोन चेंडूंना क्लुसनरनं सीमापार केलं. परंतु विजयासाठीची एक धाव घेताना गडबड होऊन डोनाल्ड धावचीत झाला! दक्षिण आफ्रिकेचा स्वप्नभंग! त्या सामन्याची (नकोशी) आठवण काढताना क्लुसनर म्हणतो, ‘मी अस्वस्थ होतो. उतावीळपणा दाखवायला नको होता. थोडं थांबायला हवं होतं. मात्र ही पश्चातबुद्धी झाली. कदाचित पुढचे दोन चेंडू अचूक यॉर्कर पडले असते तर... असो!’
क्लुसनरची या स्पर्धेतली कामगिरी सर्वोत्तम होती, यात संशयच नाही. एकूण नऊ सामन्यांमध्ये त्यानं सहा वेळा नाबाद राहत १४०.५च्या सरासरीनं आणि १२२.१७च्या स्ट्राइक रेटनं २८१ धावा केल्या. संघाकडून सर्वाधिक १७ बळी त्यानंच घेतले; तेही २०.५८ सरासरीनं. प्रत्येक वेळी संघाच्या हाकेला ओ देऊन निर्णायक खेळ क्लुसनरनं केला. त्यामुळेच तो सर्वोत्तम ठरला.

अंतिम सामन्यात वॉर्नची जादू!
लॉर्ड्सच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात २० जून रोजी झालेला अंतिम सामना एकतर्फीच ठरला. शेन वॉर्नच्या जादूई फिरकीमुळे पाकिस्तानचा डाव १३२ धावांतच आटोपला. वॉर्ननं फक्त ३३ धावा देऊन एजाज अहमद, शाहिद आफ्रिदी, मोईन खान व वसिम अक्रम यांचे बळी मिळवले. तोच सामन्याचा
मानकरी ठरला. ऑस्ट्रेलियानं २० षटकं आणि पाच चेंडूंमध्ये फक्त तीन गडी गमावून दुसऱ्यांदा विश्वचषक पटकावला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link