Next
सत्यावरील विश्वास दृढ करणारा ‘सत्यमेव जयते !’
अमोघ पोंक्षे
Friday, September 06 | 04:00 PM
15 0 0
Share this story


सध्या आपल्या समाजात जाती, धर्म, पंथ यांची ढाल पुढे करून एका विशिष्ट समाजाच्या लोकांवर होणारे अन्याय आणि त्यातून प्रक्षोभक वातावरणनिर्मिती करून संबंधितांवर झालेल्या अन्यायापेक्षा त्या घटनेशी संबंधित लोकांच्या धर्माला, जाती-पंथाला अधिक ठळकपणे नमूद करण्यात येतं. असं असलं तरी सत्यमेव जयते या वेब चित्रपटाच्या माध्यमातून पीडित किंवा आरोपीच्या नावाला प्रसिद्धीचं वलय न देता अतिशय साधीसोपी तरीही परिणामकारक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न लेखक अर्जित बिस्वास यांनी केला आहे.
बंगालमधील एका बाजारपेठेत आपले एक छोटेसे दुकान चालवणारे मन्सूर व त्यांचं त्रिकोणी कुटुंब एका स्थानिक गुंडाच्या दहशतीचा बळी कसं ठरतं, या बिकट परिस्थितीतून मन्सूर त्याची पत्नी सवेरा आणि मुलगी यास्मिन बाहेर कसे पडतात, यामागील संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. स्थानिक गुंड गणेश आणि त्याच्या भावासमवेत त्याचे काही मित्र मन्सूरची मुलगी यास्मिनला त्रास देत असतात. हा प्रसंग घडत असताना सैन्यातून वीरचक्रानं सम्मानित असलेले एक सैन्याधिकारी या प्रसंगाचं गांभीर्य पाहून मदतीसाठी पुढे येतात. मात्र त्यांची झुंज अपयशी ठरते आणि त्यांना यास्मिनचा जीव वाचवताना आपले प्राण गमवावे लागतात. येथूनच खऱ्या अर्थानं कथेला कलाटणी मिळते.
नव्यानं रुजू झालेल्या अबिंदो सर्वाधिकारी हा पोलिस अधिकारी या संपूर्ण केसच्या खोलात जाण्याचा सर्वार्थानं प्रयत्न करतो. त्यासाठी सैन्यातील अधिकाऱ्यांचीही मदत घेतो, मात्र न्यायालयात खटला उभा राहतो तेव्हा मात्र सत्याची बाजू असूनही पोलिस खटला योग्य पद्धतीनं लढू शकत नाहीत. परिणामी कोर्टात मन्सूरच्या संपूर्ण कुटुंबाला आपली बाजू खरी असूनही हार पत्करावी लागते. दुसरीकडे स्थानिक गुंड गणेश आणि त्याच्या भावाचा खटला लढवणारे वकील यांची एक वेगळीच बाजू पोलिसांसमोर येते. हे प्रथितयश वकील खरंच नक्की कोणाच्या बाजूनं असतात? चित्रपटाच्या अंती खरोखरच न्यायाची बाजू जिंकते का हे पाहणंही तेवढंच औत्सुक्याचं आहे.
चित्रपटाच्या यशाचं श्रेय खऱ्या अर्थानं द्यायचं असेल तर ते यातील मुख्य कलाकार, लेखक आणि दिग्दर्शकाला देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ही संपूर्ण कथा दीड तासाच्या छोट्या टाइम फ्रेममध्ये बसवण्याचं कसब दिग्दर्शक अरिंदम सील आणि संकलक परामिता घोष यांनी अतिशय उत्कृष्टपणे साधलं आहे. विपीन शर्मा, जयंत कृपलानी, अर्जुन चक्रवर्ती, सुदिप्ता चक्रवर्ती, सौरसेनी मैत्रा, दिबंदु भट्टाचार्य, पसून गयेन, संजीव सरकार, अनिर्बन, सौम्या सेनगुप्ता, प्रियांका मोंडल आणि असीम राजचक्रवर्ती या सगळ्यांनीच झोकून देऊन काम केल्याचं जाणवतं. मात्र या सर्व कलाकारांमध्ये सर्वाधिक कौतुक करायला हवं ते अबिंदो सर्वाधिकारी या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या अर्जुन चक्रवर्ती याचं !
आजच्या काळात सत्यावरचा ज्यांचा ज्यांचा विश्वास उडत चालला आहे अशा प्रत्येकानं हा सिनेमा एकदा तरी नक्कीच पाहण्याजोगा आहे. आजच्या २१ व्या शतकात मूल्ये अजूनही शिल्लक आहेत यावर विश्वास ठेवायला हा चित्रपट आपल्याला भाग पाडतो हेच या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.

वेबच्या व्यवसायवृद्धीसाठी काहीही...
एकाच व्यवसायात काम करणारे दोन दिग्गज शक्यतो कधी एकत्र येताना दिसत नाहीत. पण, एकाच व्यवसायातल्या अशा दिग्गजांना वेब सीरिजच्या निर्मितीच्या निमित्ताने एकत्र येण्यास अटीतटीच्या स्पर्धेने भाग पाडले आहे. अगदी काही महिन्यांपूर्वीच झी ५ आणि ए. एल. टी. बालाजी यांनी आपण काही वेब सीरिजच्या निमित्ताने एकत्र येत काही कार्यक्रमांची निर्मिती करत असल्याचे जाहीर केले आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. हे म्हणजे मॅकडोनाल्ड आणि बर्गर किंगसारख्या दोन मोठ्या कंपन्यांनी एकत्र काम करण्यासारखे होते.
काळाची पावले ओळखत झी ५ आणि ए. एल. टी. बालाजीने एकत्र येण्याचे हे पाऊल उचलले. दोघांची एकत्र निर्मिती असलेली कोल्ड लस्सी अँड चिकन मसाला ही वेब सीरिज नुकतीच दोन्ही ओटीटी प्लेटफॉर्मसवर रिलीज करण्यात आली. यांच्या याच एकत्र शृंखलेतील मिशन ओव्हर मार्स ही वेब सीरिजही येत्या १० सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. वेब सीरिजच्या या व्यवसायात हे पहिल्यांदाच होतेय असे नाही. याच वर्षी एप्रिल महिन्यात आलेल्या ट्रिपलिंगच्या दुसऱ्या पर्वाचे हक्क टीव्हीएफ ने सोनी लिव्ह सोबत वाटून घेतले होते.  टीव्हीएफचीच निर्मिती असलेल्या गुल्लक या वेब सीरिजबाबतही सोनी लिव्हने आपल्या प्लेटफॉर्मवरून ही वेबसीरिज प्रदर्शित केली होती.
येत्या काळात वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपन्यांनी एकत्र येत असे काही नवे प्रयोग करायचे ठरवले तर प्रेक्षकांना अजिबातच वावगे वाटायला न को.

सत्यमेव जयते - वेब चित्रपट
कलाकार - विपीन शर्मा, जयंत कृपलानी, अर्जुन चक्रवर्ती, सुदिप्ता चक्रवर्ती, सौरसेनी मैत्रा, दिबंदु भट्टाचार्य, पसून गयेन, संजीव सरकार, अनिर्बन, सौम्या सेनगुप्ता, प्रियांका मोंडल आणि असीम राजचक्रवर्ती
दिग्दर्शक - अरिंदम सील
लेखक - अर्जित बिस्वास
संकलक -  परामिता घोष
प्लॅटफॉर्म - झी ५
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link