
पुण्याचे प्रथितयश बांधकाम व्यावसायिक प्रदीप जोशी आणि शुभदा जोशी यांची धाकटी मुलगी मधुरा. शिक्षण सगळं पुण्यातच झालं. सिम्बायोसिस कॉलेजमधून मधुरा बीकॉम झाली. पुढे शिक्षण घेत राहण्यापेक्षा स्वतः काहीतरी नवीन प्रयोग करावेत असं तिला वाटत होतं. काम काय करावं, कोणता व्यवसाय करता येईल, आपल्याला काय नेमकं जमेल याचा मधुराला कोणताच अंदाज नव्हता. काहीतरी करण्याचा किडा मात्र डोक्यात पक्का घुसला होता. अशावेळी अचानक मधुराला आठवलं की आपल्या वडिलांनी कोकणात थोडीशी शेती घेऊन ठेवली आहे, जिथे राहता येण्यासारख्या दोन खोल्याही बांधलेल्या आहेत.
मधुराचे वडील प्रदीप जोशी यांनी रत्नागिरी पासून ८२ किलोमीटरवर असलेल्या छोट्याशा वारुळ या गावालगत थोडीशी शेतजमीन घेऊन ठेवली होती. कधीतरी जाता यावे यासाठी दोन खोल्याही बांधलेल्या होत्या. शेतीचा कोणताही अनुभव नाही, पिकामधले ओ का ठो कळत नाही, कोकणात राहण्याचा मुळीच अनुभव नाही आणि मातीत कधीही हातही घातलेला नाही अशा मधुरा जोशी या त्यावेळी ध्येय’वेड्या’ तरुण मुलीने वडिलांकडे हट्ट धरला की मला कोकणात जाऊन शेती आणि काहीतरी पूरक व्यवसाय सुरू करायचा आहे.
सगळ्या कुटुंबाला खरं तर हा एक मोठा धक्का होता. परंतु जोशी कुटुंब खरोखर वेगळा विचार करणारं असल्याने मधुराच्या प्रस्तावावर चर्चा झाली. आपल्या मुलीला मागे खेचण्यापेक्षा तिला काय करायचं आहे ते करून बघू दे असा सकारात्मक प्रतिसाद आई-वडिलांनी दिला. २०१३ मध्ये मधुरा कोकणात पोहोचली. लाल मातीत, प्रचंड पावसात, गडी माणसांकडून मदत घेऊन तिने काम सुरू केले. फार्महाऊस म्हणून परिसर विकसित करायचा असे मधुराच्या मनाने पक्के ठरवले. त्यासाठी नारळ, आंबा, फणस, काजू ही झाडे तिथे थोडीफार होती. त्यात आणखी भर टाकून मधुराने मसाल्याची रोपं मोठ्या प्रमाणावर उभी केली.
पुण्यातले जीवन आणि कोकणातले रोजचे व्यवहार फारच वेगळे होते. पुण्यासारख्या सुखसुविधाही उपलब्ध नव्हत्या. टेलिव्हिजन, फ्रीज तर नव्हता, शेतात कामासाठी माणसेही सहज मिळत नव्हती. मात्र मधुराला असं स्वतःला आजमावणं आवडायला लागले. ती आता गवत काढणे, पेंडया बांधणे अशी कामे चोखपणे करू लागली. हळुहळू तिने रेस्टॉरंटची तयारी सुरू केली. आतापर्यंत आसपासच्या परिसरात मधुरा जोशी या नावाची ओळख झाली होती. ‘थोड्या दिवसात जाईल परत पुण्याला’ असे समजणारे लोकही आता मधुराच्या कारभारावर लक्ष ठेवून होते. हॉटेल सुरू होतेय हे आजूबाजूच्या लोकांना समजेपर्यंत २०१४ मध्ये मधुरा जोशीचे रेस्टॉरंट सुरू झाले देखील !
‘कस्तुरी’ या नावाचे हॉटेल आता येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांना दिसू लागले. अर्थात त्यामागे मधुराची मोठी तपश्चर्या होती. पायाला कधी पाणीही लागलेले नाही अशा मुलीने एकदम समुद्रात उडी घेण्याइतके कठीण होते हे. कोकणात साप-विंचू यांचे सहज दर्शन घडते. त्यात लाइट सारखे जाणार, गॅस संपला की चूलच.. दुसरा पर्यायच नव्हता. बारीकसारीक सामान संपले तर आणायला थेट आठ-दहा किलोमीटर लांब जावे लागे. तिथेच राहत असलेली माणसेदेखील काही वेळा असहकार पुकारायची. पण आई-बाबा आणि मोठी बहीण यांनी अगदी खंबीर पाठिंबा दिला. मधुराने ज्या गोष्टीचा ध्यास घेतला आहे त्यासाठी तिच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे हे समजून आई किंवा बहीण लगेच वारूळला येऊन थडकायचे. मधुराचा निर्णय मग आणखी दृढ व्हायचा. सुरुवातीचे भांडवल म्हणून मधुराच्या बाबांनी तिला चाळीस हजार रुपये रोख दिले आणि वर्षभराचा किराणा भरून दिला. मात्र हॉटेलसाठी कारागीर, वेटर, गडी, पोळ्या करणाऱ्या बाई हे सगळे मधुरानेच जमवले. हॉटेल सुरू झाले त्या दिवसापासून ग्राहक मात्र भरपूर येऊ लागले. दुपारी चार तास आणि रात्री चार तास असे जेवण किंवा थाळी सुरुवातीला मिळू लागली. परंतु पहिल्या पंधरा दिवसातच मधुराला पहिला फटका बसला. हॉटेलचा सगळा स्टाफ एके दिवशी पैशांची उचल घेऊन तिला न सांगता पळून गेला. त्या क्षणी तो मोठा धक्का गिळून निर्धाराने मधुरा स्वयंपाकघरातच शिरली. तिने पोळ्या केल्या, भाजी, वरण, भात, वगैरे सगळे केले, टेबले पुसली, ग्राहकांची ऑर्डर घेतली, त्यांना सर्व्ह केले, बिल केले आणि आपण आता काहीही करू शकतो हा प्रचंड आत्मविश्वास कमावला. तिच्यातल्या उद्योजिकतेचा खऱ्या अर्थाने तो उदय होता. नवीन माणसे मिळत गेली, व्याप वाढू लागला, आता हॉटेलमध्ये नाश्ताही मिळू लागला.

ग्राहकांचा राबता वाढतच होता. मधुराने आता निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आणि त्यातून सुरू झाले - कस्तुरी लॉजिंग बोर्डिंग. लोकांना खूप छान वाटले. कारण शेत छान विकसित झाले होते. फळझाडे आणि मसाल्याची झाडे, वेली बहरत होती. फार्म हाऊस ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ लागली होती. निवांतपणे निसर्गाच्या कुशीत, आंबा फणसाच्या सान्निध्यात राहण्यासाठी लोक कस्तुरी फार्म रिसॉर्टमध्ये आवर्जून येऊ लागले. एका एनजीओशी संबंधित अगदी परदेशातले लोकही तिच्याकडे नियमितपणे येऊन राहतात. आता मधुराने दोन गायी घेतल्या आहेत. नारळाची शंभर-सव्वाशे झाडे आहेत. मिरी, दालचिनी, तमालपत्र, पेरू, अननस, चिकू, फणस, आंबा, नारळ आणि काजू भरपूर प्रमाणात निघतात.
पाच वर्षात मधुरा जोशी या तरुणीने आसपासच्या कित्येक हातांना बारा महिने पुरेल इतके काम दिले आहे. हे सगळे उभे करताना मधुरा स्वतः खूप बदलली. परिसरात वावरायचे तर त्यांच्यासारखे असायला हवे म्हणून पुण्यातली कपड्यांची स्टाइल बदलून पंजाबी ड्रेस, बांगड्या, टिकली आत्मसात केली. गावकऱ्यांशी नाते जोडले, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत गेली. त्यांच्यासाठी काही शैक्षणिक उपक्रम तिने सुरू केले. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांशी सातत्याने संवाद करत गेली. स्वच्छता, दर्जा, सचोटी ठेवून कामात झोकून दिले. त्यामुळे कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर कोणीही ‘कस्तुरी फार्म रिसॉर्ट’चे नाव अगदी कौतुकाने आणि सार्थ विश्वासाने प्रवाशांना सांगतात.
मधुराच्या या उद्योजकतेच्या प्रवासात तिला आता एक छान जोडीदार मिळाला आहे. अनिकेत गुरुजी या पुण्याच्या केटरिंग व्यवसायातील धडाडीच्या उद्योजकाशी विवाहबद्ध होऊन मधुरा नवी स्वप्ने बघते आहे. आई-वडिलांचा प्रचंड पाठिंबा, मोठी बहीण आणि मेहुणे यांची प्रत्येक पावलावर मिळालेली आश्वासक साथ, स्वतःवर ठेवलेला ठाम विश्वास यांच्या जोरावर मधुराने ही झेप घेतली. आता ग्राहकांसाठी कोकणातल्या निसर्गाचा फेरफटका, प्राणी संग्रहालय, फार्महाऊस ट्रीप, अशा नव्या संकल्पना समोर आहेत. मोहन आगाशे, अंकुश चौधरी, ‘गोकुळ’चे अरूण नरके यांनी मधुराचे काम पाहून कौतुक केले आहे. कोकणात मस्त रुजलेली मधुरा जोशी आता जोडीदाराच्या साथीने नव्या सुंदर संकल्पनांचा आविष्कार करण्यासाठी उत्सुक आहे.