Next
स्वरांचा दिव्यस्पर्श
वासंती वर्तक
Friday, October 19 | 03:30 PM
15 0 0
Share this story


दिलेल्या पत्त्यावर रिक्षा सोडली आणि टीचर्स कॉलनीची पाटी कुठे दिसते का म्हणून इकडे-तिकडे पाहायला सुरुवात केली. मोठं गेट कदाचित दूर असावं. तेवढ्यात समोरच्या छोट्याशा गेटमधून एक हसरा चेहरा डोकावला. त्यांनी हात हलवून, ‘इकडे या’ अशी खूण केली. त्यांच्या गेटपासून घरात खुर्चीत स्थानापन्न होईपर्यंत एका शब्दाचं बोलणं नाही. खुणेनंच ‘टेबलावरचं पाणी घ्या’ असं सांगितलं अन् खुर्चीतली लांबसडक बासरी उचलून ओठाला लावली. क्षणात बासरीच्या मधुर स्वरांतून प्रार्थना उमटली. पाठोपाठ दोन मराठी भावगीतं. आमचे यजमान विलक्षण तन्मयतेनं बासरी वाजवत होते. वादन संपल्यानंतर प्रसन्न हसून म्हणाले, “तुम्ही काल माझ्या पेटीवादनावर खूश झालात. म्हटलं आजही तुमचं स्वागत सुरांनीच करावं... मी अरविंद विनायक खिरे आणि ही नीला अरविंद खिरे.”
दुसऱ्यांचा आनंद जपण्याची धडपड खिरेसरांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे, हे नंतरच्या गप्पांमधून क्षणोक्षणी जाणवत होतं. उरळीकांचनच्या निसर्गोपचार आश्रमात रोज संध्याकाळी अरविंद खिरेसर प्रार्थना करतात. आश्रमातले रहिवासी, रुग्ण, देशी-विदेशी साधक सारे... एकदा प्रार्थनेला आले की दुसऱ्या वेळी आपोआप ओढले जातात प्रार्थनागृहाकडे. सूर्यगोलाचा तप्त लालिमा विरत असतानच, मोगऱ्याच्या झुळुकेबरोबर सरांच्या हार्मोनियमचे सूर काना-मनात शिरतात आणि प्रार्थनेची वेळ होईपर्यंत सर फक्त एकल वादन करत असतात. सायंप्रार्थना हा निसर्गोपचार आश्रमाच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग आहे. २००१ साली निवृत्त झाल्यापासून खिरेसरांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि आज दीड तप अव्याहत, अखंड ही प्रार्थना-साधना चालू आहे.

मणिभाई देसाईंनी स्थापन केलेल्या या आश्रमात पूर्वी महात्मा गांधींच्या एक शिष्या होशियारीबेन रोज सायंप्रार्थना गायच्या. मग गणेश बेहडेजी आणि आता खिरेसर. प्रार्थनेचं स्वरूप महात्मा गांधींच्या प्रत्येक आश्रमात साधारण सारखंच. प्रारंभी ईशस्तवनपर श्लोक. मग सर्वधर्म प्रार्थना, नंतर भजन... तेही सर्वांचं आवडतं ‘वैष्णव जन तो’ किंवा ‘पायो जी मैंने’ किंवा ‘दर्शन दो घनश्याम.’ मध्ये एखादं बौद्धिक. पूर्वी मणिभाई, बाळकोबा भावे किंवा आश्रमात आलेले पाहुणे थोडं बोलत. मध्ये तत्कालिक विषयावर चिंतन झालं की एखादी ‘रामधून.’ गजर आणि एक-दोन भजनानंतर भैरवी. या साऱ्या कामांत उमाताई शिवकर त्यांना रोज साथ करतात.
खिरेसरांचं वैशिष्ट्य म्हणजे ते अनेक मराठी-हिंदी गोड भजनं गातात, तीही स्वरचित. सारं संतवाङ्मय आणि आधुनिक कवी पचवून खिरेसरांची काव्यशैली समृद्ध झालेली जाणवते. विलक्षण सोपेपणा आणि गेयता आपल्याला भुरळ घालते. सारे राग, सारी वृत्तं शास्त्रकाव्यावर आणि भावकाव्यावर तोलूनही सरांवर प्रसन्नच आहेत, असं वाटतं. हे सगळं केवळ सायंप्रार्थनेपुरतंच मर्यादित नाही हे जाणवतं. या साऱ्याची मुळं थेट बालपणात घेऊन जातात सरांना. आईविना सात अपत्यांना सांभाळलं वडिलांनी. ते प्राथमिक शिक्षक.भाषाप्रभू. काव्य-गायनाची आवड. सरही ऐकत-ऐकतच शिकले. घरी थोरा-मोठ्यांचा वावर. त्यामुळे काव्याची ओढ लागली. त्यांच्या कविता स्व-छंदासह जन्म घेऊ लागल्या. त्याला अखंड वाचनाचं खतपाणी मिळालं. १९७१ मध्ये उरळीकांचनच्या म. गांधी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात अरविंद खिरे शिक्षक म्हणून रुजू झाले. अल्पावधीतच मुख्याध्यापक-प्राचार्य असा प्रवास केला. या सगळ्या वर्षांत आनंदानं अध्यापनही केलं आणि विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या विषयांवर हस्तलिखितं करवून घेतली. माहिती-तंत्रज्ञानाचा उदय व्हायच्या आधीच्या काळात विद्यार्थ्यांना वाचायला, माहिती मिळवायला प्रेरित केलं. ‘स्वातंत्र्याचा सूर्योदय’ या प्रकल्पाचं मोरारजी देसाईंनी विशेष कौतुक केलं.

या सर्व काळात सरांचे स्वत:चे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. काव्यवाचनाचे कार्यक्रमही होत होते. या आवडीचा आश्रमाला फायदा व्हावा म्हणून निवृत्तीनंतर सरांनी सायंप्रार्थनेची जबाबदारी घेतली. याच वर्षात, २००१ मध्ये खिरेसरांनी रवींद्रनाथांच्या ‘गीतांजली’चा भावानुवाद करायला घेतला. अनुभव होता. अथर्वशीर्ष, रामरक्षा सारं सरांनी समश्लोकी मराठीत केलं होतं. तेच वजन, तीच लय, तोच भाव पकडून अनुवादाचं कसब अंगी होतंच. गीतांजली समजून घेताना ती नकळतपणे ‘ओवीत’ सहज अवतरली सोपी, सुरेल. मग भगवद्गीता-ज्ञानेश्वरीही सोप्या मराठीत आणली. खिरेसरांची ज्ञानेश्वरी तर ‘गेय’ ज्ञानेश्वरी आहे.
एवढा समृद्ध काव्यानुभव पाठीशी असल्यावर प्रार्थनेचा एक तास हा सरांना अपुराच वाटत असणार. पण सर गांधी हायस्कूलमध्ये नोकरीला लागल्यानंतर, दहा वर्षं त्यांना आश्रमानं निवासी खोल्या दिल्या. ऋणानुबंध जुळलेलाच होता. आपण काही सेवा देतोय असं सरांना मुळीच वाटत नाही. त्यांच्या सौ. नीलाताईंनाही वाटतं, “अहो, हे घरचंच काम आणि आनंदाचं.” नीलाताईंनी आयुष्यभर अल्प वेतनावर बालवाडी चालवली आणि थोडा आकार दिलेले मातीचे गोळे सरांच्या शाळेकडे पाठवले. आताही वाचन-लेखन हे एकत्रितपणे चालतं. आश्रमातील सायंप्रार्थना हे खऱ्या अर्थानं उजळलेलं ‘कांचनसंध्येचं’ प्रतीकच वाटलं मला. रवींद्रनाथांच्या कवितेचा खिरे सरांनी भावानुवाद केला आहे. त्या शब्दांत सांगायचं तर...

देवा तू मजला। सांगतोस गाया।।
मोहरते काया। अभिमाने।।
जेव्हा तुझे गीत। गाऊ मी लागतो।।
सूर झंकारतो। रूक्ष मनी।।
माझी ही कल्पना। भेदते आकाश।।
पंखात ओततो। आत्मतेज।।
स्वरांचा पिसारा। फुलवितो जेव्हा।।
चरणांचा तेव्हा। दिव्यस्पर्श।।


आज पंचाहत्तरीत प्रवेश करताना ‘हा दिव्यस्पर्श’ सरांनी अनुभवला असेल का?
आपले शब्दसुरांचे भांडार, आश्रमाच्या शिस्तशीर चौकटीत बांधूनही, साधक-रसिकांसाठी उधळताना सरांच्याही मनात हीच तृप्त भावना असेल का? ही भावना अशीच टिकून राहो. उरळीच्या ग्रामस्थांना आणि देश-विदेशांतल्या साधकांना सरांची मंगलमय प्रार्थना नित्य लाभो. सरांचे लेखनमनोरथ पूर्ण होवोत, अशीच अमृतमय शुभेच्छा या अमृतमहोत्सवी वर्षात सरांना देऊया.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link