Next
चकित करणारी ‘राजपूत’ श्रेणी
युद्धनौकांच्या जगात
Friday, January 11 | 01:00 PM
15 0 0
Share this story

अरबी समुद्रात युद्धसरावाच्या कवायती सुरू होत्या आणि त्यात विमानवाहू युद्धनौकेच्या संरक्षणार्थ काही विनाशिकांचा ताफाही आपली कौशल्ये पणाला लावत होता. शत्रूला बेसावध पकडणे हे डावपेचात अत्यंत महत्त्वाचे. तोफा, क्षेपणास्त्रे व अनेक रडार यांनी सज्ज असलेल्या आणि सव्वातीनशे नौसैनिकांचा फौजफाटा अंगावर खेळवणाऱ्या ‘आयएनएस राजपूत’ या विनाशिकेने आम्हाला त्यावेळी असेच चकित केले होते. या नौकेवरील क्षेपणास्त्रांचा पसारा पाहण्यात आम्ही मंत्रमुग्ध झालो असतानाच तिच्यावरील एक कप्पा अचानक दोन हातांची घडी वर आकाशात उघडावी, तसा उघडला आणि त्यातून ‘कमोव्ह २५’ हे रशियन हेलिकॉप्टर हलकेच एका लिफ्टवरून वर आले आणि आपले दुतर्फा फिरणारे पंखे उघडून हवेत झेपावले. या विनाशिकेत हेलिकॉप्टर दडलेले असेल, याची सूतराम कल्पनाही तोपर्यंत आली नव्हती.
 भारतीय नौदलामध्ये ‘आयएनएस राजपूत’ ही सुमारे पाच हजार टन वजनाच्या युद्धनौकांची एक श्रेणी आहे. त्यातलीच आघाडीची व पहिली युद्धनौका सप्टेंबर १९८० मध्ये ‘आयएनएस राजपूत’ या नावाने नौदलात दाखल झाली. त्यानंतर आयएनएस राणा (फेब्रुवारी १९८२), रणजित (नोव्हेंबर १९८३), रणवीर (१९८६) व रणविजय (जानेवारी १९८८) या नावाच्या विनाशिका भारतीय नौदलात दाखल झाल्या. या पाचही नौका रशियाच्या ‘कशिन २’ या श्रेणीच्या. या विनाशिकांची मूळ बांधणी पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत संघाने शीतयुद्धाच्या काळात सुरू केली. युद्धनौकांमध्ये फ्रिगेट, डिस्ट्रॉयर, क्रूझर, बॅटलक्रूझर व एअरक्राफ्ट कॅरिअर अशी चढत्या भाजणीची त्यांच्या आकार व शक्तीनुसार श्रेणी असते. भारतात क्रूझर, बॅटलक्रूझर नसतात. त्यामुळे डिस्ट्रॉयर किंवा विनाशिका याच विमानवाहू युद्धनौकेच्या खालोखाल मोठ्या व आघाडीच्या वर्गात असतात. या विनाशिकांवर नावाप्रमाणेच आक्रमक भूमिकेची जबाबदारी असते. विमानवाहू युद्धनौकेच्या संरक्षणार्थ तिच्याभोवती नेहमी विविध श्रेणीतील युद्धनौकांचा ताफा किंवा कोंडाळे असते. त्यात एखादी पाणबुडी, फ्रिगेट आणि विनाशिका यांचा समावेश असतो. पाणबुडीकडून होणारा हल्ला आणि कमी उंचीवरून होणारे हवाई हल्ले यापासून संरक्षण करणे, अशी दुहेरी जबाबदारी विनाशिकांवर असते. ‘आयएनएस राजपूत’वरील शस्त्रसंभार व तिला हेलिकॉप्टरमुळे मिळणारी ताकद या दुहेरी जबाबदारीसाठी सक्षम आहे. शिवाय लिफ्टसह खाली-वर होणाऱ्या छुप्या हेलिकॉप्टर हँगरमुळे या विनाशिकांना रडारच्या कक्षेतून वाचण्याचे बळही मिळाले आहे. अन्यथा हेलिकॉप्टरचे हँगर त्यांच्या चौकोनी कोनामुळे रडारच्या कक्षेत येतात.
यापूर्वी म्हटल्याप्रमाणे नौदलाच्या परंपरेनुसार युद्धनौकांचा कधी मृत्यू होत नाही. १९८० च्या दशकातील ‘राजपूत’ श्रेणीच्या विनाशिकांपूर्वी १९४८ मध्ये भारतीय नौदलात ब्रिटिश बनावटीची ‘राजपूत’ विनाशिका दाखल झाली होती. १९७१ च्या युद्धात बंगालच्या उपसागरात भारताच्या ‘आयएनएस विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेला लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानने ‘पीएनएस गाझी’ ही पाणबुडी धाडली होती. तत्कालीन ‘आयएनएस राजपूत’ या विनाशिकेने गाझीला पाताळात धाडण्याची भूमिका पार पाडली, अशा नोंदी आहेत. ऐतिहासिक नोंदींबाबत आजही उलट-सुलट दावे जरूर केले जातात; पण ‘विक्रांत’ला वाचवण्यासाठी ‘राजपूत’ने आपली ढाल केली व गाझीच्या पाडावाची साक्षीदार ठरली, हे तर निश्चितच. (‘गाझी अॅटॅक’ चित्रपटाने मात्र दोन पाणबुड्यांमधले युद्ध दाखवण्याची सिनेमॅटिक लिबर्टी घेतली.)  तर असे हे गौरवशाली नाव धारण करणारी पूर्वाश्रमीची ब्रिटिश बनावटीची राजपूत पुन्हा नव्याने जन्माला आली, ती रशियन बनावटीच्या ‘कशिन-२’ श्रेणीची विनाशिका बनून.
या नौकांना आर-क्लास नावाने ओळखले जाते. हवेत मारा करणारी स्वयंचलित यंत्रणा असलेली क्षेपणास्त्रे हे त्यांचे मुख्य बलस्थान. त्यामुळेच त्यांना गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर म्हणून ओळखले जाते. राजपूत श्रेणीतील विनाशिकांवर पुढच्या बाजूस एक विमानवेधी तोफ आहे, त्याचप्रमाणे मध्यावर डावी-उजवीकडे दोनदोन पाणबुडीवेधी तोफा आहेत. पाणबुडीचे लक्ष्य टिपण्यासाठी पाणतीरही आहेत. काळानुरूप या विनाशिकांवर बराक ही इस्रायली क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणाही बसवण्यात आली आहे. विनाशिकेच्या बहुउद्देशीय भूमिकांनुसार राजपूत श्रेणीतील नौकांवर ३५ अधिकाऱ्यांसह ३२० नौसैनिक असतात. मात्र रशियन आरेखनानुसार मनुष्यबळाच्या प्रशस्त जागेपेक्षा शस्त्रसंभाराला अग्रक्रम मिळतो.  ‘रशियन बनावटीच्या राजपूत श्रेणीतील विनाशिकांमध्ये वापरलेला धातू इतका उत्तम प्रतीचा होता की आज तीन दशकांनंतर ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागतानाही त्या प्रक्षेपकांचा दणका झेलू शकतात, हे त्यांचे वैशिष्ट्य’, असे या विनाशिकांवर तोफखाना विभागात काम केलेले निवृत्त कमांडर राहुल सिन्हा सांगतात. विनाशिका बहुउद्देशीय असाव्या लागतात व त्यादृष्टीने आता ‘ब्रह्मोस’च्या समावेशाने भूभागावर वेगवान व लांब पल्ल्यापर्यंत मारा करण्याची क्षमताही राजपूत श्रेणीत आली आहे, हे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.

 सुमारे २९० किलोमीटरचा पल्ला कापणाऱ्या ‘ब्रह्मोस’ या स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्रांमुळे राजपूत श्रेणीची प्रहारशक्ती आता कमालीची वाढली आहे. फेब्रुवारी २००३ ते २००५ या काळात ‘आयएनएस राजपूत’ श्रेणीतील विनाशिकांवर ब्रह्मोसच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यासाठी उर्ध्वदिशेने क्षेपणास्त्र डागता येण्याजोगी लाँचर्स (प्रक्षेपक) नौकेच्या पाठीमागील बाजूस बसवण्यात आली आहेत. या विनाशिकांसाठी ‘कावेरी’ ही स्वदेशी बनावटीची गॅस टर्बाइन बसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या राजपूत श्रेणीच्या सर्व नौका पूर्व किनारपट्टीवर तैनात असतात.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link