Next
एसएससी सीपीओ : केंद्रीय पोलिस दलांमधील करिअरच्या संधी
फारुक नाईकवाडे
Friday, October 26 | 04:00 PM
15 0 0
Share this story

राज्यातील पोलिस दलातील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांची भरती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या माध्यमातून होते. तर इतर पदांवरील भरती राज्य लोकसेवा आयोगाकडून किंवा पोलिसदलाच्या भरतीच्या माध्यमातून करण्यात येते. वेगवेगळ्या केंद्रीय पोलिसदलांमधील पदांवरील भरतीची जबाबदारी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडे सोपविण्यात आली आहे. एसएससी सीपीओ परीक्षेच्या माध्यमातून ही पदभरती करण्यात येते. त्याबाबतची अधिक माहिती वाचा या  लेखात...

भरती करण्यात येणारी पदे :
१. उपनिरीक्षक दिल्ली पोलिस (गट ब राजपत्रित), २. केंद्रीय सशस्त्र पोलिसदलातील उपनिरीक्षक (गट क),
३. केंद्रीय औद्योगिक सुरक्षादलातील साहाय्यक उप निरीक्षक (गट क)

या व्यतिरिक्त पुढील काही पदेही या परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येतात.
४. केंद्रीय राखीव पोलिसदलातील उपनिरीक्षक, ५. केंद्रीय राखीव पोलिसदलातील उपनिरीक्षक, ६. केंद्रीय औद्योगिक सुरक्षादलातील उपनिरीक्षक, ७. सीमा सुरक्षादलातील उपनिरीक्षक, ८. इंडो तिबेटन सीमा पोलिसदलातील उपनिरीक्षक, ९. सशस्त्र सीमादलातील उपनिरीक्षक
यापैकी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक व केंद्रीय औद्योगिक सुरक्षादलातील साहाय्यक उपनिरीक्षक या पदांवरील निवडीनंतर भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी सेवा देणे आवश्यक ठरते. तसेच, दिल्ली पोलिस दलाव्यतिरिक्त इतर दलांतील सेवांमध्ये अखिल भारतीय उत्तरदायित्त्व असते. अर्थात सेवा कालावधीमध्ये भारतातील कोणत्याही ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात येऊ शकते.


अर्हता
शैक्षणिक अर्हता - उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा - उमेदवाराने त्या त्या वर्षीच्या एक ऑगस्ट रोजी वयाची किमान २० वर्षे व कमाल २५ वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक असते. वयोमर्यादा शिथिल करण्याबाबत पुढील निकष विहित करण्यात आले आहेत.
निवडप्रक्रिया :
१. पेपर १, २. शारीरिक मानक चाचणी / शारीरिक क्षमता चाचणी, ३. पेपर २, ४. सविस्तर वैद्यकीय चाचणी
वरील सर्व स्तर अनिवार्य असून यातील शारीरिक मानक चाचणी / शारीरिक क्षमता चाचणी व सविस्तर वैद्यकीय चाचणी हे टप्पे क्वालिफाइंग (पात्रता) स्वरूपाचे आहेत.
पेपर १ मधील गुणांच्या आधारे शारीरिक मानक चाचणी / शारीरिक क्षमता चाचणीसाठी उमेदवारांची निवड होते. माजी सैनिकांनी ही चाचणी देण्याची आवश्यकता नसते.  या चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची पेपर २ साठी निवड होते. पेपर १ आणि २ च्या गुणांची एकत्रित गुणतालिका बनवून त्या आधारे वैद्यकीय चाचणीसाठी उमेदवारांना आमंत्रित करण्यात येते. ही  चाचणीही पात्रता स्वरूपाची असते. यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी घोषित करण्यात येते.


परीक्षायोजना

पेपर १ : या पेपरचा अभ्यासक्रम परीक्षेच्या जाहिरातीमध्ये विस्ताराने देण्यात येतो. ही  संगणकाधारित बहुपर्यायी प्रकारची परीक्षा असून  प्रत्येक चार  चुकीच्या उत्तरांमागे मिळालेला एक गुण वजा करण्यात येतो.


पेपर २ : ही  संगणकाधारित बहुपर्यायी प्रकारची परीक्षा असून  प्रत्येक चार  चुकीच्या उत्तरांमागे मिळालेला एक गुण वजा करण्यात येतो. या पेपरचा अभ्यासक्रम परीक्षेच्या जाहिरातीमध्ये विस्ताराने देण्यात येतो.

पात्रता शर्ती
  • सर्व सुरक्षा / पोलिसदलामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी उंची इत्यादी शारीरिक मापदंड आणि अपेक्षित शारीरिक क्षमता विहित करण्यात आल्या आहेत. 
  • शारीरिक क्षमतांची चाचणी १०० मीटर तसेच १ किलोमीटरची शर्यत, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक इत्यादी माध्यमातून घेण्यात येते.
  • वैद्यकीय चाचणीमध्ये दृष्टी इत्यादी बाबी तपासल्या जातात.
  • निवड झाल्यावर प्रशिक्षणाचा भाग म्हणून उमेदवारांनी काही अन्य चाचण्या पूर्ण करणे आवश्यक असते. त्या पूर्ण करू ना शकणारे उमेदवार सेवेमध्ये कायम करण्यात येत नाहीत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link