Next
राज्यसेवा पूर्वपरीक्षा सामान्य विज्ञान
फारुक नाईकवाडे
Friday, April 05 | 04:00 PM
15 0 0
Share this story

राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये विज्ञान हा घटक म्हटला तर सोपा, म्हटला तर अवघड असा आहे. योग्य पद्धतीने विश्लेषण करून तयारी केली तर कोणत्याही शाखेच्या उमेदवारांना हा हमखास गुण मिळवून देणारा विषय आहे.  कला व वाणिज्य या शाखांतील उमेदवारांना विज्ञानातील संकल्पना समजायला वेळ लागू शकतो आणि त्यामुळे संबंधित विषय अवघड वाटू लागतो. त्यातच अभ्यासक्रमावरील म्हणून बाजारात उपलब्ध असलेली पुस्तके ज्या त्या लेखकाच्या परिप्रेक्ष्यातून रचण्यात आलेली असतात. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडते. हा विषय सोपा करून वाचायचा असेल तर दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत - मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि राज्य पाठयपुस्तक मंडळाची पुस्तके.
इतर पारंपरिक विषयांच्या तुलनेत विज्ञान या विषयाच्या परीक्षेतील प्रश्न विचारण्याची पद्धती, प्रश्नांचा दर्जा यामध्ये एक प्रकारचे सातत्य असल्याने प्रश्नांचा पॅटर्न आणि अपेक्षित प्रश्न शोधणे तुलनेने सोपे असते. गेल्या काही वर्षांपासून वर्गीकरण पद्धती, वनस्पतींचे रोग, पोषणपद्धती यावर सर्वाधिक प्रश्न विचारले गेले आहेत. ते नीट बघा. त्याआधारे पुढीलप्रमाणे तयारी करता येईल-

वनस्पतिशास्त्र व प्राणिशास्त्र
  • वर्गीकरणाच्या पद्धती व संबंधित शास्त्रज्ञ, विविध संच व विभाग व त्यातील प्राणी/वनस्पती व त्यांची वैशिष्ट्ये, हा अभ्यास वस्तुनिष्ठ पद्धतीने करावा.
  • अवयवसंस्थांमधील वस्तुनिष्ठ बाबींवरच लक्ष द्यावे. प्रत्येक संस्था, अवयवसंस्था एक वेळ काळजीपूर्वक वाचून प्रत्येक संस्थेवर किमान १० प्रश्न स्वतःहून लिहून काढावेत किंवा तयार करावेत.
सूक्ष्मजीव या विषयावर केवळ एकच प्रश्न विचारला जातो म्हणून विविध सूक्ष्मजीव, त्यांपासून होणारे फायदे-तोटे यांचा एक तक्ता तयार ठेवल्यास विचारला जाणारा एकमेव प्रश्नदेखील खात्रीने गुण मिळवून देईल.

आरोग्य व रोगनिवारण
आरोग्यशास्त्र घटकाचा अभ्यास करताना प्रत्येक घटकाचा एक तक्ता बनवून अभ्यास केल्यास वरील सर्व गोष्टी लक्षात ठेवणे अधिक सोपे होईल.
  • रोगांचे प्रकार - जिवाणूजन्य, विषाणूजन्य, कवकजन्य, आदिजीवजन्य, संसर्गजन्य, असंसर्गजन्य, लैंगिकदृष्ट्या पारेषित होणारे, आनुवंशिक आजार समजून घ्यावेत.
  • वरील सर्व रोगांचा त्यांची लक्षणे, कारणीभूत घटक, प्रसार, बाधित होणारे अवयव, उपचारपद्धती अशा मुद्यांच्या अनुषंगाने अभ्यास करावा. यासाठीही तक्ता तयार करता येईल.
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादा रोग जास्त चर्चेमध्ये असेल तर त्याचे स्थान, प्रसार, उपचारासाठी केले जात असणारे प्रयत्न इत्यादी चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या घटकावर विचारले जाणारे प्रश्न थेट, वस्तुनिष्ठ, चालू घडामोडींवर आधारित असतात म्हणून या तिन्ही बाबींकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.

पोषण
  • स्थूल पोषणद्रव्ये - कर्बोदके, प्रथिने, मेद या तिन्ही स्थूल पोषणद्रव्यांपासून मिळणारी ऊर्जा, त्यांचे महत्वाचे घटक, कमतरता व आधिक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या इत्यादी मुद्यांच्या आधारे अभ्यास करावा. याबाबत नवे शोध किंवा चर्चा अशा चालू घडामोडींवर लक्ष असायला हवे.

सूक्ष्म पोषणद्रव्ये - जीवनसत्त्वे, खनिजे व क्षार या पोषणद्रव्यांचा स्रोत, शरीरावरील त्यांचे परिणाम, कमतरता व आधिक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, ठरावीक जीवनसत्त्वांचे इंग्रजी नाव व त्या जीवनसत्त्वाचा महत्त्वाचा घटक याची माहिती असणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय व जागतिक स्तरावरील घडामोडी
  • आरोग्यपोषणाशी संबंधित शाश्वत विकास उदिष्ट्ये (Sustainable Development Goals) आणि त्याबात भारतातील उपक्रम माहीत असायला हवेत.
  • आरोग्य व पोषणाबाबतच्या WHO व इतर संघटनांचे निर्देशांक, महत्त्वाच्या घोषणा, रोगांच्या साथी व त्याबाबतचे उपाय याबाबत अद्ययावत माहिती असायला हवी.
आरोग्य व पोषणाबाबतच्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या महत्त्वाच्या तरतुदी नेमकेपणाने माहीत असाव्यात.

पर्यावरणीय मुद्दे
  • जैवविज्ञान विषयातील पर्यावरण हा हक्काचे गुण मिळवून देणारा घटक आहे, असे म्हणता येईल. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये किमान एक प्रश्न हा हरितगृह वायू व पर्यावरणीय हानिकारक घटक यांवर हमखास विचारलेला असतोच.
मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून महत्त्वाच्या आणि संभाव्य घटकांवर जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ‘राज्यसेवा अभ्यास प्रश्नपत्रिका’ हे ‘राष्ट्र चेतना’चे सराव प्रश्नपुस्तक उपयुक्त ठरते.
वरील सर्व घटकांसाठी शालेय पुस्तके हा सर्वात चांगला पर्याय आहे. वर्गीकरणासंबंधी विशेष अभ्यास करावयाचा असल्यास इ. ११ वीचे विज्ञानाचे पाठ्यपुस्तक अतिशय उपयुक्त आहे. ते व्यवस्थित वाचावे.
मागील काही परीक्षांमध्ये यांमधून थेट प्रश्नदेखील विचारले गेल्याचे दिसते. वरील सर्व घटकांच्या पाठांतराऐवजी संकल्पना व वस्तुनिष्ठ बाबी समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. विज्ञानमधील जुन्या सर्वमान्य संकल्पना व  त्याचे निष्कर्ष बदलत नाहीत. म्हणून काही नवीन बाबी सोडल्यास अभ्यासक्रमामध्ये दिले गेलेले विज्ञानाचे पाठ योग्य रीतीने समजून घेतल्यास इतर विषयांपेक्षा जास्त गुण या घटकातून मिळू शकतात. त्याचा बागुलबुवा बिलकुल बाळगू नका. n

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link