Next
बॅडमिंटनपटूंसाठी ‘पीबीएल’ धमाका
नितीन मुजुमदार
Friday, December 28 | 04:00 PM
15 0 0
Share this storyप्रीमिअर बॅडमिंटन लीग या स्पर्धेच्या अनुषंगाने एकेकाळी ऑलिंपिक पदकापासून केवळ एक विजय दूर राहिलेल्या परूपली कश्यपशी संवाद साधताना काही वर्षांपूर्वी त्याने काढलेले उद्गार आठवतात जे आजही काहीसे समर्पक आहेत. तो म्हणाला होता, “या खेळात आर्थिक बाजू पुरेशी भक्कम नाही. बॅडमिंटनच्या आणि पर्यायाने खेळाडूंसाठीही या खेळात पुरेसा पैसा आला पाहिजे.” आज परिस्थिती फार नसली तरी थोडीफार बदलली आहे.

प्रीमिअर बॅडमिंटन लीगने काहीशा अडखळत्या सुरुवातीनंतर यंदा चौथ्या सीझनमध्ये प्रवेश केला आहे. बॅडमिंटनमधील पैशांबद्दल बोलायचे झाल्यास परिस्थिती आता पूर्वीइतकी वाईट नक्कीच नाही, पण फार चांगली आहे, असेही नाही. आधी पुरस्कर्ते की आधी लोकप्रियता, हे प्रश्न क्रिकेट वगळता भारतात इतर खेळांना कायम भेडसावत असतात. पुरस्कर्ते नाहीत म्हणून खेळाडू व प्रेक्षकांवर परिणाम आणि खेळाडू व प्रेक्षक दिसत नाहीत म्हणून पुरस्कर्त्यांवर परिणाम, असे हे दुष्टचक्र आहे. सुदैवाने बॅडमिंटन आता या दुष्टचक्राला भेदू पाहत आहे. याचे श्रेय अर्थातच ‘बीएआय’ला  म्हणजेच बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया या बॅडमिंटनच्या राष्ट्रीय संघटनेला व त्यांच्या स्टार खेळाडू तसेच कोच यांना द्यावे लागेल.

पूर्वी नंदू नाटेकर, प्रकाश पदुकोन हे जागतिक पातळीवर फारसा आर्थिक पाठिंबा नसतानादेखील चमकले होते. गोपीचंदने आधी खेळाडू म्हणून आणि नंतर कोच म्हणून हा खेळ अधिक रुजवला. या खेळाची लोकप्रियता वाढण्यामध्ये गोपीचंदचादेखील महत्त्वाचा वाटा आहे. त्याच्या अकादमीच्या सायना, सिंधू, श्रीकांत यांसारख्या खेळाडूंनी जागतिक पातळीवर सातत्याने ठसा उमटवला आहे. अलिकडच्या काळात बेंगळूरू येथे प्रकाश पदुकोन बॅडमिंटन अकादमीनेदेखील चांगली कामगिरी केली आहे. पुण्यात माजी ऑलिंपियन निखिल कानिटकर बॅडमिंटन अकादमीनेसुद्धा पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दशकभरात भारतीय बॅडमिंटनने जागतिक नकाशावर स्वतःचे स्थान अधिक ठळक केले आहे. मात्र भारतात क्रिकेट आणि इतर ऑलिंपिक मान्यता असलेल्या खेळांमधील दरी अनाकलनीय आहे हे नक्की. आजही संपूर्ण प्रीमिअर बॅडमिंटन लीगचे बजेट हे आयपीएलच्या निवडक दोन खेळाडूंच्या मानधनाएवढे आहे, ही बाब नक्कीच स्पृहणीय नाही. परिस्थिती पहिल्या इतकी वाईट नक्कीच नाही, मात्र अजूनही लोकप्रियता, पुरस्कर्ते या बाबतीत मोठी दरी क्रिकेट आणि इतर खेळांमध्ये स्पष्ट दिसते.

ठाण्याचे प्रसिद्ध बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड म्हणतात, “आयपीएलप्रमाणेच पीबीएलमध्ये बॅडमिंटनच्या मूळ स्वरूपात थोडे आवश्यक बदल करण्यात आले आहेत. गेममधील पॉइंटची संख्या २१वरून १५वर आणण्यात आली आहे. तसेच गेममधील स्कोअर १४/१४ झाल्यावर १५वा पॉइंट जिंकणारा खेळाडू गेम जिंकेल.” प्रत्येक लढतीत ५ सामने होतील, दोन मेन्स सिंगल्स, एक वुमेन सिंगल्स व मेन्स-मिक्स्ड डबल्सचा प्रत्येकी एक-एक सामना असे प्रत्येक लढतीचे स्वरूप असेल. वुमेन डबल्सला या पीबीएल आवृत्तीत स्थान मिळालेले नाही.

पीबीएलचा तिसरा लेग २९ डिसेंबरपासून पुण्यात आहे. बॅडमिंटनमधील पहिले पोस्टरबॉय म्हणून ओळखले जाणारे नंदू नाटेकर हे पुण्याचेच. आता ८६ वर्षे वय असलेल्या नंदू नाटेकरसरांशीही पुण्यातील पीबीएल स्पर्धेनिमित्त संवाद साधला. सरांच्या वेळी खेळले जात असलेले बॅडमिंटन आणि सद्यस्थितीतील बॅडमिंटन याबाबत ते म्हणाले, “सध्या बॅडमिंटनमध्ये खेळाच्या वेगालादेखील प्रचंड महत्त्व आले आहे, तसेच खेळाडूंच्या फिटनेस लेव्हल्सदेखील कमालीच्या उंचावल्या आहेत, अर्थात स्पर्धांची संख्यादेखील खूप असते, त्यामुळे शारीरिक क्षमतेवर अधिक भर देणे खेळाडूंसाठी क्रमप्राप्त आहे.” १९५४ साली ते सर्वप्रथम ऑल इंग्लंड स्पर्धा खेळले. त्यावेळी आर्थिक नियोजन कसे करावे लागले याबाबतच्या रंजक आठवणीही त्यांनी सांगितल्या. सरांचा मुलगा गौरव आणि सून आरती आंतरराष्ट्रीय टेनिसपटू, तर नातू गोल्फमध्ये नाव कमावतोय.

स्पर्धेच्या दुसऱ्या लेगमध्ये गतविजेत्या पी.व्ही. सिंधूच्या हैदराबाद हंटर्स संघाने आपल्या पहिल्या दोन्ही लढती जिंकून प्रतिस्पर्धी संघांवर आघाडी घेतली होती. प्रथम त्यांनी पुणे सेव्हन एसेसला, तर नंतर चेन्नई स्मॅशर्सला सहज पराभूत केले.

या लीगसाठी २३ देशांतील सुमारे १४३ खेळाडूंचा लिलाव झाला. यंदा सर्वाधिक नऊ संघ या लीगमध्ये सहभागी झाले आहेत, ही गोष्ट बॅडमिंटनसाठी नक्कीच चांगली आहे. प्रत्येक संघाला लिलावासाठी प्रत्येकी २.६० कोटी रुपयांची मर्यादा घालून देण्यात आली होती, तर वैयक्तिक बोलीवर  कमाल ८० लाख रुपयांचे बंधन होते. सिंधू, सायना, कॅरोलिना मरीन, व्हिक्टर अॅलेक्सन, श्रीकांत आदी सिंगल्समधील जागतिक कीर्तीचे नामवंत खेळाडू लीगमध्ये खेळत असल्याने लीगमधील उदयोन्मुख भारतीय खेळाडूंनादेखील याचा खूप फायदा होईल. या नावांमुळे स्पर्धेची स्टार व्हॅल्यूही वाढली आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १३ जानेवारीला बेंगळुरू येथे खेळला जाईल.‘पीबीएल’ची वैशिष्ट्ये

  • जागतिक क्रमवारीत ११वा असलेला इंडोनेशियाचा टॉमी सुगीआरतो हा आयकॉन नसलेला व सर्वाधिक बोली लाभलेला खेळाडू आहे. त्याला (३० लाख रुपये बेसप्राइस) ७० लाख रुपयांना करारबद्ध करण्यात आले आहे.
  • डबल्समधील उगवता खेळाडू सात्विक साईराज रानिकेरेड्डी (१५ लाख रुपये बेसप्राइस) याला ५२ लाख रुपयांची लॉटरी लागली.
  • तीन वेळा जगज्जेतेपद मिळवलेली कॅरोलिना मरिन ही अभिनेत्री तापसी पन्नू मालक असलेल्या पुणे सेवन एसेस संघाकडून खेळत आहे. गतवर्षी ती स्पर्धाविजेत्या हैदराबाद हंटर्स संघाकडून खेळली होती. पुणे सेव्हन एसेस संघाकडून माथीअस बोए व उगवता लक्ष्य सेन हेदेखील खेळतील. त्यांना अनुक्रमे ५० लाख व ११ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती.
  • अहमदाबाद स्मॅश मास्टर्सने माजी जगज्जेता व्हिक्टर एक्सेलसेन व साई प्रणिथ यांना करारबद्ध केले आहे.
  • के. श्रीकांतला आयकॉन प्लेअर म्हणून बेंगळुरू रॅपटर्सने संघात घेतले आहे.
  • दिल्ली डॅशर्सने एच.एस. प्रणयसाठी तब्बल ८० लाख रुपये मोजून आयकॉन प्लेअर म्हणून करारबद्ध केले आहे.
  • चेन्नई स्मॅशर्स संघाने कोरियाच्या सुंग जी हुयूनला आयकॉन प्लेअर केले आहे, तर सायना नेहवालला नॉर्थ ईस्टर्न वॉरिअर्सने ८० लाख रुपयांची बोली लावून संघात घेतले आहे. पी.व्ही. सिंधू यंदा हैदराबाद हंटर्सची आयकॉन खेळाडू आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link