Next
भाषेतल्या गमती
- डॉ. नीलिमा गुंडी
Friday, April 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

कवितेची भाषा  ही काही वेळा अगदी खास भाषा ठरते.
एखादा कवी  कधी नवे शब्द तयार करतो,  तर कधी भाषेचा खुबीदार वापर करतो. मोठ्यांची भाषा मुलांना कशी गोंधळात पाडते,  हे सांगताना हेमा लेले लिहितात,
‘शाळा सुटते’, चड्डी  सुटते’
साखर पण म्हणे ‘सुटते’
मोठ्या  माणसांच्या बोलण्याचे
कोडे बघू केव्हा  सुटते?’

आपल्या भाषेतले वाक्प्रचार आणि शब्दप्रयोग यात मार्मिकपणे वापरले आहेत. अनंत  भावे ठरावीक अक्षरं पुन्हा वापरून  कशी मजा आणतात पाहा-
‘किडमिडे काकाकाकू
कधीही कडमडतात
कुर्रकुर्र ...किर्रकिर्र
कटकट करतात.”   

मंगेश पाडगावकर संस्कृत मंत्राची चाल वापरून  नवीच भाषा कशी  तयार  करतात पाहा -
‘अडमतडम् स्टुलावर चढम्
सांभाळून चढम्
नाहीतर पडम्
धडम् धडम्!”

विंदा करंदीकर यांच्या एका कवितेत तर ‘अगं’ आणि ‘कागं’ ही पऱ्यांची नावं असतात बरं का!
विजया वाड नवाच शब्द तयार  करून गंमत आणतात-
‘गुलाबजांबू ? गोलमटोल
बुंदी लाडू? गोलमगोल
जग सारे? गोलगोलगोल

गोलमटोल गोलमगोल गोलगोलगोल!’ अशा कविता म्हणतानाही मजा वाटते.  
सरिता पदकी यांची ‘गुलटं आणं’ ( म्हणजे ‘उलटं गाणं’) ही कविता  अक्षरांची उलटापालट साधत  ऐकणाऱ्याला कोड्यात  टाकणारी  नवी भाषा  घडवते, ती अशी –
‘वार वार गारा आला
जागेमध्ये बाऊ चला
कजा कजा मरू चला’
 
माझी ‘ टिंब’ ही कविता  एखाद्या लहान मुलासारख्या वागणाऱ्या अनुस्वाराच्या खोड्या वर्णन करते, त्या अशा –
‘नदी’चा केला नंदी
‘माडी’ची केली ‘मांडी’
‘बाबू’चा केला ‘बांबू’
‘कुडी’ची केली ‘कुंडी’

यातून तुम्हाला भाषेतल्या  लहानशा टिंबामधली अर्थाची उलटापालट करण्याची ताकद नेमकी लक्षात येते.  या कविता तुम्हाला एकीकडे हसवतात आणि त्याचवेळी भाषेकडे तुमचे लक्षही वेधतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link