Next
ज्युनियर शॉटगन
श्वेता प्रधान
Friday, October 04 | 05:00 PM
15 0 0
Share this story


‘शॉटगन’ हे संबोधन बऱ्याच वर्षांनी पुन्हा चर्चेत आणलं सोनाक्षी सिन्हानं. शत्रुघ्न सिन्हाच्या या लाडक्या लेकीनं वडिलांच्या ‘शॉटगन’ नावामागे ‘ज्युनियर’ लावून त्यांच्या  बिनधास्तपणाची शान राखली. म्हणून लगेच तिची तुलना शत्रुघ्न सिन्हाच्या अभिनयाशी करून चालणार नाही. वडिलांचं नाव राखलं असलं तरी त्यांच्या कारकिर्दीचा, लोकप्रियतेचा वारसा जपण्यासाठी सोनाक्षीला फार मोठी मजल मारावी लागणार आहे. ‘शॉटगन ज्युनियर’ या दोन शब्दांची लोकप्रियता इतकी वाढलीये, की अमिताभ बच्चनच्या केबीसीमध्ये वीस हजारांसाठी ‘शॉटगन ज्युनियर हा कोणत्या अभिनेत्रीचा ट्विटर-बायो आहे?’ असा प्रश्नही विचारला होता. 

मस्तीखोर बालपण 
ही धाकटी शॉटगन लहानपणी तिच्या नावाप्रमाणेच बंदुकीसारखी तेजतर्रार मुलगी होती. स्विमिंग, व्हॉलिबॉल, टेनिस, फूटबॉल अशा सगळ्या खेळांत अग्रेसर आणि लव-कुश या जुळ्या भावंडांशी मारामारी करण्यातही पटाईत. शाळा-कॉलेजात तिच्या वाटेला कोणी जात नसे. पहिल्यापासून टॉमबॉईश असल्यानं तिची आई पूनम सिन्हा तर अनेकदा म्हणायची, ‘हिच्यात मुलीचा एकही गुण शोधून सापडायचा नाही!’

सोनाक्षीला निष्णात खेळाडू व्हायचं होतं. आईवडिलांच्या फिल्मी किंवा राजकीय कारकिर्दीत तिला जराही रस नव्हता. वडिलांसोबत त्यांच्या सेटवर जायचं म्हटलं की तिला कंटाळा येत असे. त्यामुळे अभिनेत्री होण्याचा विचारही तिच्या मनाला कधी शिवला नाही. 

फॅशन ते अभिनय  
एसएनडीटीमधून फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या विषयाची इतकी गोडी लागली की याच विषयात झोकून द्यायचं तिनं ठरवलं. काही फॅशन ब्रँड्ससाठी रॅम्प वॉक केला. ‘मेरा दिल लेके देखो’ या सिनेमासाठी कॉस्च्युम डिझायनर झाली.  फॅशन वर्तुळात वावरताना अचानक एकदा अरबाज खानशी तिची भेट झाली. खान बंधू ‘दबंग’ साठी नायिकेच्या शोधात होते. सोनाक्षीमध्ये त्यांना अपेक्षित नायिका सापडली. पण त्यासाठी तिला तीस किलो वजन कमी करणं भाग होतं. ते जमवलं तेव्हा कुठे सोनाक्षी चुलबुल पांडेची रज्जो होऊ शकली. 

सोनाक्षीच्या कारकिर्दीत ‘दबंग’ची तुलना तिच्या इतर कोणत्याही चित्रपटाशी अद्याप तरी होऊ शकलेली नाही. ‘दबंग’ फ्रॅन्चाइसी पूर्णतः सलमानमय आहे आणि सोनाक्षीच्या वाट्याला फारशी दृश्यही येत नाहीत; असं असूनही ती नसती तर ‘दबंग १’ फिका पडला असता हेही खरं. ‘थप्पड से डर नहीं लगता साब, प्यार से लगता हैं’ या तिच्या डायलॉगने तर सर्वत्र धुमाकूळ घातला होता. पदार्पणासाठीचा पुरस्कारही तिनं पटकावला. टीकाकारांनी कौतुक केलं. ‘दबंग २’मध्ये मात्र ती असून नसल्यासारखीच होती. आता ‘दबंग ३’ येतोय. सोनाक्षीच्या व्यक्तिरेखेला खास संधी मिळतेय की नाही, हे लवकरच कळेल. 

देशी ठसका         
‘दबंग’मुळे सोनाक्षीच्या रूपात हिंदी चित्रपटसृष्टीला देशी ठसक्याची नायिका गवसली. ग्लॅम-डॉल्सच्या गोतावळ्यात साडी आणि सलवार कमीजमधली सोनाक्षी ७०-८०च्या दशकातल्या नायिकांची आठवण ताजी करत एक नवा ट्रेंड सुरू करू पाहत होती. त्यात तिला बऱ्यापैकी यश मिळालंसुद्धा. ‘दबंग १ आणि २’सह ‘रावडी राठोड’, ‘सन ऑफ सरदार’, ‘आर राजकुमार’ यांसारख्या सिनेमांत आधुनिकता आणि रेट्रो लूक यांच अफलातून मिश्रण सोनाक्षीनं सादर केलं. हे सिनेमे तर सुपरहिट झाले; पण सोनाक्षी फक्त शोभेची बाहुली असते, असं खुलेआम बोललं जाऊ लागलं. अक्षयकुमार, अजय देवगण, शाहिद कपूर यांच्या प्रभावाखाली देमार ढिशूम ढिशूम सिनेमांमध्ये सोनाक्षीचा सहभाग नायकाची प्रेयसी आणि नाचगाण्यांपुरताच होता, हे तसं नाकारून चालणार नाहीच. पण चित्रपटांनी करोडोंची कमाई केल्याने ‘लकी चार्म’ ठरवत ‘मिस १०० करोड’ असं तिचं नामकरण झालं होतं.

ठसा काही उमटेना..  
रेट्रो नायिकेचं आधुनिक पुनरुज्जीवन करण्यात सोनाक्षीला यश मिळेल अशी चिन्हं दिसत असतानाच तिच्यातली प्रयोगशीलता काहीशी हरवल्यासारखी वाटायला लागली. ‘दबंग १’ ते ‘आर राजकुमार’ अशी तीनच वर्षं गाठेपर्यंत तिच्या अभिनयात तोच तोपणा दिसतोय म्हटल्यावर टीकाकारांनी सणकून टीका करायला सुरुवात केली. ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’मध्ये बऱ्यापैकी महत्त्वाची भूमिका मिळूनही तिला स्वतःचा प्रभाव पाडता आला नाही. ज्या रेट्रो लूकमुळे तिच्याकडे कौतुकाच्या नजरा वळल्या, त्या लूकचा तिच्याच चाहत्यांना आता कंटाळा येत चालला होता. अशा वळणावर सर्वसाधारणपणे शरीरप्रदर्शन, बोल्ड दृश्यं, चुंबनदृश्यं यांचा आधार घेण्याचा प्रयत्न केला जातो. सोनाक्षी त्या मोहाला बळी पडली नाही. परंतु कलाकार म्हणून तिच्याकडून प्रयोगशील, सर्जनशील असं काही घडतानाही दिसेना. त्यामुळे तिच्या कारकिर्दीला नायकाचाच भक्कम टेकू लागतो, असं म्हणत तिचं काहीसं हसंच झालं. 

स्वतंत्र प्रयत्न 
स्वतःच्या बळावर काही करायचा प्रयत्न तिनं केला नाही असं नाही, पण ‘लुटेरा’चा अपवाद वगळता बाकीच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. ‘लुटेरा’ बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही, पण तिनं साकारलेल्या पाखी या बंगाली मुलीच्या भूमिकेची प्रशंसा झाली. ‘इसी बहाने क्यूँ ना मैं भी दिल का हाल जरा सवार लूं...’ अशी सुरेल साद घालत एकीकडे आजारपण आणि अपयशी प्रेम यांच्याशी झुंजत हेलकावे खाणारी सोनाक्षीची पाखी हावभाव, दिसणं, वावरणं, संवादफेक सर्वच बाबतीत उजवी होती.

अभिनयासाठी नावाजलं जाणं कलाकारांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं असतं. दीपिका पडुकोण, प्रियांका चोप्रा, विद्या बालन, आलिया भट्ट आदींसाठी खास संहिता लिहून घेतली जाते, चित्रपटाचा डोलारा स्वतःच्या खांद्यावर वाहून नेण्यासाठी या नायिका सज्ज असतात. याचं गांभीर्य सोनाक्षीच्या चित्रपट कारकिर्दीत अभावानंच बघायला मिळालं. 

‘अकिरा’, ‘नूर’, ‘हॅप्पी फिर भाग जायेगी’ आणि ‘खानदानी शफाखाना’ हे तिन्ही सिनेमे सोनाक्षीच्या व्यक्तिमत्त्वाभोवती फिरत होते, पण समीक्षा आणि तिकीटबारी दोन्हींपैकी एकावरही चमकले नाहीत. अॅक्शन आणि कॉमेडी या तिच्या आवडत्या शैलीतले हे चित्रपट असूनही त्यात प्रेक्षकांना वेगळेपण आढळलं नाही. ‘अकिरा’साठी तर तिने महिनाभर मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घेतलं होतं. पण यशानं हुलकावणी दिली.    

यशाच्या प्रतीक्षेत    
‘बुलेट राजा’, ‘तेवर’, ‘अक्शन जॅक्सन’, ‘वेलकम टू न्यू यॉर्क’ अशा चित्रपटांच्या निवडीतून सोनाक्षीला फायदा तर झाला नाहीच, उलट अपयशाच्या भोवऱ्यात ती समकालीन नायिकांपेक्षा मागे पडत गेली. ‘फोर्स २’, ‘इत्तेफाक’ यांनी थोडंफार यश बघितलं असलं तरी अनुक्रमे जॉन अब्राहम आणि अक्षय खन्ना यांचीच कामगिरी उठून दिसली. अलीकडे करण जोहरनं मोठ्या अपेक्षेनं ‘कलंक’ प्रदर्शित केला. १९४५ च्या काळातली कथा बॉक्स ऑफिसवर चमत्कार घडवून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल, असं अख्ख्या सोनाक्षीसह टीमला वाटत होतं. प्रत्यक्षात झालं भलतंच. ‘कलंक’ जोरदार आपटलाच शिवाय कलाकारांची जाहीर टिंगलटवाळी झाली ती वेगळीच.   

नाही म्हणायला ‘मिशन मंगल’चं दणदणीत यश हा सोनाक्षीला काही अंशी मिळालेला दिलासा. पण मल्टिस्टारर सिनेमा असला की श्रेय कोणा एकाच्याच झोळीत पडत नाही. त्यातून अक्षयकुमार, विद्याबालन सारखे कलाकार असल्यावर त्यांच्यापुढे एकटी सोनाक्षी उठून दिसणं फारसं शक्यही नाही म्हणा!   

उद्याची आशा 
‘दबंग ३’ आणि ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ हे सोनाक्षीचे आगामी चित्रपट. सलमान खानचे चाहते ‘दबंग ३’ला तारतील. त्याचा फायदा सोनाक्षीला होईलच. अजय देवगण, संजय दत्त, परिणीती चोप्रा इत्यादींसह तिचा ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ हा मल्टिस्टारर सिनेमा १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातल्या एका अफलातून प्रसंगावर आधारित असल्यानं त्याविषयी आतापासूनच प्रेक्षकांचं कुतूहल जागृत झालंय. शिवाय, एका डिजिटल फॅशन टॅलेंट हंटसाठी ती नुकतीच विशेष परीक्षकाच्या खुर्चीत बसली आहे.

सोनाक्षीच्या कारकिर्दीतले चढउतार बघितल्यावर ‘चित्रपटसृष्टीत काही जम बसला नाही तर काय करशील’, असं मध्यंतरी मीडियानं तिला विचारलं. ‘अभिनयाची कारकीर्द उतरणीला लागली तर मी स्वतःचा फॅशन ब्रँड तयार करेन!’ असं सांगत तिनं आपल्याकडे फॅशन जगताचा ‘बॅक-अप प्लॅन’ असल्याचं हळूच सुचवलं होतं. अभिनय तिच्या रक्तात आहे आणि हातात आहे फॅशन डिझायनिंगचं प्रशिक्षण.. एकूण परिस्थती पाहता प्रश्न पडतो, की आता येत्या काळात सोनाक्षी नक्की कोण असेल; अभिनेत्री की फॅशन डिझायनर?   

हे राम!
‘योसोनाक्षीसोडम्ब’ हा हॅशटॅग सध्या चर्चेत आहे. ट्रोलिंग तिच्यासाठी तसं नवीन नाही. ‘डम्ब’ असल्यावरून आलिया भट्टनंतर आता सोनाक्षीवर तोंडसुख घेतलं जातंय. झालं असं, की आता काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या रूमा देवीसह सोनाक्षी ‘कौन बनेगा करोडपती’ च्या हॉटसीटवर बसली होती. ‘हनुमानानं संजीवनी वनस्पती कोणासाठी आणली?’ या प्रश्नावर लक्ष्मण हे योग्य उत्तर सोडून सोनाक्षी राम की सीता या गोंधळात पडली आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याची लाइफलाइन घ्यावी लागली. घराचं नाव ‘रामायण’, वडिलांचं नाव शत्रुघ्न, राम-लक्ष्मण-भरत हे काका, सख्खी भावंडं लव-कुश अशी घराची संकल्पना रामायणावर आधारित असल्याचं सांगणाऱ्या सोनाक्षीला इतक्या साध्या प्रश्नाचं उत्तर येऊ नये, यावरून सोशल नेटवर्कवर कडाडून टीका, मीम्स, ट्रोलिंग सुरू झालंय. ‘अशा खूप गोष्टी आहेत ज्या मला येत नाहीत’ असं तिनं प्रत्युत्तर दिलं असलं, तरी या प्रकरणातून इतक्या लवकर तिची सुटका होईलसं वाटत नाही. 

वादांची मालिका  
सोनाक्षी सिन्हा म्हटलं की वाद, ट्रोल्स ओघानं आलेच. आधी काय तर सोनाक्षी रीना रॉयसारखी दिसते म्हणून ती तिचीच मुलगी असल्याचं गॉसिप वाऱ्यासारखं पसरलं. मग लोकांना तिच्या वजनाचा मुद्दा मिळाला. वजनावरून अतिशय निष्ठूरपणे तिची टिंगल केली गेली. अगदी लहानपणापासून ती हे सहन करत आलीये. ‘कोणी काहीही बोला, मी अशीच आहे’ असं सुरुवातीला ठणकावून सांगणारी आणि ठसठशीत व्यक्तिमत्त्वाच्या नायिकांचा ट्रेंड आणू पाहणारी सोनाक्षी नंतर मात्र प्रवाहात सामील होऊन सडपातळ झाली.     

आवाज कुणाचा!
Anne हॅथवेनं तिच्या आवाजात ‘रिओ आणि रिओ २’ या हॉलिवूड अनिमेशनपटांतली पोपटीण ज्वेल खुलवली होती. ‘रिओ २’ च्या हिंदी रूपांतरात ज्वेलला आवाज दिला सोनाक्षीनं; तोही वडिलांच्या ‘अबे खामोश!’च्या थाटात.      

सुरातली नायिका 
प्रियांका चोप्रा, श्रद्धा कपूर, आलिया भट्ट, परिणीती चोप्रा यांच्यासारखंच सोनाक्षीनंही प्रयत्नपूर्वक सूर आळवले. मीत ब्रदर्ससोबत सोनाक्षीचं ‘आज मूड एश्कोहॉलिक हैं’ विशेष गाजलं होतं. ‘रज रज के’ (अकिरा), ‘मूव्ह युअर लक’ (नूर) असा अधूनमधून तिचा आवाज ऐकू येतो. छोट्या पडद्यावर तिनं ‘इंडियन आयडॉल ज्युनियर’साठी परीक्षकाची जबाबदारी पार पाडली होती. 

नाचे सोनाक्षी... 
‘गो गो गोविंदा’ (ओह माय गॉड), हर किसी को नहीं मिलता’, ‘पार्टी ऑल नाइट’ (बॉस), ‘थँक गॉड इट्स फ्रायडे’ (हिम्मतवाला) ही उदाहरणं बघता सोनाक्षीच्या सिनेमांपेक्षा तिचे आयटम नंबर्स जास्त गाजतात, असंच म्हणावं लागेल. पूर्वी नायिका आयटम नंबर्सच्या वाटेला सहसा जात नव्हत्या, पण सोनाक्षीच्या आयटम नंबर्सची संख्या समकालीन अभिनेत्रींपेक्षा अंमळ अधिक आढळेल. नृत्याची आवड असल्यानं ‘नच बलिये’ची परीक्षक होण्याची संधीही तिला मिळाली होती.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link