Next
‘तो’ परत आलाय
कपिल देशपांडे
Friday, November 30 | 06:06 PM
15 0 0
Share this storyमोगली, बघीरा,भालू, शेरखान... ही नावे जरी उच्चारली तरी डोळ्यांसमोर घनदाट जंगल आणि त्यात हिंस्र प्राण्यांसोबत लीलया वावरणारा एक गोंडस मुलगा म्हणजे मोगली उभा राहतो. ही सगळी पात्रे आजही प्रत्येकाच्या लक्षात आहेत. रुडयार्ड किपलिंग यांचा मानसपुत्र असलेल्या मोगलीने च्या ‘जंगल बुक’मधून लहानांपासून अगदी थोरापर्यंत सर्वांवर गारूड घातले आहे. ते आजही कायम असून पुस्तक,त्यावरील चित्रपट, मालिका आवडीने पाहिले जातात. जंगल बुक कार्टूनच्या रूपात पाहण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार असून निमित्त आहे ते नेटफ्लिक्सवर सुरू होणाऱ्या जंगलबुक या वेबसीरीजचे...

‘जंगलबुक’ हे पुस्तक नोबेल पुरस्कारविजेते लेखक रुडयार्ड किपलिंग यांनी  १८९४ मध्ये लिहिले होते. १८९३-९४ च्या सुमारास मासिकांमध्ये या पुस्तकातील गोष्टी प्रकाशित झाल्या होत्या. किपलिंग हे जन्माने ब्रिटिश असले तरी त्यांचे लहानपण भारतात गेले होते. त्यामुळे त्यांच्या लेखनावर भारतीय जीवनशैलीचा बराच प्रभाव आहे. त्यामुळेच जंगलबुकमधील मोगली हा अस्सल भारतीय असल्यामुळेच तो आपल्याला अधिक जवळचा वाटतो. या पुस्तकाचे जवळपास ३६ भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.

वॉल्ट डिस्ने यांनी या पुस्तकावर इंग्रजीमध्ये कार्टून फिल्म तयार केली. तिला अफाट लोकप्रियता मिळाल्यानंतर हिंदीमध्ये ती डब करून भारतामध्ये ऑक्टोबर १९८९ मध्ये दूरदर्शनवरून दाखवण्यात आली. या मालिकेचे ‘जंगल जंगल पता चला है’ हे शीर्षकगीत ज्येष्ठ कवी गुलजार यांनी लिहिले आहे, तर त्याला  विशाल भारद्वाज यांनी संगीतबद्ध केले होते. हे गीत नऊ वर्षांच्या अमोल सहदेवने गायले होते.  या गाण्याला इतकी लोकप्रियता मिळेल, याचा अंदाजही कुणाला नव्हता. आजही इतक्या वर्षांनंतर ‘जंगलबुक’ मालिकेचे शीर्षकगीत प्रत्येकाला पाठ आहे, हेच या गाण्याचे यश आहे.

‘डिस्ने’च्या २०१६ साली आलेल्या ‘जंगलबुक’ चित्रपटाविषयीही प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. या वेळी मोगलीचा चेहरा अ‍ॅनिमेटेड नव्हता तर तिथे एक खरोखरच लहान, निरागस भाव असलेला चेहरा मोगली म्हणून खऱ्याखुऱ्या प्राण्यांच्या जंगलात वावरताना दिसला. हा चित्रपट जेव्हा हिंदीत आला तेव्हा त्यात बॉलिवूडमधील नाना पाटेकर (शेरखान), ओम पुरी (बघीरा), इरफान खान (बल्लू), प्रियांका चोप्रा (का), शेफाली छाया (रक्षा) या आघाडीच्या कलाकारांनी आपला आवज दिला होता. या चित्रपटाने भारतातही बॉक्सऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटाने किंग खान शाहरुखच्या ‘फॅन’ ला बॉक्सऑफिसवर धोबीपछाड दिला. कार्टून स्वरूपात छोट्या पडद्यावर दिसणारा मोगली मोठ्या पडद्यावर थ्रीडीसारख्या नव्या टेक्नॉलॉजीमध्ये दिसला...

आता हाच मोगली पुन्हा एकदा एका वेबसीरिजच्या माध्यमातून नेटफ्लिक्स प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ७ डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर ‘मोगली- लेजंड ऑफ द जंगल’ ही हिंदी व्हर्जन पाहायला मिळणार आहे. या हिंदी व्हर्जनमधील पात्रांना बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी आवाज दिला आहे. यात शेरखानचा भारदस्त आवाज जॅकी श्रॉफने,  ‘का’ या धूर्त अजगराच्या पात्राला करीना कपूर-खान हिने, समजूतदार बघीराला अभिषेक बच्चनचा आवाज आहे. तर खोडकर भालूला अनिल कपूरचा आवाज आहे.  विशेष म्हणजे बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचा आवाजही यानिमित्ताने ऐकता येणार आहे. माधुरी पहिल्यांदाच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर येत आहे. ‘निशा’ या पात्राला माधुरीचा आवाज असेल.  अनेक दिग्गजांचा या वेबसीरिजमध्ये सहभाग असल्यामुळे त्याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

मोगली हा ब्रँड आता इतका मोठा झाला आहे की त्यात सहभागी होण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. रुडयार्ड किपलिंग यांच्या ‘द जंगल बुक’ या पुस्तकावर ‘मोगली- लेजंड ऑफ द जंगल’ बेतलेला आहे. अँडी सर्कीजने याचे दिग्दर्शन केले असून मोगलीच्या भूमिकेत भारतीय वंशाचा अमेरिकन कलाकार रोहन चांद दिसणार आहे. या चित्रपटाच्या इंग्रजी व्हर्जनला हॉलिवूडच्या मोठमोठ्या कलाकारांनी आवाज दिला आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सवरही मोगलीचा हा नवा अवतार धमाल करणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link