Next
कालिमातेकडे मागणे
- पर्णिका मंगेश मुळ्ये (संस्कार भारती)
Friday, January 11 | 03:00 PM
15 0 0
Share this story

कोलकात्यातील सिमुलिया भागात राहणाऱ्या विश्वनाथबाबू आणि भुवनेश्वरीदेवी यांच्या पाच मुलांपैकी एक नरेंद्र. त्याला दोन बहिणी व दोन लहान भाऊ असा परिवार होता. वयाच्या १९व्या वर्षी नरेंद्रची रामकृष्ण परमहंस यांच्याशी भेट झाली. वडील अचानक देवाघरी गेल्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले.
घरातील मोठा मुलगा म्हणून घराची जबाबदारी नरेंद्रवर आली. घर चालविण्यासाठी त्याने नोकरी केली, परंतु त्यात भागत नव्हते. त्यामुळे नरेंद्राचा परमेश्वरावरचा विश्वास ढळू लागला. त्यावेळी रामकृष्ण परमहंस यांनी त्याला सावरले.
आपल्यासाठी कालिमातेकडे काहीतरी मागावे असे नरेंद्रने रामकृष्णांना सांगितले. रामकृष्ण म्हणाले, “मी असे काही मागत नाही. ती सर्वांची आई आहे, जगन्माता आहे. तूच तुझ्या या मातेकडे मागणे माग, ती नक्की तुला हवे ते देईल.”
नरेंद्र मंदिरात गेला, कालीमातेसमोर उभा राहिला. त्याने नमस्कार केला आणि काय आश्चर्य! मंदिरातील वातावरणाचा परिणाम होऊन नरेंद्रच्या तोंडून स्वत:साठी नोकरी वगैरे न मागता, ‘ज्ञान दे! विवेक दे! वैराग्य दे!’ असे शब्द बाहेर पडले. सलग तीनदा हाच प्रकार घडला. रामकृष्णांनी त्याला समजावले की तू असामान्य मुलगा आहेस. तुझ्या तोंडून आईकडे, ‘अन्न दे, वस्त्र दे, नोकरी दे!’ असे मागणे येणारच नाही. तुझ्या कुटुंबाला काही कमी पडणार नाही. तू खूप मोठा होशील. पुढे नरेंद्रने संन्यास घेतला आणि भारतभ्रमण केले. खेतडीचे महाराज अजितसिंह यांच्या आग्रहावरून त्यांनी ‘स्वामी विवेकानंद’ हे नाव धारण केले. १२ जानेवारी हा स्वामीजींचा जन्मदिवस आहे, त्यांना वंदन करुया.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link