Next
‘आठवणीतला गणेशोत्सव’
प्रतिनिधी
Friday, August 30 | 01:45 PM
15 0 0
Share this story

प्रथम विजेता
अशोक के. नाडकर्णी
कोथरूड, पुणे
-------------------------------------------------

उंदरांनी प्रेक्षकांना पळवलं


असं म्हणतात, की आठवणी जुन्या झाल्या तरी त्या जपायच्या असतात. आठवणी या गोड असो, अथवा कडू, पण आपलं मन भूतकाळात गेल्यावर त्या अचानक आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात अन् मनाची एक विचित्र अवस्था होते.
माझ्या शालेय जीवनाचा काळ आठवतो. भारत स्वतंत्र झाला होता. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्रात सर्वत्र साजरा होत असे. मला आठवतं, आम्ही म्हणजे माझे चार भाऊ, आईवडील हे एका छोट्या खेडेगावात राहत होतो. आगाशी हे गाव विरार स्टेशनपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. त्यावेळी मी साधारण बारा वर्षांचा असेन. काशीदास घेलाभाई हायस्कूलमध्ये मी शिकत होतो. आमच्या गावात दरवर्षी दहा दिवस सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यानं साजरा होत असे. त्यावेळी मेळे असत. म्हणजे छोट्या नाट्यछटा सादर केली जात. तसंच कीर्तन व गाण्यांचे कार्यक्रम होत असत. शेवटच्या दिवशी मोठ्या पुढाऱ्यांची भाषणं होत असत. दहा दिवसांत भरगच्च कार्यक्रम असत. ते मोठ्या आनंदात पार पडत असत.
मला आठवतं, एके वर्षी एक छोटं दोन अंकी गुजराती नाटक सादर केलं गेलं होतं. नाटकाचं नाव होतं- ‘छेल्ली अमानत.’ त्यात माझा मित्र डायाभाईनं काम केलं होतं. नाटक म्हटलं की प्रेक्षकांची भरपूर गर्दी व्हायची. या नाटकाचा मोठा बोर्ड मारुतीमंदिरासमोर, तळ्याजवळ एक आठवडा लावलेला होता. जाणारे-येणारे तो बोर्ड पाहून मोठ्या उत्सुकतेनं या नाटकाच्या दिवसाची वाट पाहत होते. या नाटकाचा प्रयोग गणेशविसर्जनाच्या आदल्या दिवशी ठेवला होता. त्याच्या एक दिवस आधी कुणा वात्रट मुलानं बोर्डावर खडूनं लिहिलेल्या नावातील ‘अमानत’ शब्द खोडून ‘हजामत’ केला. लोक ते नाव वाचून बुचकाळ्यात पडले व हसत सुटले.
एकदाचा नाटकाचा दिवस उजाडला. बायका-पुरुषमंडळी व छोट्या मुलांची नाटक सुरू होण्याआधी साधारण एक तास गर्दी झाली होती. भारतीय बैठक असल्यामुळे मोठमोठ्या सतरंज्या तळ्याजवळील रस्त्यावर अंथरण्यात आल्या. नाटक बरोबर रात्री आठ वाजता सुरू झालं. सुसज्ज स्टेजवर पडदे लावले होते. पडदा कधी खाली पडतो व नाटक कधी सुरू होतं असं प्रेक्षकांना झालं होतं. पडदा वर गेला व स्टेजवर एक छोटं कुटुंब दाखवलं होतं. एक पोक्त बाई, तिचा मुलगा व दोन छोटी मुलं गुजराती बोलत होती. माझा मित्र डायाभाईची एंट्री होते व त्याचे संवाद चालू होतात. एका ठिकाणी तो म्हणतो, “बेटा, जुदा जुदा कपडा पेहनवानुं अने फरवा जवानुं.” त्याचवेळी कुणा वात्रट पोरानं दहा-बारा उंदीर पोत्यातून मागून हळूच सोडले. बसलेल्या प्रेक्षकांचा त्या उंदारांमुळे इतका गोंधळ उडला व ते सर्वजण पळू लागले. मीसुद्धा पळू लागो. नाटक थोडा वेळ बंद पडलं. कुणीतरी पुढारी स्टेजवर येऊन लोकांना शांत बसा म्हणून विनंती करू लागला. पंधरा मिनिटांनी नाटक पुन्हा सुरू झालं व प्रेक्षक स्थानापन्न झाले. उंदीर कुठे गेले ते समजलं नाही, पण तो गणेशोत्सव आजही आठवला की हसू येतं.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link