Next
होऊ कसा उतराई!
स्वप्निल जोशी
Friday, June 07 | 03:00 PM
15 0 0
Share this story

नमस्कार, मी स्वप्निल जोशी. आजपासून पुढचे चार आठवडे या लेखमालिकेच्या माध्यमातून मी तुमच्याशी बोलणार आहे, माझ्या प्रवासाविषयी सांगणार आहे. माझा जन्म गिरगाव, मुंबईचा. झावबाच्या वाडीतली लक्ष्मीबाई चाळ. साधारण तीस वर्षांपूर्वी गिरगाव ही मुंबईची सांस्कृतिक राजधानीच होती. सण, उत्सव, नाटक, चित्रपट यांची रेलचेल.     

गल्लोगल्ली गणेशोत्सव असायचे. आमच्याही गल्लीत व्हायचा. मी हौसेनं सगळ्या स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचो. छोट्या छोट्या नाटुकल्या करायचो. चाळीतल्याच एखाद्या काकांनी मुलांची नाटकं बसवलेली असायची. स्टेजवरची मुलं सोडून बाकी सगळ्यांना सगळे डायलॉग पाठ असायचे. अशा गमतीशीर आणि छान सांस्कृतिक वातावरणात मी वावरत होतो. तो काळ होता ‘रामायण’ मालिकेचा. त्या मालिकेचं लोकांवर किती गारूड होतं हे सगळ्यांना माहीतच आहे. त्यात प्रसिद्ध मराठी अभिनेते विलासराज एका राक्षसाची भूमिका करत होते. ते एकदा आमच्या गणेशोत्सवाला आले होते आणि त्या दिवशी आमचं मुलांचं नाटक पाहायला थांबले. ‘रामायण’ मालिकेतील त्यांच्या भूमिकेमुळे लोक त्यांना चांगले ओळखत होते. ते चाळीत आल्यावर सगळे खुश. तेव्हा कलाकारांच्या सह्या घेण्याची पद्धत होती. आम्ही मुलांनीही त्यांच्या सह्या वगैरे घेतल्या. आमचं नाटक पाहिल्यावर त्यांनी विचारलं, की ‘तो अमुक अमुक कपडे घालून काम करणारा मुलगा कोण आहे? मला त्याला भेटायचं आहे.’ चाळीतल्या मोहन जोशींचा मुलगा हे कळल्यावर ते माझ्या बाबांना भेटायला घरी आले. त्यावेळी ते ‘हा स्वर्ग सात पावलांचा’ नावाचं नाटक करत होते. त्यातील भूमिकेसाठी त्यांना मी योग्य वाटलो. नाटक मे महिन्यात करायचं होतं त्यामुळे अभ्यास, शाळा बुडण्याचा प्रश्न नव्हता. बाबांनी परवानगी दिली आणि मी ते नाटक केलं. त्यानिमित्तानं अधूनमधून मी त्यांच्याबरोबर तालमी करायचो. त्यांच्या घरी जायचो. माझं वागणं, बोलणं, संस्कार त्यांना खूप भावले. त्याच सुमारास त्यांना मुलगा झाला तर त्याचंही नाव त्यांनी स्वप्निलच ठेवलं.

नेमकं त्याचवेळी तिकडे रामानंद सागर उत्तररामायण मालिकेसाठी नव्या कलाकारांचा शोध घेत होते व त्यांना काही लहान मुलंही ‘कास्ट’ करायची होती. हे कळल्यावर विलासकाकांनी माझ्या नकळत माझं नाव आणि नाटकातले एक-दोन फोटो रामानंद सागरांच्या ऑफिसला पाठवून दिले. त्याकाळी आमच्या अख्ख्या चाळीत एक फोन होता. तो नंबर त्यांनी केअरऑफ म्हणून दिला. काही दिवसांनी विलासकाकाही विसरून गेले. आम्हाला तर या गोष्टीची कल्पनाच नव्हती. एक दिवस आमच्या त्या नंबरवर फोन आला. तेव्हा पद्धत अशी होती की निरोप द्यायचे दहा पैसे आणि फोनवर बोलायला आल्यास चार आणे की आठ आणे. ज्यांच्याकडे फोन होता त्या काकू बाबांना सांगायला आल्या की रामानंद सागरांच्या ऑफिसमधून फोन आलाय, तुमच्या मुलाशी बोलायचंय. बाबांना वाटलं कुणीतरी मस्करी करतंय. कारण मी नऊ वर्षांचा. मला कुणाचा फोन येणार! म्हणून त्यांनी सांगितलं की ‘राँगनंबर म्हणून सांगा त्यांना.’ त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन आला, पुन्हा बाबांनी तोच निरोप दिला. तिसऱ्या दिवशीही परत तेच. बाबांना वाटायचं की खरंच कुणीतरी मस्करी करतंय. रामानंद सागरांच नाव तेव्हा परिचित झालंं होतं. अर्थात माझे फोटो त्यांना पाठवल्याचं आम्हाला अजिबातच माहीत नसल्यानं हा घोळ होत होता. अखेर सातव्या की आठव्या दिवशी स्वतः मोती सागर यांनी फोन केला आणि त्या मुलाच्या वडिलांशी बोलायचं आहे असा त्यांचा निरोप आला. तेव्हा बाबांना पहिल्यांदा वाटलं की हे काहीतरी खरं आहे. बाबांनी फोन घेतला तेव्हा खरंच मोती सागर बोलत होते. ते आमच्यावर चिडले होते. त्यांना कल्पना नव्हती की ते फोटो आम्ही पाठवलेच नव्हते. त्यांना वाटत होतं की फोटो पाठवतात आणि फोन केला तर मात्र बोलायला येत नाहीत, हा काय चावटपणा आहे, म्हणून ते बाबांना म्हणाले की, “आम्ही इतके दिवस फोन करतोय, तुम्ही निदान नकार द्यायला तरी फोनवर या.” मग बाबांनी त्यांना सगळा उलगडा केला. बाबा त्यांना म्हणाले की, “अहो सर, तुम्ही विचार करा, गिरगावातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या माणसाला अचानक थेट रामानंद सागरांच्या ऑफिसमधून फोन आला की तुमच्या मुलाला ‘कास्ट’ करायचं आहे तर कुणी कसा विश्वास ठेवेल? माझ्याजागी तुम्ही असतात तर तुम्ही तरी ठेवला असता का?” सगळा प्रकार कळल्यावर ते शांत झाले. त्यांना बाबांचा स्वभाव खूप आवडला. हा माणूस सच्चा आहे याची त्यांना खात्री पटली. त्यांनी बाबांना सगळं सांगितलं आणि मला घेऊन बोलावलं. तरीही जाण्यापूर्वी बाबांनी विलासकाकांकडून खात्री करून घेतलीच.

तो पहिला टर्निंग पॉइंट ठरला. माझ्या चार-पाच वेगवेगळ्या ऑडिशन झाल्या. एखादी छोटीशी भूमिका असेल असं वाटलं होतं. परंतु मला थेट रामाच्या मुलाची, कुशचीच, भूमिका मिळाली आणि आयुष्यात एका नव्या, वेगळ्या वाटेवरून नवा प्रवास सुरू झाला. गिरगावातल्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मोहन जोशी यांच्या मुलानं या क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकलं. आई-वडिलांचे संस्कार आणि त्यांची पुण्याई एवढीच माझ्या गाठीशी होती. अनुभव वगैरे काहीच नव्हता. पण आई-बाबा सतत माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आई-बाबांनी माझ्यासाठी त्याकाळात त्यांची बढती एकदा नाही तर अनेकदा नाकारली आहे. कारण बढती स्वीकारली की बदली आली आणि बदली झाली तर मला काम सोडावं लागेल! त्यांनी कधी जाणवू दिलं नाही परंतु माझ्यासाठी, मला न्याय देता यावा म्हणून त्यांनी असे त्याग अनेकदा केले . रामायणातील भूमिकेमुळे लोकांना तर मला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं. प्रसिद्धी मिळाली, परंतु आई-बाबांनी माझा हात घट्ट धरून ठेवला होता. ज्यांच्याबरोबर काम करायला मिळालं तीही सगळी चांगली माणसं होती. त्यामुळे त्या टप्प्यावर, त्या वळणावर चुकीच्या सवयी लागण्याचा किंवा स्टारडममध्ये वाहून जाण्याचा प्रश्नच नव्हता. आई-बाबांच्या संस्कारांची बैठक एकदम मजबूत होती. आज कळतं की त्यांनी किती साथ दिली मला! होऊ कसा उतराई असं मला म्हणावंसं वाटतं.

मी अभ्यासात हुशार होतो. ‘रामायण’ संपल्यानंतर मी पुन्हा माझ्या अभ्यासाकडे वळलो. नेहमीचा दिनक्रम सुरू झाला.त्यानंतर पाच-सहा वर्षांनी रामानंद सागरांनी पुढच्या मालिकेची घोषणा केली ती होती ‘कृष्णा.’ या मालिकेनं माझं आयुष्य बदललं आणि याच क्षेत्रात करिअर करायचं या निर्णयापर्यंत मला आणून ठेवलं. त्याविषयी पुढील भागात..
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link