Next
फेकबुकवर तात्या
सुरेश खरे
Friday, November 23 | 05:00 PM
15 0 0
Share this story

प्रिय तात्या,

दरवर्षीच्या नेमाप्रमाणे तुम्ही या वर्षीही दिवाळीला बाहेरगावी गेलात. फरक इतकाच, की कोकणात न जाता तुम्ही आणि काकू या वर्षी नागपूरला तुमच्या पुतण्याकडे गेलात. पुतण्याच्या वऱ्हाडी पाहुणचारामुळे आणि आग्रहामुळे तुमचं पोट बिघडलं यात आश्चर्य नाही. तुम्हीपण कमाल करता. पुतण्या डॉक्टर आहे म्हणून खाण्यापिण्यातलं ताळतंत्र सोडायचं का? असो. येताना माझ्याकरता संत्र्याची बर्फी आणायला विसरू नका!

तुमच्या पुतण्यानं तुम्हाला फेसबुकची दीक्षा दिली, हे वाचून मला परमानंद झाला. फेसबुकवर नसणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे, हे तुम्हाला फार लवकर पटलं. वास्तविक तुमच्यामाझ्यासारख्या निवृत्त माणसांना (खरं म्हणजे काही कामधंदा नसणाऱ्या माणसांना) फेसबुकसारखं वेळ घालवायचं दुसरं साधन नाही. फेसबुकचे अनेक फायदे आहेत. मी फावल्या वेळात (माझा बहुतेक वेळ हा ‘फावला’च असतो) नेमानं फेसबुकवर असतो. माझ्या अनुभवाचा फायदा तुम्हाला मिळावा म्हणून तुम्हाला काही टिप्स देऊ इच्छितो. तुमच्या प्रोफाइलमध्ये तुमचा फोटो टाकू नका. तुमचा फोटो पाहून तुमची फ्रेंड रिक्वेस्ट कुणी अॅक्सेप्ट करणार नाही. मधुबाला किंवा मीनाकुमारीचा फोटो टाकायला हरकत नाही. प्रोफाइलमध्ये कुणाचाही फोटो टाकता येतो. एखाद्या फुलाचा किंवा निसर्गदृश्याचा फोटो टाकलात तरी चालेल. सुरुवातीला तुम्हाला फारशा फ्रेंड रिक्वेस्ट येणार नाहीत. ज्या येतील त्या मागचापुढचा विचार न करता स्वीकारत चला.

मी बरेच इंग्रजी शब्द वापरतोय कारण फेसबुकमुळे माझं मराठी ‘आंग्लाळलंय.’ फेसबुकवर अनेकांना मराठी नीट समजत नाही. इतकंच नाही तर मराठी त्यांना देवनागरीत लिहिताही येत नाही. ते रोमन लिपीत मराठी भाषा लिहितात. उदाहरणार्थ, Marathi bhasha khoop chhan aahe. Mala marathicha abhiman aahe. किती छान वाटतं नाही? तुमचा मराठीचा जाज्ज्वल्य अभिमान वगैरे बाजूला ठेवा. तुम्हाला हळूहळू रोमन लिपीतलं मराठी वाचता यायला लागेल आणि थोड्याच दिवसांत तुम्ही रोमन लिपीत मराठी लिहायला लागाल.

सुरुवातीला तुम्ही इतरांनी टाकलेल्या ‘पोस्टी’ वाचायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल. हौशी लेखक मंडळी आणि कवी (यात कवयित्री जास्त) यांचे लेख आणि कविता तुम्हाला वाचायला मिळतील. एक लक्षात घ्या, त्यांचा (लेखनाचा आणि कवितांचा) दर्जा कितीही सामान्य असला तरी एकदा मित्र (किंवा मैत्रीण) म्हटल्यावर कौतुकाचे चार शब्द लिहिणं आणि त्यांना उत्तेजन देणं, हे आपलं नैतिक कर्तव्य ठरतं.

या बाबतीत काय अलिखित संकेत आहेत, ते सांगतो. अगदीच सुमार असेल तर ‘लाइक’चा अंगठा दाखवावा. ‘लाइक’चा अर्थ ‘आवडलं’ असा नसून ‘वाचलं’, इतकाच असतो. हा ‘अंगठा’ न वाचतासुद्धा दाखवता येतो. लेखन बऱ्यापैकी असेल तर खालीलपैकी एक विशेषण वापरायची पद्धत आहे. छान, सुंदर, मस्त, अप्रतिम, व्वा!, वाह!, गोड, नाइस, अफलातून, कडक, लय भारी, वगैरे. ‘उत्कृष्ट हे विशेषण कुणी सहसा वापरत नाही. कारण त्यात दोन जोडाक्षरं येतात. ‘ग्रेट’ म्हणायचं असेल तर ‘ग्रेट’ किंवा ‘Great’ न लिहिता ‘Gr8’ लिहायची पद्धत आहे. तुम्ही जर पूर्ण शब्द लिहिलात तर तुमची गावंढळ माणसाxत गणना होईल, हे लक्षात ठेवा. तसंच गुड मॉर्निगला नुसतं Gm, गुड नाइटला फक्त Gn, तर Thanks ऐवजी Thnx लिहिणं यात वेळेची प्रचंड बचत होते, हे अतिशय महत्त्वाचं आहे. ‘ताई, तुमचं J1 (जेवण) झालं का?’, हा समस्त फेबु मैत्रिणींमध्ये, ‘घुसखोरी करून जवळीक साधण्याचा प्रयत्न’ म्हणून ओळखला जातो. ही चौकशी ठरावीक वयाचे तरुण फेसबुकवरचा फोटो पाहून आणि अर्थात वय पाहून करतात. तुमचा याच्याशी काही संबंध येणार नाही, पण केवळ तुमचं सामान्य ज्ञान वाढावं म्हणून तुम्हाला सांगितलं.

पाळलेल्या कुत्र्यामांजरांचे (हा शब्द तुच्छतादर्शक म्हणून वापरलेला नसून अनेकवचनी म्हणून वापरला आहे याची प्राणीमित्रांनी नोंद घ्यावी. सर्व पाळीव प्राण्यांविषयी आणि वन्य प्राण्यांविषयीही प्रस्तुत लेखकास भीतीयुक्त आदर आहे) वाढदिवसाचे झबले घातलेले फोटो कुणी टाकल्यास How cute, Beautiful, Marvellous, Fantastic, Wow या शब्दांत त्यांचं कौतुक करायचा प्रघात आहे. तुमच्या घरात घोटाळणाऱ्या मांजरीचा फोटो, ‘आमची मनी पाच वर्षांची झाली’, अशी कॅप्शन लिहून तुम्हाला फेसबुकवर टाकायला हरकत नाही. बंडूच्या मुंजीत काकूंनी लिहिलेली मंगलाष्टकंपण बंडूच्या जरीची गोल टोपी घातलेल्या फोटोसकट फेसबुकवर टाकावीत, अशी माझी सूचना आहे. चांगले लेख, चांगल्या कविता, राजकीय लेख, काही चांगले विनोद, चांगल्या ध्वनिफिती, चित्रफितीपण फेसबुकवर येतात, पण त्या दुय्यम गोष्टी आहेत. फेसबुकचा उपयोग हा तुमच्यामाझ्यासारख्या सामान्य माणसांसाठी फुकटात प्रसिद्धीचं साधन हा आहे. ‘आमची पिंकी तिसरीच्या सहामाही परीक्षेत बावन्न टक्के मार्क मिळवून तेरावी आली.’ हेदेखील फेसबुकवर येतं आणि त्याला बावन्न ‘लाइक्स’ मिळतात. सुरुवातीलाच तुम्ही गोंधळून जाऊ नये म्हणून सविस्तर लिहिलं आहे. काही दिवसांनी तुम्हाला फेसबुकचं वेड लागेल. तुमचा सारा दिवस फेसबुकवर जाईल. काकू आणि घरातली सर्वच माणसं खूश होतील. कारण तुमचं कशातच लक्ष नसल्यामुळे तुमच्या सततच्या कटकटीमुळे साऱ्या घरादाराला होणार त्रास टळेल. घरात शांतता नांदेल. आज फेसबुकमुळे अनेक कुटुंबांत शांत आणि प्रसन्न वातावरण आहे. फेसबुक हे मानवजातीला मिळालेलं वरदान आहे.

तुमच्या फेसबुक वाटचालीसाठी शुभेच्छा!

तुमचा,
फेसबुक व्यसनाधीन मित्र
नाना
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link