Next
स्थळ आस्तिक हवं की नास्तिक?
मंगला मराठे
Friday, May 31 | 02:15 PM
15 0 0
Share this story


एका महिलामंडळात जरा हटके म्हणता येईल असा कार्यक्रम होता. भूमिका साकारायच्या होत्या. संवादासाठी पुढील परिस्थिती सांगितली गेली होती - अमेय आणि सीमा या दोघांना एकमेकांचं स्थळ सुचविलेलं आहे. पैकी एक कुटुंब श्रद्धाळू आहे तर दुसरं अश्रद्धाळू. अशा वेळी काय बोलणं होईल, तो संवाद सादर करायचा होता. महिलांनी खूप सुरेख बोलके संवाद सादर केले. त्यातले काही असे होते.
“ए मामी, काल अमेय त्या मुलीला भेटणार होता, काय झालं?”
“मुलींनापण हल्ली इतक्या खोड्या असतात ना, तुमच्या घरी देवाचं किती करतात? चातुर्मास वगैरे पाळतात का? असं विचारत होती. कशात काही नाही, तर यांच्या तक्रारी सुरू!” मामी चांगल्याच वैतागल्या होत्या.
“वैतागतेस काय मामी? हे सर्व आधीच विचारायला हवं.मग कळून काय उपयोग?”
“अगं, आता मुली फार काही व्रतवैकल्य करणार नाहीत हे सगळ्यांना कळतं. पण, घर म्हटलं की काही गोष्टी असणारच ना?”
“पण मुलीची श्रद्धा नसेल तर ती कसं करेल? आणि तिनं कां करावं? समज एखादी मुलगी खूप श्रद्धाळू आहे, पण तिचं सासर तसं नसेल तर सासरची माणसं तिच्यासाठी पूजाअर्चा करतात का? ते काय म्हणतात ‘आमच्या घरात हे चालणार नाही किंवा फारतर असं म्हणतात की तुझं तू काय ते कर.’ असं म्हणण्याची मुभा मुलींना मिळते का? मग त्या मुलीने आधीच स्पष्ट विचारून घेतलं तर तिचं काय चुकलं? न पटणाऱ्या वाटेला जायचं कशाला?”
“तसं तुझं बरोबर आहे. पण अजून कशात काही नाही अन अटी कसल्या घालता?”
“अगं, तिनं नुसतं विचारलं. अटी कुठे घातल्या? ”
“ काय गं, सीमासाठी त्या स्थळाला फोन केला होतास का?”
“अगं, केला होता. पण त्यांना त्यांच्या परिवारातलीच पाहिजे म्हणे. मुलाची आईच    होती फोनवर. बोलायला चांगली वाटली. त्यांची मोठी सूनही परिवारातलीच आहे म्हणे.”
“अगं, कसला परिवार?”
“त्यांचे एक गुरू आहेत. त्यांच्या भक्तगणांना ते परिवार म्हणतात.”
“म्हणजे मुलगी त्या बाबांची भक्त आहे की नाही इतकंच बघणार ते?”
“मुख्य निकष तो. बाकी सगळं नंतर. जाऊ दे, हे गुरू-बाबा-माता असलं काही सीमाला चालणारच नाही. मुळात ती वृत्ती असावी लागते. नकोच ते. तसंही त्यांना परिवारातलीच हवी आहे. त्यामुळे पुढे जाण्याचा प्रश्नच नाही.”
“काय गं, तुमच्या अमेयच्या लग्नाचं कुठवर आलं?”
“नाही गं, अजून काही. छोट्या छोट्या गोष्टींवरून राहून जातंय बघ. कालचीच गोष्ट सांगते. काल तो एका मुलीला भेटायला गेला होता. हल्ली मुलंच स्वत: भेटून काय ते ठरवतात. ते असू दे. तर कालची मुलगी अगदी अंधश्रद्धाळू होती. उपास, शुभ-अशुभ, राहू-काल, खडे-अंगठ्या सगळं मानणारी आणि त्याचप्रमाणे वागणारी. आमच्याकडे आम्हाला तिघांनाही हे जमणार नाही. हे लग्न झालं तर आम्हाला जाच होईल आणि तिला बिचारीला आमच्या घरात कायम खटकत राहील. कायम धास्तावल्या मनानं राहायला लागेल? अमेयने तिथल्या तिथेच जमणार नाही म्हणून संगितलं.”
“अगदी योग्य केलं त्यानं. खरं तर दोघं भेटून या मुद्द्यावर बोलले हयाबद्दल त्यांचं कौतुक करायला पाहिजे.”
“काय रे, कालचं स्थळ कसं वाटलं?”
“ं नाव ठेवण्यासारखं काही नाही. पण मंडळींनी देवधर्म अगदी गुंडाळून ठेवलाय.”
“तुला एकदाच जाऊन कसं कळलं?”
“अरे मला त्यांनी पूर्ण घर दाखवलं. स्वत:च म्हणाले, ‘तुम्हाला मुलगी द्यायचीय, बघून घ्या.’ अरे देव्हारा सोड. एक साधा फोटोसुद्धा दिसला नाही. न राहवून शेवटी मी विचारलं. तर म्हणाले, ‘आमचा विश्वास नाही. आमचा नाही म्हणून मुलांचाही नाही.”
“नसू दे ना. तुला काय फरक पडतो?”
“फरक पडतो रे. असा देवधर्म पार गुंडाळून ठेवला म्हणजे सगळं रान मोकळं. कसली भीती नाही, बंधन नाही. काहीही खा. काहीही प्या. कसंही वागा. मला कुणावर आरोप करायचे नाहीत, पण रिस्क वाटते. पोटची पोर द्यायचीय.”
“अरे मी ओळखतो त्यांना. खूप चांगली माणसं आहेत. मुलगासुद्धा गुणी आहे. काहीतरी बोलून स्थळ हातचं घालवू नकोस. देवपूजा न करणारा म्हणजे दुराचारी असं कुठे लिहून ठेवलंय का? नाही ते फालतू विचार करू नकोस. उद्या त्यांना फोन कर. मुलांना एकदा भेटू दे. मग बाकीचा विचार करू.”
..........
हल्ली देवभोळेपणापेक्षा बाबा, माता, बापू, मैय्या वगैरे प्रस्थ वाढलं आहे. लग्न जमण्यात हा एक अडसर ठरतोय. अनेक घटस्फोटही यामुळे होत आहेत. कारण या तथाकथित भक्तीत म्हणा, उपासनेत म्हणा, अनेकदा माणसं इतकी गुंततात की त्यांचं वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याकडे दुर्लक्ष होतं किंवा ते प्रत्येक गोष्ट त्याच उपचारांनी करण्याचा आग्रह धरतात. त्यानं नातेसंबंध बिघडतात. लग्न ठरवताना या गोष्टीचा विचार सहसा केला जात नाही, कारण श्रद्धेच्या बाबतीत आपण काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. जशा की,
  • पूजा, उपास-तापास केले नाहीत तरी प्रत्येकाच्या मनात थोडीतरी श्रद्धा असतेच.
  • देवाधर्मावर श्रद्धा असणारी माणसं निश्चित सहृदयी, सदाचारी असणार.
  • नास्तिक व्यक्ती म्हणजे बेछूट बेलगाम. देवाची चाड नाही तिथे माणसांची कुठून असणार?
  • स्वत:ची श्रद्धा नसली तरी पूजाअर्चा केल्याने नुकसान नाही. ते वाईट काम नाही.
  • पोरवयात असे विचार असले तरी संसारात पडले की सगळेजण ‘सुधारतात’.
या म्हणण्याला दुसरी बाजूही आहे.--
  • हा विचारांचा, तत्त्वाचा प्रश्न आहे. जिचे विचार कर्मकांडविरोधी आहेत त्या व्यक्तीसाठी पूजाअर्चा करणं त्रासदायक असतं. शिवाय ती वरवरची पोकळ कृती ठरते आणि श्रद्धाळू व्यक्तीला या पोकळपणाचा त्रास होतो.
  • शकुन-अपशकुन यावर ज्यांचा विश्वास नसतो, त्यांच्याकडून ही पथ्यं पाळली जात नाहीत. त्यांच्या लक्षात राहत नाही. परंतु अशा गोष्टी मानणाऱ्या व्यक्तीचं मन या चुकांमुळे धास्तावतं. मनात धास्ती असणं नात्याला बाधक ठरतं.
म्हणून लग्न ठरवताना याचा विचार करायला हवा. खरंतर ं आपली श्रद्धा ही आपली वैयक्तिक बाब ठेवावी. त्यात दुसऱ्या कुणाला अगदी जोडीदारालासुद्धा अडकवू नये. कडवेपणा असू नये. दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन आपली श्रद्धा ठेवावी. त्याहून महत्त्वाचं म्हणजे होकार देण्यापूर्वी एकमेकांशी या बाबतीत स्पष्ट बोलावं.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link