Next
अभूतपूर्व
--
Saturday, May 25 | 07:15 AM
15 0 0
Share this story

पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश अभूतपूर्व म्हणावे असेच आहे. देशातील ५० टक्के मतदारांनी यावेळी आपली मते मोदी यांच्या झोळीत टाकली व त्यांना मुक्त कारभाराची मुभा दिली. हा केवळ मोदी यांच्याच व्यक्तिमत्त्वाचा चमत्कार आहे हे मान्यच करावे लागेल. कारण हे मत एका पक्षाला, एका विचारधारेला नव्हते, तर ते एका व्यक्तीवरचा विश्वास दाखविण्यासाठी होते. सुरुवातीपासूनच ही निवडणूक मोदी यांच्याभोवती केंद्रित झाली होती. ती तशी व्हावी यासाठी मोदी यांना काहीच करावे लागले नाही. त्यांच्या विरोधात लढणाऱ्यांनीच मोदी यांना लक्ष्य करून निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणले होते. समाजमाध्यमांवर सर्वाधिक टीका, टिंगल, शिवीगाळ मोदी यांना होत होती आणि त्यामुळे सर्वाधिक पोस्टही मोदी यांच्या बाजूनेच पडत होत्या. त्यामुळे सर्व समाजमाध्यमे मोदीमय झाली होती. मोदी हे पुन्हा संसदेत दिसता कामा नयेत, अशी मोदीकेंद्रित व्हिडिओमोहीम एका पक्षप्रमुखाने चालवावी यावरून मोदी यांना या निवडणुकीत किती महत्त्व आले होते हे स्पष्ट व्हावे. आता मोदी यांना टक्कर द्यायची असेल तर त्या तोलामोलाचा प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणुकीत उतरवणे आवश्यक होते, पण तसा कोणीही उमेदवार नव्हता. उलट पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांची नावे घेतली जात होती, ती पाहून लोकांनी मोदी यांनाच निवडून देण्याचे निश्चित केलेले दिसले. एवढेच नाही तर मोदींनाच हमखास पंतप्रधानपद मिळावे यासाठी लोकांनी भरभरून त्यांना किंवा त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना मते टाकली. एका व्यक्तीवर असा विश्वास लोकांनी का टाकला याचे फार विश्लेषण करण्याची गरज नाही. मोदींनी लोकांचा विश्वास मिळावा अशी कामगिरी त्यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत केली  होती, हेच त्यामागचे कारण आहे. मोदींनी राफाल विमानव्यवहारात भ्रष्टाचार केला नाही; मोदींनी नोटाबंदी केली त्यामागे लोकांना त्रास व्हावा हा हेतू नव्हता, तर काळा पैसा नष्ट व्हावा हा हेतू होता; जीएसटीमुळे करआकारणी सुसूत्र झाली; स्वच्छतामोहीम हे ढोंग नव्हते, अशी ठाम धारणा मतदारांची झाली होती. त्यामुळेच त्यांनी पुन्हा मोदींनाच संधी द्यायचे ठरविले व त्यांच्या झोळीत भरघोस मते टाकली. लोकशाहीत एका व्यक्तीवर इतका प्रगाढ विश्वास टाकावा का हा प्रश्न वेगळा आहे, त्याची उत्तरेही परिस्थितीसापेक्ष आहेत. लोकांनी असा विश्वास इंदिरा गांधींवरही टाकला होता. जेव्हा त्यांनी विश्वासघात केला तेव्हा त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा चमत्कारही लोकांनी केला होता आणि इंदिरा गांधींना आपली चूक कळली आहे, याची खात्री पटली तेव्हा त्यांना पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर बसविले होते. त्यामुळे आताही लोकांचा मोदींवरचा हा विश्वास त्यांना त्यांचे काम नीट करता यावे यासाठी आहे. या भरघोस जनादेशाचा मोदी सदुपयोग करतील अशी लोकांना आशा आहे. मात्र तसे झाले नाही तर लोक आपला संताप कसा व्यक्त करतील हे वेगळे सांगायची गरज नाही. मोदी यांना या जनादेशाचा अर्थ कळला आहे असे त्यांनी निवडणूक विजयानंतर पक्षकार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणातून दिसले आहे. निवडणुकीच्या प्रचारातील कटुता आपण मागे टाकून व सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहोत हे त्यांनी स्पष्ट केले ते बरे झाले. मोदींना आता अधिक जबाबदारीने समाजाच्या सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करावे लागेल. आता ते एका पक्षाचे नेते नाहीत तर देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना ‘झी मराठी दिशा’च्या हार्दिक शुभेच्छा!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link