Next
इंदूरपाठोपाठ नागपुरातही नवा विजेता?
शरद कद्रेकर
Friday, February 01 | 03:00 PM
15 0 0
Share this story

यंदाच्या मोसमात मुंबई, दिल्ली, तामिळनाडू, बंगाल या माजी विजेत्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. गतवर्षी अंतिम फेरी गाठणाऱ्या दिल्लीला यंदा साखळीतच गाशा गुंडाळावा लागला. फलंदाजांनी दिल्लीला दगा दिला. मुंबईची तर यंदाच्या मोसमात वाताहत झाली. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत मुंबईची पीछेहाट झाली. तामिळनाडू, बंगाल यांची दैना उडाली. १९५०-५१ नंतर प्रथमच मुंबई, दिल्ली, तामिळनाडू, बंगाल या तथाकथित अव्वल संघांना आगेकूच करण्यात अपयश आले. याउलट विदर्भ, सौराष्ट्र, केरळ, गुजरात या एकेकाळच्या दुबळ्या संघांनी अलिकडे मात्र रणजीस्पर्धेत सातत्यपूर्ण खेळाची झलक पेश करून छाप पाडली आहे.
अंतिम फेरीत साऱ्यांच्या नजरा असतील चेतेश्वर पुजारा आणि वसीम जाफरवर. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सातत्यपूर्ण खेळ करणाऱ्या पुजाराच्या समावेशामुळे सौराष्ट्राची फलंदाजी मजबूत झाली असून त्याचे प्रत्यंतर रणजीच्या उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीत दिसून आले. लखनऊमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध १७७ धावांच्या पिछाडीनंतर सौराष्ट्राने ३७२ धावांचे विक्रमी आव्हान पार केले ते चेतेश्वर पुजारा (नाबाद ६७), शेल्डन जॅक्सन (नाबाद ७८) यांच्या नाबाद शतकी भागिदारीमुळे. त्याआधी १९ वर्षीय हार्विक देसाई-स्नेल पेटल या बिनीच्या जोडीने शतकी सलामी देत सौराष्ट्राच्या विजयाचा पाया रचला, त्यावर कळस चढवला पुजारा-जॅक्सन यांनी.
चिन्नास्वामी स्टेडियमवर याच जोडीने द्विशतकी भागी रचून यजमान कर्नाटकाचे २८० धावांचे खडतर आव्हान परतवून लावल्यामुळे सौराष्ट्राने दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. रणजीची अंतिम फेरी गाठण्याची त्यांची ही तिसरी खेप. याआधी दोनदा त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. प्रथम मुंबईत तर दुसऱ्यांदा पुण्यात, दोन्ही वेळा मुंबईने त्यांना खडे चारले आणि विजतेपदावर आपला हक्क गाजवला. तिसऱ्या प्रयत्नात उनाडकट, पुजारा, जॅक्सन प्रभृतींच्या सौराष्ट्राला यश मिळते का, हे पाहणे औत्सुत्याचे ठरेल. १९३६-३७ नवानगरने (सौराष्ट्राचा काही भाग) रणजीस्पर्धेत जेतेपद पटकावले होते, ही बाबही येथे नमूद करायला हवी.
चंदू पंडितसारखा चतुरस्र प्रशिक्षक, वसीम जाफरसारखा खडूस अनुभवी फलंदाज या विदर्भाच्या जमेच्या बाजू. या दोन बुजुर्ग मुंबईकरांमुळे यंदाही जेतेपद आपल्याकडेच राखण्याच्या विदर्भाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पुजारा, उनाडकट यांच्या खेळाची चंदूसारख्या चलाख प्रशिक्षकाला निश्चितच जाणकारी आहे. ४० वर्षीय वसीम जाफरच्या धावांची भूक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यंदाच्या मोसमात जाफरने १००० धावांचा टप्पा ओलांडताना एका द्विशतकासह चार शतके ठोकली आहेत. शिवाय अंतिम फेरीत त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ सुरू राहील, अशी तमाम वैदर्भीय पाठिराख्यांची अपेक्षा असेल. डावांची उभारणी करण्याची कला जाफरला अवगत असून त्याच्या बॅटचा तडाखा यंदा मुंबई तसेच उत्तराखंडला बसला. रणजीस्पर्धेत त्रिशतक, द्विशतके, शतके रचण्यात जाफरचा हात कोणी धरू शकणार नाही. विदर्भाचा संघ एकखांबी तंबू नसून कर्णधार फैझ फझल, डावखुरा युवा फलंदाज अथर्व तायडे, यष्टीरक्षक अक्षय वाडकर, उमेश यादव-रजनीश गुरबानी तेज जोडगोळी, आदित्य सरवटे, अक्षय वानखेडे अशा हरहुन्नरी खेळाडूंची पलटण विदर्भाकडे मौजूद आहे.
गेल्या मोसमात रणजीपाठोपाठ इराणी चषक पटकावून विदर्भाने दुहेरी मुकुट पटकावला होता. याचे श्रेय प्रामुख्याने चंदू पंडित यांच्या मार्गदर्शनाला द्यावे लागेल. मुंबईला नकोसा झालेल्या चंदूची प्रशिक्षणाची पद्धत इतरांपेक्षा अनोखी व काहीशी कडक. आचरेकरसर, अशोक मंकड यांच्या तालमीत तयार झालेल्या चंदूच्या कडक शिस्तीचा बडगा अनेक खेळाडूना बसला असून कधीकधी याबाबत नाराजीचे सूरही उमटले आहेत, परंतु चंदूने याची फारशी फिकीर केली नाही. कडक शिस्तीत तावूनसुलाखून निघालेल्या वैदर्भीय खेळाडूंची कामगिरी पुरेशी बोलकी आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनने दुहेरी मुकुट पटकावून आपले हीरक महोत्सवी वर्ष दणक्यात साजरे केले. हे यश ‘फ्ल्युक’ नव्हते हे सिद्ध करण्याची जबाबदारी आता फझलच्या संघावर आहे. रणजी करंडक आपल्याकडेच कायम राखल्यास विदर्भाचा शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link