Next
अनुदिनी अर्थात दिसामाजि काहीतरी...
चंद्रशेखर कुलकर्णी
Friday, December 28 | 04:00 PM
15 0 0
Share this storyडायरीची एक खासियत आहे. सालाबादाप्रमाणे दरवर्षी निदान एक तरी संकल्प सोडण्याचं बळ ती आपल्याला देते. गेला बाजार, वर्षाकाठी एक तरी संकल्प सोडल्याचं पुण्य चित्रगुप्तकडल्या आपल्या खतावणीत जमा होतं. म्हणून तर वर्षभर भितीवरच्या बारक्याशा चुकेवर विनातक्रार लटकून राहिलेलं कॅलेंडर मोडीत काढायची वेळ आली, की भल्याभल्यांना नव्या वर्षाच्या कॅलेंडरचे आणि डायरीचे वेध लागतात. यंदा डायरी लिहायचीच, असा संकल्प एकदाही न सोडलेला साक्षर शोधून सापडणार नाही. कविमनाच्या मंडळींच्या मते हा तर अलिखित संकल्प असतो. चांगदेवांसारखी अदृश्य लिखापटीच करायची तर निरक्षरांनीही या डायरीत दिसामाजि काहीतरी लिहिण्याचा संकल्प केलाच तर त्याची गणना उगाच बंडखोरी वगैरे सदरात का करायची?

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेकांची पावलं लडखडतात म्हणे! पायांचं सोडा हो, हातही अडखळतात त्याचं काय? कॅलेंडर बदललं की पहिल्याच दिवशी अनुदिनी काहीतरी लिहिण्याच्या उर्मीनं कागदावर पेन टेकवलं की आपला हात अडखळतो. व्रात्य मंडळी याचा उगाचच काही अर्थ लावतात. प्रत्यक्षात थर्टीफर्स्टचा हँगओव्हर अन् हाताच्या अशा लडखडण्याचा काही परस्पर संबंध नसतो. वर्षभर जे साल लिहायची हाताला सवय लागलेली असते. ती एका रात्रीत बदलायची वेळ आली की दुसरं काय होणार? पुरावा हवा असेल तर शाळकरी पोराटारांच्या वह्या काढून बघा. जानेवारी महिन्यात तारखेपुढे साल लिहिताना पहिले काही दिवस खाडाखोडा दिसायलाच हवी!

असो. तर, डायरी लिहिण्याच्या संकल्पाचं एक बरं असतं. हा निभावण्याचा नव्हे तर, तर सोडून द्यायचा संकल्प असतो. इंडिया डिजिटल होऊ लागल्यावर डायऱ्यांची सद्दी तशी रोडावलीय. तरीही डिसेंबरमधल्या शेकोटीवर शेकलेल्या संकल्पापासून त्याची होळीच्या ज्वाळांमध्ये आहुती पडेपर्यंत डायरी नामक चीजवस्तूचं मार्केट बऱ्यापैकी तेजीत असतंच की! बांधणी, मांडणी नि आकर्षक छपाईवर कोट्यवधी रुपये खर्ची पडतात. हा सारा बाजार पाहिला, की आपल्यासारख्या सामान्यजनांना एक भाबडा प्रश्न छळायला लागतो. या डायऱ्या विकत घेतं तरी कोण? प्रचंड मोठ्ठं ‘मेक इन इंडिया’ किंवा नेशन बिल्डिंग वा तसलंच काहीसं भव्य दिव्य कार्य करणाऱ्या कंपन्या सालाबाद डायऱ्या प्रकाशित करून साधतात तरी काय? त्याचवेळी सुलेखनकार अच्युत पालवच्या प्रतिभेतून साकारलेल्या रामदास डायरीचं अप्रुप संपूर्णसिंह कालरा या गुलजार प्रज्ञावंतालाही वाटलंच की! बाकी तुमच्या आमच्यासाठी आधुनिक लिपीतील डायरीदेखील ‘मोडी’त निघालेलीच चीजवस्तू!

तसं पाहिलं तर एक रामदास डायरी सोडली तर डायरी विकत घेऊन अक्षरश: अनुदिनी ती पानोपानी लिहिणारे जीवनासक्त लोक कुठे सापडतील हो, हा आपल्यासाठी न सुटलेला प्रश्न. तशात आरंभशूरांचं मन आणि डायरी यांचे गुण पत्रिकेनुसारही जुळत नाहीत. तिच्यातली पानं आपल्या संकल्पसिद्धीच्या संदर्भात कायम वक्रच असतात. एखाद्यानं नवसासायानं संकल्प सोडावा, तर त्यात हमखास विघ्नं येतात. आपल्याला हवी असते फुलपेजची डायरी, पण नेमकी कुणीतरी प्रेमानं पाठवलेली डायरी निघते हाफपेजची! सरते शेवटी वाडवडिलांचा कित्ता गिरवायला आपणही रामदास डायरी नेमानं लिहायची परंपरा सुरू ठेवावी, असा बोध घेऊन मना सज्जनाला शिस्तीत हाकू पाहावं तोवर तिची कापडी बांधणीची आवृत्ती संपलेली असते. पिनकोड आणि एसटीच्या कोडच्या तपशिलांसह बाळगायला बरी म्हणून सरकारी डायरीची आस धरावी तर त्याच वर्षी फायनान्स डिपार्टमेंटनं बडगा उगारून वासरी वाटपाची वासलात लावलेली असते. काही उंची ब्रॅण्डच्या कंपन्या तुमचं नावही डायरीवर अगदी सुवर्णाक्षरांत कोरून देतात. पण अशा सुंदर, आकर्षक, रुबाबदार, झुळझुळीत कागदांवर रोजच्या रोज दहा रुपड्यांचं पेन टेकवायला लागणारा बडा कलेजा आपल्याकडे असतोच कुठे?

कॅलेंडरांचं सुळावर चढणंही तसं निरर्थकच. पुढल्या दर्शनी भागावरच्या लाल रंगातल्या तारखा तेवढ्या कामाच्या, म्हणजे बिनकामाच्या! बाकी सारा आकड्यांचा खेळ. नाही म्हणायला, हल्ली त्यांचा पाठपोट भाग अधिक उपयुक्त मानतात. सौंदर्याच्या टिप्सपासून रेल्वेच्या वेळापत्रकापर्यंत खूप काही पाठीवर वागवण्याची कॅलेंडरांनाही सवय झालीय. बरं अनेकांना मनापासून भावणारं कॅलेंडर घरात टांगायची सोय नसते. म्हणून तर डिसेंबरमध्ये परागंदा झालेल्या एका मद्यसम्राटाची किती अमाप आठवण निघाली! असो.

कॅलेंडरांपेक्षा डायऱ्यांची मिरास थोडी अधिकच. म्हणूनच तर इतिहास संशोधनाच्या साधनांमध्ये ‘डायरी’ला स्थान मिळालं. खुनापासून हवालापर्यंत अनेक प्रकरणांत डायरीतल्या आद्याक्षरांवर सीबीआयनं भिस्त ठेवली होती. तरी बरं आपल्या मध्यमवर्गीय छोटेखानी नोंदी सरकारी यंत्रणांसाठी निरर्थक असतात. सौ.स मोप (मोलकरणीचा पगार) १५०० रुपये, देवदर्शन २० रुपये. असल्या काही नोंदी. अन्यथा संध्याकाळी एक फेरी गाडगीळांकडे. छातीत कसंसंच वाटलं. असे वारंवार का व्हावं? आताशा गुडघेही दुखतात असा थेट मेडिकल केस पेपर. तरीही बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये खुफिया नोंदी असलेली डायरी पटकथेतून प्रेक्षकांचा ‘पाठलाग’ करत राहिलीच की! तात्पर्य इतकंच, की आपल्यासारख्यांनी डायऱ्या लिहू नयेत, हेच बरं. अर्थात चोरून इतरांच्या डायऱ्या वाचण्याचा बाऊ ठेवू नये. फरक पडतो, तो तपशिलाचा. शीलाचा नव्हे!

कांदे, बटाटे, दूधवाला, पेपरवाला, इस्त्रीवाल्याची दांडी वगैरे नोंदीत गुरफटणाऱ्यांच्या डायऱ्या तशा निरर्थकच. पण असामान्यांच्या डायऱ्यांना साहित्यमूल्य मिळून जातंच की! अॅन फ्रॅन्कची डायरी ते डायरी ऑफ अॅन अननोन सोल्जर यासारख्या अनेक डायऱ्यांनी अक्षर वाङ्मयात मोलाची भर टाकली. कलंदर लेखणीनं सुबुद्धांना वेड लावणाऱ्या हेन्री मिलर, बर्ट्रांड रसेल किंवा सर विन्स्टन चर्चिल यांच्या दैनंदिन्यांनी सर्जनशीलतेला नवं खत घातलं. मराठीतही ही सृजनशीलता अधूनमधून डोकावत राहिली. साठोत्तरी मराठी साहित्यात शन्नांची ‘दिवसेंदिवस’ रसिकांचं मन काबीज करून गेली. ‘कोसला’तल्या पांडुरंग सांगवीकरची इवलीशी डायरी मनाचा सोलीव कंद थेट पारावर घेऊन आली. आपण काही मिलर नाही, की शन्ना नाही. म्हणूनच काहीतरी लिहायला जमत नसेल तर निदान काहीबाही वा काहीतरीच लिहिण्याच्या भानगडीत आपण पडू नये, हेच श्रेयस्कर!

मराठी रंगभूमीनं अनुभवल्यानुसार वाटेल ते टिपून ठेवल्यानं आपली डायरी विनोदाचं गीतारहस्य होऊ द्यायची नसेल तर एकच ध्यानात ठेवायच... तुझे आहे, तुजपाशीच ठेव!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link