Next
लोकसेवा-देशसेवा
शर्मिला लोंढे
Friday, February 08 | 05:00 PM
15 0 0
Share this story

लोकसेवा म्हणजे सरकारनं आपल्या हद्दीतील लोकांसाठी पुरवलेली सेवा. ही सेवा सरकारकडून परस्पर पुरवली जाते (पब्लिक सेक्टरच्या माध्यमातून) किंवा सरकार अशी सेवा पुरवणाऱ्या खासगी संस्थाना आर्थिक पाठिंबा देतं. या सेवा दोन स्तरांवर राबवल्या जातात. एक म्हणजे ‘नॅशनल’ म्हणजे भारतीय व दुसरं म्हणजे राज्य म्हणजे ‘स्टेट.’ या लोकसेवांमध्ये भरती ही परीक्षेद्वारे केली जाते. भारतीय स्तरावर यूपीएससी (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) व राज्य स्तरावर एसपीएससीच्या (स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन) माध्यमातून.
२१ वर्षांपुढील सर्व पदवीधर पुरुषांना व स्त्रियांना या परीक्षा खुल्या असतात. एसपीएससीची वयोमर्यादा २८ ते ३५ वर्षांपर्यंत आहे तर यूपीएससीची ३२ वर्षं असून या परीक्षा जास्तीत जास्त सहा वेळा देता येतात.

या दोन पातळींवरील परीक्षांपैकी एसपीएससी ही परीक्षा यूपीएससीच्या तुलनेत थोडी सोपी वाटते. याचं कारण म्हणजे एसपीएससीमध्ये जास्त भर ‘माहिती’वर असतो तर यूपीएससीमध्ये सगळा भर ‘संकल्पनां’वर असतो. माहिती गोळा करणं हे एखादी संकल्पना समजून त्याचं विश्लेषण करण्याच्या किंवा त्याच्यावर विचार करण्याच्या तुलनेत केव्हाही सोपं असतं. मुळातच या परीक्षा देण्यासाठी माहितीचा साठा खूप वाढवावा लागतो. यासाठी नियमितपणे वर्तमानपत्र सविस्तर वाचणं गरजेचं व फायद्याचं ठरतं. त्याचप्रमाणे भरपूर अभ्यास, उजळणी, रोजच्या रोज किंवा आठवड्याचं अभ्यासाचं वेळापत्रक व ते पूर्ण करण्यासाठी रोज एक नवी ऊर्जा व स्फूर्ती लागते, हे वेगळं सांगायला नको. वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागतो. जसं, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, पर्यावरण, जैवविविधता, शेतिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, मानववंशशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, लेखापरीक्षण, कायदा, व्यवस्थापन, तत्त्वज्ञान, भौतिकशास्त्र, मानसशास्त्र, प्रशासन, साहित्य इत्यादी. यातील काही विषय अनिवार्य असतात तर काही पर्यायी विषयांमधून निवडायचे असतात. परीक्षेमध्ये ग्रहणशक्ती, तर्कशक्ती, निर्णयक्षमता, आकडेमोड, भाषाशैली तपासण्यासाठी एक अभिक्षमता चाचणी असते. तसंच एसपीएससीमध्ये कारकुनी व टायपिंगचीही चाचणी असते. या परीक्षांची तयारी करण्यासाठी ऑनलाइन व वर्ग/गट अभ्यासक्रम उपलब्ध आहेत व ते आवश्यकही आहेत.

यूपीएससी/एसपीएससीच्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विलक्षण बुद्धिमत्ता व तर्कक्षमता असणं गरजेचं आहे. यूपीएससीसाठी अधिक कुशाग्र बुद्धिमत्ता अपेक्षित आहे. या परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लोकसेवेमध्ये भरती झाल्यावर लोकसेवेची तळमळ तर हवीच, शिवाय आत्मविश्वास, जिद्द, प्रयत्नांची चिकाटी, ध्येयनिष्ठता, लोकांकडून काम करून घेण्याची हातोटी, नेतृत्व, चांगली निर्णयक्षमता व अनुरूप भावनिक व ताणतणावाचं नियोजन हे स्वभावविशेष असणं महत्त्वाचं व उपयोगाचं आहे. त्याचबरोबर प्रशासकीय कामाची आवड असणं संयुक्तिक आहे.

एसपीएससीखालील काही नियुक्त्या म्हणजे स्टेट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, पोलिससेवा, फॉरेस्ट सर्व्हिस, रिव्हेन्यू सर्व्हिस, पोलिस उपअधीक्षक (डेप्युटी सुपरिटेन्डंट ऑफ पोलिस), उपजिल्हाधिकारी (डेप्युटी कलेक्टर), कमर्शियल टॅक्स ऑफिसर, राजकीय सरकारी महाविद्यालयांमधील प्राध्यापक/सहप्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक.

यूपीएससीखालील नियुक्त्यांची विभागणी तीन गटांमध्ये केली जाते.
 १) ऑल इंडिया सर्व्हिसेस-आयएएस-इंडियन अॅमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, आयपीएस- इंडियन पोलिस सर्व्हिस व आयएफएस- इंडियन फॉरेन सर्व्हिस.
२) ग्रुप ए- सेन्ट्रल सर्व्हिसेस- इंडियन-रिव्हेन्यू सर्व्हिस, रेव्हेन्यू कस्टम्स, ऑडिट अॅण्ड अकाउंट्स, सिव्हिल अकाउंट्स, इन्फॉर्मेशन, ट्रेड, डिफेन्स इस्टेट, डिफेन्स अकाउंट, ऑर्डिनन्स फॅक्टरीज, पोस्टल अॅण्ड टेलिकम्युनिकेशन, रेल्वे अकाउंट्स, रेल्वे पर्सनल, रेल्वे ट्रॅफिक, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, सेन्ट्रल एक्साइज, आयकर, आरोग्य, विमासेवा इत्यादी.
३) ग्रुप बी- आर्मड फोर्सेस हेड क्वार्टर्स सिव्हिल सर्व्हिसेस व राज्य स्तरावरील सेवा. दर वर्षी साधारण ३० हून अधिक जागांवर भरती होते. परीक्षेतील गुण जितके उच्च तितकी निवड करण्याची सवलत.

यूपीएससी/एसपीएससीच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका, त्याला लागणारा अभ्यास व तयारी व भरती झाल्यावर लोकसेवेसाठी कामाची तत्परता या सर्वांचं डोळ्यांसमोर नीट चित्र उभं करून त्याच्या तुलनेत आपली बुद्धी, क्षमता, आवड व मानसिकता पडताळून पाहून मगच प्रत्येक विद्यार्थ्यानं आपला हा लांबलचक व खडतर प्रवास सुरू करायचा की नाही हे ठरवायचं आहे.
अधिक माहितीसाठी- www.upsc.gov.in.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link