Next
अश्विनचं काय चुकलं?
नितीन मुजुमदार
Friday, March 29 | 03:00 PM
15 0 0
Share this story

आ र. अश्विननं जो. बटलरला आयपीएलमध्ये ज्या पद्धतीनं रनआऊट केलं त्यावरून भारतभरच नव्हे तर जगभरातून बाजूनं व विरुद्ध असा प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे, परंतु नियम पाहिल्यास आर. अश्विननं या प्रसंगात कायदेशीरच नव्हे तर नैतिकदेखील काहीही चूक केलेली नाही.
आयपीएलमध्ये घडलेल्या या वादग्रस्त प्रसंगानंतर अनेकांना १९४७ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली. त्या वेळी विनू मंकड यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडू बिल ब्राउनला अशाच पद्धतीनं बाद केलं होतं. याआधी याच दौऱ्यात भारताविरुद्ध एका सराव सामन्यात ब्राउनला अशाच प्रकारे बाद करण्यात आलं होतं. सिडनी कसोटीतील या प्रकारानंतर माध्यमांमध्ये याबाबत खूप चर्चा सुरू झाली आहे. तेव्हा तर परदेशी क्रीडापत्रकारांनी या बाद होण्याच्या प्रकाराला मंकडेड (Mankaded) असं नाव देऊन टाकलं व ते रूढ करण्याचा प्रयत्नदेखील केला.
सुनील गावस्करनं या बाद होण्याच्या पद्धतीला अशा नावानं संबोधण्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आढळते. विनू मंकड यांचे सुपुत्र व मुंबईचे माजी रणजीपटू राहुल मंकड हेही या घटनेच्या अशा तऱ्हेनं झालेल्या नामकरणाबद्दल नाराज आहेत. नुकतीच एका लेखाद्वारे त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. महत्वाचे म्हणजे सिडनी कसोटीतील या प्रकाराबद्दल ऑस्ट्रेलियाचे तत्कालीन कर्णधार ब्रॅडमन काय म्हणाले होते ते बघा. ब्रॅडमन आपल्या Farewell to cricket या पुस्तकात त्याबद्दल लिहितात,’For the life of me, I can not understand why. The laws of cricket make it quite clear that the nonstriker must keep within his ground untill the ball has been delivered.’ ते पुढे लिहितात, ‘If not, why is the provision there which enables the bowler to run him out?’ सर्वात महत्त्वाचं ब्रॅडमननी नंतर लिहिले आहे, ते लिहितात, ‘By backing up too far or too early, the nonstriker is obviously gaining an unfair advantage.’
ब्रॅडमनसारख्या महान क्रिकेटरनं अतिशय स्पष्ट शब्दांत त्यांचे विचार मांडले आहेत, नव्हे बॉल टाकण्याआधी क्रिज सोडून  नॉनस्ट्राइकर काही फायदा घेऊ पाहतो, असंही ब्रॅडमन ठामपणे म्हणत आहेत.
ज्याच्या बाद होण्यामुळे ही चर्चा सुरू झाली आहे तो राजस्थान रॉयल्सचा जो. बटलर हा अशा प्रकारे याआधीदेखील बाद झालेला आहे. २०१४ साली एजबॅस्टन इथे श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा ऑफस्पिनर सचित्र सेनानायके यानं त्याच्या गोलंदाजीवर बटलरला अशाच पद्धतीनं बाद केलं होतं. बटलरनंदेखील, ‘होय ती माझी चूक होती’ अशा शब्दांत कबुली दिली होती. मात्र सेनानायकेनं बटलरला बाद करण्यापूर्वी शाब्दिक नोटीस बजावली होती. अश्विननं असं काही केलं नाही. त्यानं नियमावर अचूक बोट ठेवलं. माझ्या मते नॉनस्ट्राइकरनं क्रिज आधी सोडून फायदा घेऊ नये म्हणूनच नियमात त्याला बाद करता येण्याची तरतूद केलेली असावी.
एमसीसीनं (मेर्लबोर्न क्रिकेट क्लब) मंगळवारी एक पत्रक प्रसिद्धीस देऊन आयपीएलमधील प्रकाराबाबत टिप्पणी केली आहे. एमसीसीनं सदर घटनेत अश्विनची स्पष्ट शब्दात पाठराखण केलेली असून त्याच्या कृत्यामध्ये खेळभावनेच्या विरुद्ध काहीही नाही, असं नमूद केलं आहे. एमसीसीच्या पत्रकात संबंधित नियम अत्यावश्यक आहे, असंही स्पष्ट केलं आहे. हा नियम नसेल तर नॉनस्ट्राइकर त्याचा गैरफायदा घेण्याची भीती आहे, याकडेही या पत्रकाद्वारे लक्ष वेधलं आहे. अश्विन-बटलर वादात वेगवेगळे मतप्रवाह दिसत असले तरी बहुसंख्य मतं अश्विनच्या बाजूनं आलेली दिसतात.
माजी कसोटीपटू करसन घावरी यांच्या मते, अश्विननं बटलरला बाद करण्यापूर्वी वॉर्निंग द्यायला हवी होती. क्रिकेटप्रशिक्षक प्रशांत शेट्टीदेखील याच मताचे दिसले.
राहुल द्रविडनंदेखील ‘मी स्वतः बटलरला ताकीद दिली असती तरी आर. अश्विनचं कुठंही चुकलेलं नाही’ असं स्पष्ट प्रतिपादन केलं आहे. अश्विननं जे केलं त्यामुळे तो खिलाडूवृत्ती सोडून वागला असं मला वाटत नाही, असंही तो म्हणतो.
असं असलं तरी बरेचसे परदेशी क्रिकेटपटू अश्विनच्या कृत्यावर असमाधानी आहेत. शेन वॉर्नसारख्या महान लेग स्पिनरनं अत्यंत कडवट शब्दांत मत व्यक्त केलं आहे. बाद झालेला खेळाडू भारतीय व बाद करणारा परदेशी असता तर काय झालं असतं, असा खोचक प्रश्न त्यानं विचारला आहे. मात्र या वादात त्यानं व्यक्त केलेली मतं न पटणारी आहेत. स्वतः वॉर्नची कारकीर्द अखिलाडूवृत्तीच्या अनेक प्रसंगांनी भरलेली आहे. भले तो लेगस्पिनर म्हणून किती का महान असेना! इथे तर अश्विनचं कुठंही चुकलेलं आहे, असं वाटत नाही.
मुळात अशा प्रकारचे रनआऊट करण्याचे प्रसंग अगदी दुर्मिळ असल्यामुळे आणि त्यात आयपीएलसारख्या सर्व माध्यमांचं लक्ष खेचलेल्या लोकप्रियस्पर्धेत हा प्रसंग घडल्यामुळे या रनआऊटची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात भर म्हणून त्या विकेटनंतर राजस्थान रॉयल्सचा डाव घसरला तो घसरलाच! अन्यथा शंभर टक्के कायदेशीर अशा या ‘विकेट’ची एवढी चर्चा झाली नसती आणि एरवीसुद्धा तशी ती व्हायला नको. नॉनस्ट्राइकर हा एरवी बॉल सोडण्याआधी क्रिज सोडतो तेव्हा तो काही अजाण नक्कीच नसतो. आपली धाव कमीत कमी श्रमांत पूर्ण व्हावी इतकाच ‘सरळ’ हेतू त्यामागे असतो. खरं तर असे नियमबाह्य पद्धतीनं ‘स्टार्ट’ घेणारे प्रसंगही अनेक असतीलही, पण आपल्या कॅमेऱ्यांचं पुरेसं लक्ष तिकडं गेलेलं नाही. अश्विन-बटलर वादंगानंतर तरी यापुढे कॅमेरे नॉनस्ट्राइकरवर पुरेसं लक्ष ठेवतील असं वाटतं. खरं तर या बाबतीत नॉनस्ट्रायकरनं आधी स्टार्ट घेतलेली धाव रद्द करण्याबाबत पंचानी अधिक कडक राहायला हरकत नाही!
एकंदरीत क्रिकेटमधील बरेचसे नियम हे फलंदाजाला अनुकूल आहेत आणि दिवसेंदिवस ते फलंदाजांना अधिकच अनुकूल होत आहेत. एकदिवसीय क्रिकेट व टी-२० क्रिकेटमध्ये तर याचे बक्कळ पुरावे सापडतील. त्यामुळे या नॉनस्ट्राइकर रनआऊट नियमाचे फलंदाजांनी तसे फार दुःख करू नये! अजाणतेपणी गोलंदाज जेव्हा नोबॉल टाकतो तेव्हा त्याला समज मिळते का? उलट अलिकडे त्याला नोबॉलची एक रन व फ्रीहिट अशी दुहेरी किंमत (पेनल्टी) मोजावी लागते. त्यामुळे या पद्धतीच्या रनआऊटची चर्चाही फार होऊ नये, असं नमूद करावंसं वाटतं. यष्टीरक्षक बाद होणाऱ्या फलंदाजाला समज देत नाही, मग नॉनस्ट्राइकरबद्दलदेखील हा प्रश्न उद्भवू नये, असे एक मत ट्विटरवर पाहायला मिळालं आणि पटलंदेखील!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link