Next
सौंदर्याची उपासना
मानसी बिडकर
Friday, August 02 | 03:00 PM
15 0 0
Share this story

वनिता दंडे मूळच्या नांदेड जिल्यातील कवाना गावातल्या. त्यांचे बालपण आणि आठवीपर्यंतचे शिक्षण कवानामध्येच झाले. हे गावही इतके छोटे की त्या गावामध्ये त्याकाळी फक्त आठव्या इयत्तेपर्यंतच शाळा होती. वनिताताई आठवी पास झाल्या.  त्या हुशार होत्या, त्यांना पुढे शिकायचे होते; मात्र गावात शिकायची सोय नसल्यामुळे व घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना शिक्षण तिथेच थांबवावे लागले. वनिताताई एकदम शांत, समजूतदार स्वभावाच्या असल्यामुळे त्यांनी आहे ती परिस्थिती स्वीकारली. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी सरळ त्यांना स्थळे पाहायला सुरुवात केली. त्यांचे लग्न हिंगोलीतील भिंगी गावातील अशोक दंडे यांच्याबरोबर लावून दिले गेले. सासरची परिस्थितीही अशीच जेमतेम होती. घरची सात एकर शेती आणि त्यात २० माणसांचे कुटुंब कसेतरी जेमतेम भागवायचे, अशी स्थिती होती. काही जणांना तर चक्क मजुरी करावी लागे. अशोक यांना नोकरी असल्यामुळे घरातील सर्वांनाच त्यांचाच आधार होता. ते तरी आपली परिस्थिती सुधारतील, या सर्वांच्या अपेक्षा, भावंडांचे शिक्षण... कमी पगारात ही सर्व कसरत वनिताताईंना अगदी पाहवत नव्हती. म्हणून त्यांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. ‘प्रत्येकाने स्वावलंबी असावे व आपल्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी कोणापुढेही हात पसरण्याची गरज कोणालाही पडता कामा नये’, असे असलेल्या पतीने वनिताताईंना काहीतरी व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले.  परवानगी दिली.
‘दहा बाय दहा’ची खोली, त्यातच एवढा संसार. मग त्यांनी सातवीपर्यंतच्या शिकवण्या घ्यायचे ठरवले. शिवाय शिलाई मशीन घेतले. शिवणकाम, एम्ब्रायडरी,  साडीचा फॉल, पिको अशी कामे करायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे आईसक्रीम,  जाम बनवण्याचा छोटा व्यवसाय स्वबळावर करायला सुरुवात केली.  त्यांनी ब्युटी पार्लरचा कोर्सही केला. स्वतःचे पार्लर आणि क्लासेस गावात सुरू केले.
खेडेगावात पार्लरचा व्यवसाय हे तेव्हा धाडस होते. तेथे बायकांना पावडर लावायलाही वेळ नाही, मग हा व्यवसाय चालेल का,  किंवा कसा चालेल, याची चिंता तर होतीच.  त्यांनी धाडसाने हे पार्लर यशस्वी करून दाखवले.
वनिताताईंनी ब्युटी पार्लरचा अॅडव्हान्स कोर्स करायचे ठरवले. त्यासाठी त्या पनवेलला गेल्या. तेथील शिक्षिका पार्लरला लागणारे क्रीम स्वतःच बनवायच्या. वनिताताईंना या नव्या उत्पादनाने खुणावले. त्यांनी सौंदर्यउत्पादने करण्याची खूणगाठ मनाशी बांधली. त्यांनी कृषी विद्यापीठ, जिल्हा उद्योग केंद्र,  मिटकॉन या संस्थांकडून अधिकृत शिक्षण घेतले आणि तेथूनच त्यांच्या ‘कृष्णा हर्बल अँड कॉस्मॅटिक्स’ व ‘सर्वज्ञ महिला गृहउद्योग’ला खरी सुरुवात झाली. त्यांनी हर्बल,  नॅचरल ब्युटी प्रॉडक्टस करायला सुरुवात केली. अॅलोवेरा फेसपॅक, हळद-चंदन क्रीम,  कडुलिंब क्रीम, कोरफडीपासून कुमारी अर्क, पिंपल्ससाठी मंजिष्ठा, नीम, शतावरी, पुदिनापासून बनवलेले क्रीम अशा प्रकारची उत्पादने त्यांनी बनवायला सुरुवात केली. या उत्पादनांचे मार्केटिंग त्यांनी प्रात्यक्षिके दाखवून, प्रदर्शनात भाग घेऊन स्वत: करायला सुरुवात केली.
घरातून सुरू केलेल्या या उद्योगासाठी चार खोल्यांचे पार्लर घेतले. मग मोठ्या विस्तारित जागेमध्ये ‘कृष्णा हर्बल्स’चा विस्तार त्यांनी केला. वनिताताईंनी स्वतः प्राॅडक्शन, मार्केटिंग, पॅकिंगचे प्रशिक्षण घेतले. त्यांच्याकडील कामगारांना प्रशिक्षण दिले. एवढेच नव्हे, तर व्यवसाय वाढवण्यासाठी त्या दुबई, फ्रान्स, श्रीलंका अशा देशांना जाऊन आल्या. महाराष्ट्रात, राज्याबाहेर व परदेशातही ‘सर्वज्ञ’ या ब्रॅण्डने त्याचा प्रसार केला. आता तर त्यांच्या हर्बल प्रॉडक्टसाठी लागणारा कच्चा माल व सामग्रीही त्या स्वतःच्या शेतात पिकवितात. बचतगटाच्या माध्यमातून त्या इतर महिलांनाही प्रशिक्षण देतात. बऱ्याच महिलांना स्वावलंबी बनवण्याचे काम त्यांनी केले आहे.  
हे करत असताना त्यांनी त्यांच्या तीनही मुलांना उच्च शिक्षण दिले. स्वतःही बी. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा मुलगाही पुढील काही वर्षात त्यांच्या व्यवसायाला हातभार लावणार आहे. व्यवसायातील चढ-उतारातही त्या कधीच डगमगल्या नाहीत. स्वतः जिद्दीने पुढे जात असताना इतर स्त्रियांनाही बरोबर घेऊन त्यांनी त्यांच्या व्यवसायाचा वटवृक्ष करणाचा ध्यास घेतला आहे. ‘महाराष्ट्र उद्योगिनी सुवर्ण पुरस्कार’, ‘आम्ही उद्योगिनी पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link