Next
औषधनिर्यातमाफिया पुन्हा सक्रिय
विशेष प्रतिनिधी
Tuesday, July 02 | 05:30 PM
15 0 0
Share this story


अमेरिकेत केवळ प्रीस्क्रिप्शनवरच मिळू शकणारी औषधे बेकायदा मार्गाने निर्यात करण्याचे माफियांचे षड्यंत्र पुन्हा सुरू झाले असल्याचे नागपूरच्या एका व्यापाऱ्यास झेक रिपब्लिकमध्ये अमेरिकेच्या एफबीआयने केलेल्या अटकेवरून उघड झाले आहे. भारतातून होणाऱ्या कोट्यवधींच्या अधिकृत औषधविक्रीला बट्टा लावणाऱ्या औषधतस्करीमध्ये अंडरवर्ल्डचा मोठा शिरकाव असून पाच वर्षांपूर्वी ज्यांचे कंबरडे महाराष्ट्र-एफडीएने पुढाकार घेऊन मोडले होते, त्या व्यापारी टोळ्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे, असे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) माजी आयुक्त महेश झगडे यांनी सांगितले. 

नागपूरचा औषधनिर्यातदार जितेंद्र बेलानी यास अमेरिकेच्या एफबीआयने झेक रिपब्लिकची राजधानी प्रागमध्ये सापळा रचून अटक केल्यावर आता एफबीआयने आणखीही काही भारतीय औषधव्यापाऱ्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनात कारवायांचा धडाका लावणारे अधिकारी महेश झगडे यांनी ‘झी मराठी दिशा’ला औषधव्यापारातील या अंडरवर्ल्डवर आधारित कार्यपद्धतीची माहिती दिली. त्यांनी सांगितले, भारतातून अमेरिकेत १ लाख २० हजार कोटी रुपयांची औषधे निर्यात होतात. अमेरिकेच्या जेनेरिक बाजारपेठेपैकी ४० टक्के वाटा भारतीय औषधांचा असतो. या निर्यातीसाठी काटेकोर नियम आहेत. निर्यात होणाऱ्या औषधांच्या फॉर्म्युलास अमेरिकन एफडीएकडून मान्यता घ्यावी लागते. इथल्या कारखान्यांनाही ते मान्यता देतात. युरोपात जाणाऱ्या औषधांसाठी एमएचआरई ही वेगळी यंत्रणा आहे. ही सर्व औषधे जागतिक आरोग्य संघटनेच्या उत्पादन मानांकनाप्रमाणे तयार केली जावीत, यासाठी WHO-GMP ही नियमावली ठरवण्यात आली असून त्याचे प्रमाणपत्र राज्यस्तरावरील एफडीएकडून औषधनिर्माते मिळवतात. दर्जानियंत्रणासाठी ही व्यवस्था आहे. या कायदेशीर मार्गाव्यतिरिक्त काही जण बेकायदा मार्गांचा अवलंब करतात. बहुसंख्य देशांमध्ये कामोत्तेजक, उत्साहवर्धक किंवा निद्रेसंबंधीच्या औषधांवर कठोर निर्बंध आहेत. ही औषधे प्रीस्क्रिप्शनशिवाय मिळत नसल्याने तस्करीच्या मार्गाने ती अमेरिका, युरोपमध्ये बेकायदा पाठवली जातात. इंटरनेटवरील बेकायदा ऑनलाइन औषधविक्री वेबसाइटवरून ग्राहक त्यांची नोंदणी करतात व त्यांना ती विनासायास हाती मिळतात. ती औषधे टपालाने पाठवली जायची. याविरुद्ध इंटरपोलने ऑपरेशन पॅन्जिआ नावाची मोहीमच सुरू केली व त्याअंतर्गत अशा हजारो बेकायदा वेबसाइट बंदही करण्यात आल्या. 

भारतात काही विमानतळांवर या औषधांचे परीक्षण न करता ती पाठवण्यासाठी केंद्रीय औषधनियंत्रक, राज्य एफडीए यांचे साटेलोटे ठरलेले असायचे. यासाठी विमानतळावर परवानगीचा एक वेगळा कक्षच स्थापण्यात आला, परंतु परीक्षण न करताच औषधे पाठवली जाऊ लागली. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा हप्ता दिला जायचा. असे प्रकार होतच नाहीत, असा पवित्रा एफडीएचे अधिकारी घेत होते, मात्र हे थांबवले नाही, तर सज्जड कारवाई करावी लागेल, असा इशारा दिल्यावर या बेकायदा प्रकारांवर वचक येऊ लागला. मात्र या व्यापारात कोट्यवधी रुपयांचा पैसा असल्याने विविध स्तरांतून दबाव येऊ लागला. एक राजकीय पुढारी येऊन भेटले व हा जरा वेगळा प्रकार आहे, जपून राहा, असा सल्ला त्यांनी दिला, असे झगडे यांनी सांगितले.

हा केवळ ऑनलाइन घोटाळा किंवा औषधविक्रीचा मामला नव्हता, तर त्यात हवालामार्गे अफरातफरही होत होती. निर्यातदारास मामुली रक्कम खात्यावर यायची, बाकी हवालामार्गे रोखीत मिळायची. यासंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या उच्चपदस्थांकडूनही कारवाई रोखण्याचे प्रयत्न झाले. मुख्य सचिवांपर्यंत हे प्रकरण नेण्यात आले. आमच्या कारवाया बेकायदा ठरवण्यासाठी आघाडी उघडण्यात आली. मग हे प्रकरण न्यायालयात गेले. दरम्यान, मी केंद्रीय औषधनियंत्रकांच्या औषध सल्लागार समितीमध्येही हा विषय उपस्थित केला. त्यांनी तो गांभीर्याने घेतला. औषध महानियंत्रकांना मी पत्र लिहून याप्रकरणी ईडी, सीबीआय यांच्यामार्फत चौकशी करण्याची मागणी केली. औषध सल्लागार बैठकीत महाराष्ट्र एफडीएने केलेल्या कारवाईची प्रशंसा करण्यात आली व इतर राज्यांनीही तशी कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले. या कारवायांची दखल जागतिक स्तरावरही घेण्यात आली. मात्र आता पुन्हा हे रॅकेट कार्यान्वित झाले. मी पदावरून गेल्यानंतर या प्रकारांनी पुन्हा डोके वर काढले. या प्रकारात औषधनिर्मितीवर वचकच नसल्याने नेमकी कोणती औषधे विकली जातात, त्यावरही अंकुश नाही. त्याचा दुष्परिणाम भयानक असतो. त्यातून रुग्णाच्या जिवाला अपाय तर होऊ शकतोच, शिवाय प्रतिजैविकांना न जुमानणारे विषाणू तयार होण्यातही त्याची परिणती होते. अमली पदार्थ व नशेसाठी औषधांचा वापर होऊ शकतो. शरीरविक्रयाची रॅकेट व बेकायदा धंदे फोफावतात, याकडेही झगडे यांनी लक्ष वेधले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link