Next
कळीदार कपूरी पान कोवळं छान
वसुधा गवांदे
Friday, September 20 | 03:00 PM
15 0 0
Share this storyपावसाळ्याच्या सुरुवातीला कांदाभजी करण्याचा सगळ्यांना उत्साह असतो. यावर्षी चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे अधेमधे भजी खाण्याचा मूड असू शकतो. कांदा किंवा बटाटाभजी एव्हाना दोन-चार वेळा तरी करून झाली असतील तर मग आता विड्याच्या पानांची भजी करा. या दिवसांत विड्याच्या पानांची वेल छान बहरते. हिरवीगार कोवळी लुसलुशीत पानं वेलीला लगडलेली असतात. ती वेल पाहून मन प्रसन्न होतं. या कोवळ्या पानांना छान चव असते. तुम्ही नुसती ही पानं चावून खाल्लीत तरी तोंडाला चव येते. तुमच्या बाल्कनीत विड्याची वेल असेल तर उत्तमच. परंतु नसली तरी काही हरकत नाही. बाजारातून तुम्ही ही पानं आणू शकता. विड्याची पानं पानवाल्याकडे सहज विकत मिळतात. मात्र बाजारातून पानं आणताना नीट बघून आणा. किडलेली पानं घेऊ नका. पानं नीट धुऊन घ्या. एका मोठ्या भांड्यात दोन वाट्या बेसन, दोन मोठे चमचे तांदूळ पीठ, दोन मोठे चमचे मक्याचे पीठ एकत्र करा. त्यात ओवा, साखर, तिखट, मीठ, हळद आणि हिंग घाला. पाणी घालून  पीठ सरसरीत करा. पिठात थोडी साखर घाला, म्हणजे भजी तेलकट होत नाहीत. मक्याच्या पिठामुळे खुसखुशीतपणा येतो. चिमूटभर खायचा सोडा घाला म्हणजे भजी कुरकुरीत होतील. कढईत तेल तापत ठेवा. कालवलेल्या पिठात पाच-सहा पाने बुडवून ठेवा. तेल तापले की सर्व बाजूने पीठ लागलेले  एक-एक पान गरम तेलात सोडा व  भजी लालसर तळून घ्या. चटणी किंवा सॉसबरोबर खा. ही कुरकुरीत भजी खूप छान लागतात आणि लहान-मोठे सगळ्यांना आवडतात.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link