Next
शिवाजी महाराज
विजय काळे
Friday, February 08 | 04:00 PM
15 0 0
Share this story१६६० च्या पावसाळ्यानंतर शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाचे सरदार कारतलबखान आणि रायबाघन यांना आंबेनळी घाटातील उंबरखिंडीत घेरून शरण येण्यास भाग पाडले. त्यानंतर शिवाजी महाराज तळकोकणात उतरले. दाभोळ, चिपळूण भागावर कब्जा मिळवून महाराज पुढे निघाले. संगमेश्वर, शृंगारपूर स्वराज्यात सामील करून महाराज पुढे राजापूरकडे निघाले. राजापूर बंदर आदिलशहाच्या ताब्यात होते.

राजापूरकडे निघाल्यावर महाराजांना पन्हाळ्याला पडलेला सिद्दी जोहरचा वेढा आठवला. त्या वेढ्यात सिद्दीच्या मदतीला राजापूरकर इंग्रजांनी आपली तोफ व दारुगोळा पाठवला होता. महाराजांनी स्वत: इंग्रजांच्या तोफेचा मारा आणि इंग्रजांनी तिथे फडकावलेला झेंडा पाहिला होता. स्वाभाविकच तेव्हा महाराज खूप संतापले होते. तोच संताप पुन्हा उफाळून आला. तोफांचे ते आवाज कानात घुमू लागले.

चार हजार सैनिकांसोबत शिवाजी महाराज राजापूरच्या बाहेर येऊन थांबले. महाराजांनी राजापुरातील श्रीमंत व्यापारी लोकांना बोलावून घेतले. त्यात इराण, मस्कत व अन्य परदेशी व्यापारीसुद्धा होते. इंग्रजांना मात्र बोलावले नव्हते. इंग्रजांची खबर घ्यायला महाराज प्रत्यक्ष जाणार होते, हाती तलवार घेऊन! महाराज आल्याचे कळल्यावर रिव्हिंग्टन, गीफर्ड आणि इतर इंग्रज अधिकारी स्वत:हून महाराजांना भेटायला आले.

इंग्रजांना बघताच महाराजांना अनावर संताप आला आणि त्यांनी आज्ञा केली की या दगाबाज इंग्रजांना कैद करा. राजापुरातील सर्व टोपीकर इंग्रजांना जेरबंद करा, त्यांच्या वखारीतील सामान जप्त करा आणि वखार उद्ध्वस्त करा.

मराठे सैनिक लगेच वखारीच्या दिशेने सुटले. महाराजांचे हे रूप पाहून इतर व्यापाऱ्यांनी पटापट खंडणीच्या रकमा कबूल केल्या आणि लगेच आणून दिल्या. राजापुरातील सामान्य जनतेला मात्र महाराजांच्या सैन्याने काहीही त्रास दिला नाही.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link