Next
मिस यू मित्रा रमेश..!
अशोक समेळ
Friday, February 08 | 03:45 PM
15 0 0
Share this storyत्याची-माझी पहिली भेट झाली ती १९७७ साली दादरच्या अॅन्टोनिया डिसिल्व्हा हायस्कूलच्या वर्गात. मी नोकरी सांभाळून राज्य नाट्यस्पर्धेच्या एका नाटकात काम करत होतो. माझ्यासमोर माझ्या एवढीच महत्त्वाची भूमिका जुईली देऊस्कर करत होती. ती मूळची पुण्याची होती. तिला भेटायला एके संध्याकाळी एक उंच, उत्तम व्यक्तिमत्त्व लाभलेला, देखणा, काळासावळा असा तरुण अत्यंत आकर्षक हास्य करत आला. त्याला पाहून आमच्या तालमीच्या वर्गात एक आदरयुक्त असा दरारा निर्माण झाला आणि तालमीत असलेले, अगदी दिग्दर्शकापासून सगळेच एका सुरात ओरडले, ‘रमेश.’ मी त्याला प्रथमच पाहत होतो. एवढ्यात सर्वांशी प्रेमानं हात मिळवत तो माझ्याकडे आला आणि कृष्णवर्णीय चेहऱ्यातून मोहक हास्य करून म्हणाला, ‘हॅलो, मी रमेश भाटकर’ आणि ही त्याची पहिली भेट माझ्या हृदयात कायमची रुतून बसली जिवलग मित्राच्या नात्यानं.

कोण हा रमेश भाटकर हा विचार त्या काळी  माझ्या मनात पिंगा घालू लागला. ज्याच्या अस्तित्वानं सबंध वातावरण उजळून गेलं तो कोण हा रमेश भाटकर? रमेश तेव्हा पुण्याला राहायचा आणि टेल्को कंपनीत सामान्य कामगार होता तेव्हा त्याचा नाटकाशी सुतराम संबंध नव्हता. देखणा दिसतो म्हणून टेल्को कंपनीच्या एका एकांकिकेत त्याला एक रोल दिला. तो त्यानं उत्तम केला; म्हणून पुढे ‘पुरुषोत्तम करंडक’ या पुण्याच्या प्रतिष्ठित एकांकिकास्पर्धेत त्यानं काम केलं आणि चक्क बक्षीस मिळवलं. रमेशचं नाव पुण्यातल्या नाट्यवर्तुळात झळकलं. रमेशच्या रक्तात हे गुण होतेच. कारण त्याचे वडील स्नेहल भाटकर उर्फ अण्णा. ते हिंदी,मराठीतील प्रसिद्ध संगीतकार. गाण्याला लागणारे आरोह, अवरोह, एक्स्प्रेशन हे नाटकासाठीही गरजेचे असतात. रमेशमध्ये ते नकळत उतरले. पुढे आमचे पुण्याचे एक त्या काळातले सुप्रसिद्ध नाट्यसमीक्षक पंडित माणके यांनी प्रभाकर पणशीकरांना रमेश भाटकर हे नाव ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील प्रमुख भूमिका ‘लाल्या’साठी सुचवलं. पंतांनी (पणशीकरांनी) त्याला ऑडिशनसाठी बोलावलं तेव्हा हा सुटाबुटात गेला. (पंत ही गोष्ट आणि रमेशही मला नेहमीच हसत सांगायचे.)

रमेशची निवड ‘लाल्या’साठी झाली आणि टेल्कोचा एक फिटर स्टार झाला. त्यानं नोकरी सोडली नाही, रात्री पॅसेंजर गाडीनं धक्के खात तो नोकरी सांभाळून नाटक करत होता. नाट्यसंपदेला लाल्याची (डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांची) उणीव भासली नाही, ना प्रेक्षकांना! त्यानंतर रमेश खऱ्या अर्थानं जगला तो लाल्या म्हणून. यात डॉ. घाणेकरांचाही मोठा वाटा आहे. रमेश लाल्या करतो म्हटल्यावर त्यांनी ‘लाल्या’ची सगळी अस्त्रं रमेशला शिकवली आणि समृद्ध केलं. हा रमेशच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइन्ट! याच लाल्यामुळे त्याला पुढे अनेक चित्रपट, नाटकं, मालिका मिळाल्या. त्यानं ते सगळं केलं आणि तो खऱ्या अर्थानं मराठीचा सुपरस्टार झाला.

माझी पणशीकरांची १९७५ पासून ओळख. ‘पुत्रकामेष्टी’ (१९८०) या नाटकात त्यांनी मला एक महत्त्वाचा रोल दिला. या नाटकाचा पुण्यातील प्रयोग असताना रमेश तिथल्या प्रयोगाला आला. ती आमची दुसरी भेट होती तरी देखील त्यानं मला प्रेमानं मिठी मारली, त्याची ही खासियत होती; ज्याला मित्र मानला त्याच्या चांगल्यावाईट गुणांसह त्याला तो नेहमीच साथ देत आला. रमेशनं नाटकासंदर्भात मला सकारात्मक सूचना केल्या आणि प्रयोग संपल्यावर माझं कौतुक करून गेला. त्यानंतर तो मला भेटला तो १९८२ साली. त्यावेळी  ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकात ‘शंभूमहादेव’ ही भूमिका नटवर्य चित्तरंजन कोल्हटकर करायचे परंतु त्यांना झालेल्या अपघातामुळे ते काम करू शकणार नव्हते. तेव्हा ही भूमिका निर्माते पणशीकर यांनी मला दिली. तेव्हा पहिल्यांदा डॉ. घाणेकरांबरोबर काम केलं होतं. नंतर २००२ पर्यंत रमेशबरोबर १,१११ प्रयोग होईपर्यंत काम केलं. (रमेशनं ७०० प्रयोग केले असतील मी ५५०/६०० प्रयोग केले.) त्यावेळी दौरे १०-२० दिवसांचे असायचे. यातील अनुभवांवर, किश्शांवर एक कादंबरी होईल. रमेशच्या प्रसिद्धीची काही उदाहरणं सांगतो... साताऱ्याला प्रयोग असताना दुसऱ्या दिवशी आम्ही मुंबईला निघणार म्हणून मुलांसाठी मिठाई घ्यायला निघालो. एवढ्यात मॉबमधून कुणीतरी ओरडलं, रमेश भाटकर! आणि एवढी गर्दी जमली की सर्व ट्रॅफिक जाम. पोलिस शिट्या वाजवतच होते. कसंबसं थिएटरला पोचलो. हीच गोष्ट त्याच्या ‘कमांडर’ मालिकेची, ‘माहेरची साडी’ या चित्रपटाची. त्याला प्रसिद्धी विलक्षण होती. हे वलय त्यानं स्वत:च्या देखणेपणावर, अभिनयावर कमावलं होतं. अभिनय ही गोष्ट तो विलक्षण गंभीरपणे घ्यायचा. त्यात नाटक हा त्याचा प्राण होता. दौऱ्यात मी त्याला कुसुमाग्रजांची कविता शिकवली, ‘पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा.’ मी जशी शिकवली तशीच त्यानं पाठ केली आणि चिपळूणच्या नाट्यसंमेलनात म्हटली. लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं, पण त्यानं त्याची सुटका करून पहिला फोन केला तो मला आणि जोरात ओरडत म्हणाला, “गुरू, जिंकलो रे. मी कविता म्हटली. क्रेडिट गोज टू यू...!” असा दिलदार रमेश, मोठा नट, मोठा माणूस आणि तरीही स्वत:चं बालपण जपणारा एक कुटुंबवत्सल माणूस! जमिनीवरच राहणारा.

२००२ साली रमेश माझ्या संस्थेच्या केशव मनोहर लेले या नाटकात माझा मुलगा संग्रामबरोबर काम करत होता. रंगीत तालमीला मी लंच ब्रेक केला तेव्हा रमेश आणि संग्राम जेवत नव्हते. मी कारण विचारलं तेव्हा त्यांना त्यांचा रोल सापडत नाही म्हणून ते गंभीर होते. मी त्यांना रिलॅक्स केलं, जेवलो आणि अर्धा तास त्या दोघांना देऊन त्यांच्या भूमिका लेखक आणि दिग्दर्शक म्हणून समजावल्या. आणि त्यानंतर  या दोघांनी चमत्कार केला, तो केवळ अप्रतिम! डोळ्यांत पाणी आणून रमेश भाटकर नावाचा कलंदर अभिनेता मला एवढंच म्हणाला, ‘थँक्यू यू अशक्या…’ ‘अशक्या’ ही त्याची लाडिक हाक होती. पुढे त्यानं माझ्या ‘खलनायक’, ‘परपुरुष’ या नाटकांत भूमिका केल्या. मुलुंडला झालेल्या नाट्यसंमेलनात ‘अश्रूंची झाली फुले’ करुया. त्यात तू पंताचा विद्यानंद कर असा आग्रह केला. परंतु त्याला प्रकृती साथ देत नसल्यानं त्यानं नकार दिला.

आज रमेश आपल्यात नाही. तो जाण्याआधी दोन दिवस मी आणि पत्नी त्याला भेटायला एलिझाबेथ रुग्णालयात गेलो होतो. दार उघडलं. रमेश एखाद्या तपस्व्यासारखा बसला होता. हसून हात केला, तो निरोपाचा होता याची पुसटशी कल्पना नव्हती. असाच हात पुण्यात पणशीकरांनी केला होता. ‘येतो रे मित्रा…’ ४ फेब्रुवारीला रमेश हे जग सोडून गेला. त्याच्या अंत्यविधीसाठी रात्री जमलो होतो. रमेशचे पार्थिव उचलण्याआधी त्याची पत्नी मृदुला त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवून काही बोलली... स्वत:शीच... ते पाहून मी प्रथमच रडलो. मृदुला शांत होती. गेलं वर्षभर रमेशच्या बरोबरीनं तिनं आणि मुलगा हर्षु व सुनेनं या लोभस माणसाचं सगळं अस्तित्व आपल्यात आचरणात सामावून घेतलं होतं. या सर्वांना साष्टांग दंडवत! मिस यू मित्रा रमेश…!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link