Next
रंगात रंगले मांगले
प्रतिनिधी
Friday, September 06 | 03:00 PM
15 0 0
Share this story


वैभव मांगले जितके उत्तम अभिनय करतात, तेवढीच संगीताचीही उत्तम जाण त्यांना  आहे. ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘युवा सिंगर एक नंबर’ या कार्यक्रमामुळे त्यांचा हा पैलूसुद्धा प्रेक्षकांसमोर आला आहे. त्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक कलागुण नुकताच समोर आला आहे. तो म्हणजे वैभव चित्रकारही आहेत!
चित्रकलेतील या आवडीविषयी बोलतांना वैभव म्हणाले, “शाळेत असताना चित्रकला हा विषय शिकलो होतो. मात्र, त्यानंतर चित्रकलेशी विशेष संबंध आला नाही. गेल्या काही महिन्यांत मात्र मला असं वाटलं, की आपणही चित्रं काढायला हवीत. सुरुवातीला साधी-सोपी चित्रं काढायला लागलो. मग हळूहळू आणखी दर्जेदार चित्र काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली. या सगळ्यामुळे चित्रकलेत माझं मन रमलं. मधल्या काही दिवसांमध्ये मला थोडा फावला वेळ मिळाला. त्यावेळी चित्रकलेला प्राधान्य देत आलं. आता साधारपणे दिवसातून दोन चित्रं काढून होतात. रिकामा वेळ चित्रकलेसाठी दिल्यामुळे, मी मोबाइलपासून लांब राहतो. त्यामुळेच चित्रकलेत व रंगांमध्ये मी अधिक रमतो. चित्रकलेच्या आणि विविध रंग छटांच्या सान्निध्यात राहणं खूप छान आणि विलोभनीय आहे. चित्र पूर्ण केल्याचं एक निराळं समाधान मनाला मिळतं. चित्रकलेविषयी एक दुर्दैवी गोष्ट अशी, की या कलेकडे इतर देशांत जितकं गांभीर्यानं पाहिलं जातं, तेवढं महत्त्व आपल्या देशात चित्रकलेला दिलं जात नाही. चित्र काढताना एक कविता सुचली…आत काहीबाही असतं लपलेलं
खोलखोल तळाशी....
शोधलं की सापडतं.
खुपणारं, बोचणारं, अबोध, दुर्बोध...
तळ ढवळला की कळतात रंग,
मनावर उमटलेल्या डागांचे..
मग कळतं रंगांनाही असतात
वेदना, वैफल्य, आनंद, सुखं आणि त्यांची भाषाही...
त्या भाषेला लिपी फक्त रंगांचीच…
रंगांनाही असते सावली
आणि त्यात असतात लपलेले इंद्रधनू..
त्यांचं मैत्र फक्त सुरांशी...
असंच तळ ढवळताना सापडले
लहानपणी हाताला लागलेले रंग..
अजून तसेच होते...
मनावर ओढलेल्या ओरखड्यातल्या रक्तासारखे ताजे..
तेच म्हणाले मला… व्यक्त हो रे बाबा आता आमच्यातूनही. 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link