Next
चहा ‘अवधान’
अरुण घाडीगावकर
Friday, April 12 | 03:30 PM
15 0 0
Share this story


नाट्यप्रयोग सुरू असताना अनपेक्षितपणे रंगमंचावर काय घडेल आणि कशी पंचाईत होईल, हे सांगता येत नाही. रंगभूमीचा कितीही अनुभव असला तरीही असे प्रसंग त्या कलावंताला एक नवा अनुभव देऊन समृद्ध करत असतात. कसलेले कलावंत आपल्या हजरजबाबीपणामुळे तो प्रसंग निभावून नेतात. कधी कधी प्रेक्षकांना रंगमंचावर अघटित घडलंय याचा थांगपत्ताही लागत नाही.
‘नाट्यसंपदा’च्या प्रभाकर पणशीकर यांच्याकडे असे अनुभव पोत्यानं भरलेले. त्यांना असे अनुभव येण्याचं कारण, त्यांची प्रयोग करण्याची क्षमता. अक्षरश: कुठेही नाट्यप्रयोग करायची, त्यांची तयारी असे. प्रभाकरपंत आपल्या प्रयोगाच्या सामानात दर्शनी पडदा आणि साहित्य म्हणजे पडदा बांधण्या-ओढण्यासाठी दोरी, कप्पी वगैरे सोबत नेत. एखाद्या हॉलमध्ये, सभागृहास पडद्याची सोय नसेल तर ‘नाट्यसंपदा’चा पडदा लावला जाई. नाटकांचे महाराष्ट्र आणि बाहेरही दौरे केल्यानं दौऱ्यांतील अडचणींचा त्यांना दांडगा अनुभव होता.
नागपूरला तेव्हा ‘धनवटे’ आणि ‘पंजाबराव देशमुख’ ही दोनच नाट्यगृहं होती. बाकी चंद्रपूर, पुसद, वाशीम, अमरावती अशा ठिकाणी नाट्यप्रयोग होत ते उघड्यावर, पटांगण-मैदानावर. शाळा, महाविद्यालयांच्या सभागृहात प्रयोग होत. प्रयोगाची ही ठिकाणं गावापासून दूर असत. हे प्रयोग स्थानिक ठेकेदार ठरवत. विदर्भ-नागपूर हा सारा परिसर म्हणजे चुलीवरच्या तव्यासारखा तप्त. म्हणूनच इथे दौरा ठरवताना मुख्यत्वे काळ असे तो शिशिरातला. प्रयोगही रात्री दहा-साडेदहाला सुरू होत. उघड्यावर प्रयोग असल्यानं वातावरणाचा गारवा प्रेक्षकांना सुखद वाटे. प्रेक्षकही रात्रीचं जेवण आटोपून प्रयोगाचा आस्वाद घ्यायला येत.  ‘इथे ओशाळला मृत्यू’चा विदर्भदौरा निश्चित झाला. प्रभाकरपंत औरंगजेबाच्या भूमिकेत. किरण भोगले हे संभाजी, सुधा करमरकर या येसूबाई, तर शेख निजाम हैदराबादीच्या भूमिकेत दिलीप गुजर. संभाजीला पकडायची जबाबदारी औरंगजेबानं याच शेख निजामावर टाकलेली आणि त्यामुळेच त्याला मुकरब खान ही पदवीही दिलेली. गणोजी शिर्केच्या भूमिकेत होते चित्तरंजन कोल्हटकर. कलुषाची भूमिका धनंजय भावे करत असत. मौलवी होत आप्पा गजमल; असद खान-सीताराम सामंत, तर प्रल्हाद निराजीची भूमिका संदीप मेहता करायचे. ऐतिहासिक नाटकासाठी कलावंतांची अशी कुमक असताना प्रयोग देखणा न होता तरच नवल. वाशीमचा हा प्रयोग एका सभागृहात होता. सभागृहासमोर भव्य पटांगण. त्यात प्रेक्षकांना बसण्यासाठी कंत्राटदारानं कोणतीच व्यवस्था केलेली नसे. प्रेक्षकच सतरंजी, चटया, गोणपाटं घेऊन आपापल्या जागा पकडत. सभागृहाच्या डाव्या-उजव्या बाजूस प्रेक्षक जागा धरून बसत आणि मधल्या मार्गिकेत कुणी बसायचं नाही, असा अलिखित नियमच होता.
हवेत गारवा होता आणि रात्र चढेल तशी गारव्याला गुलाबी चढेल, हे लक्षात घेऊन प्रेक्षक स्वेटर, शाल, मलफर, नाकटोप्या अशा जाम्यानिम्यानिशी आलेले. विरोधाभास असा की अशा गारव्यात रंगमंचावरील कलावंतांना मात्र पात्रांच्या वेशभूषेव्यतिरिक्त कोणताही गरम कपडा परिधान करता येत नाही. त्यांना थंडी सोसावीच लागते. असाच एकदा वाशीमला ‘इथे ओशाळला मृत्यू’चा प्रयोग रात्री साडेदहा वाजता सुरू झाला. खरं तर प्रेक्षक येताहेत, गारवा जाणवतो, म्हणून कंत्राटदारानंच अर्धा तास उशिरा प्रयोग सुरू केला. वसंत कानेटकर लिखित अप्रतिम असं नाटक कलाकारही ताकदीनं साकारायचे. नाटक सुरू होताच, त्याची मोहिनी प्रेक्षकांवर पडली. पहिला अंक संपेपर्यंत या नाटकानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं. त्यांनी नाटक डोक्यावर घेतलं. इतकं की प्रेक्षकांना थंडी जाणवत नव्हती. मात्र कलावंतांना चांगलीच थंडी वाजत होती. त्यांना स्वेटर, मफलर वगैरेंचा आधार घेणं अशक्य होतं. थंडीपासून थोडाफार बचाव करण्यासाठी गरम गरम चहा ढोसणं एवढाच उपाय त्यांच्यापाशी होता. कंत्राटदारानं कलावंत-तंत्रज्ञांचा विचार करून पंचवीस चहांची व्यवस्था केली होती. अंक पडताच चहावाला किटली आणि काचेचे छोटे ग्लास घेऊन आला. रंगपटातल्या कलावंतांनी आणि तंत्रज्ञ, कामगारांनी गरम चहा घेऊन थंडीपासून थोडा आराम मिळवला. परंतु सुधा करमरकर यांना काही चहा मिळाला नाही. या नाटकात त्या एकमेव स्त्री कलावंत. स्त्रियांचा रंगपट दुसऱ्या दिशेला. त्यामुळे चहावाला त्यांच्यापर्यंत पोचलाच नाही. चहा मिळाला नाही म्हणून त्या थंडीतही सुधाताई संतापल्या. ‘मला चहा हवा. मला विचारल्याशिवाय तिसरी घंटा देऊ नका. आधी चहाची व्यवस्था करा.’मग चहासाठी धावाधाव सुरू झाली. नाट्यगृहात कँटिन असतं. इथे तर चहावाला दूर कुठेतरी दूरवर टपरी टाकून बसलेला. सुदैवानं ज्यानं चहा आणला तो पोरगा सापडला. त्याला सांगितलं की जा आणि पटकन एक कप चहा आण लवकर. आणि सुधाताईंकडे बोट करून सांगितलं, या बाईंना आणून दे. येसूबाईंच्या रूपातील सुधाताईंना त्यानं नीट पाहिलं आणि तो किटली-ग्लाससह पसार झाला. दरम्यान दोन घंटा झाल्या. तिसरी घंटा होत नाही, म्हणून पंतांनी चौकशी केली. तेव्हा त्यांना कारण कळलं. ते सुधाताईंना म्हणाले, “आपण दुसरा अंक सुरू करुया. दुसऱ्या अंकानंतर तुम्ही दोन कप चहा प्या. नाहीतर नाटक संपायला उशीर होईल आणि पुढचं शेड्युल विस्कटेल.” पंतांचं म्हणणं सुधाताईंनी ऐकलं आणि नाटक सुरू झालं.
मराठ्यांचा प्रसंग. रंगमंचावर गणोजी शिर्के, प्रल्हाद निराजी, शंभूराजे आणि कलुषा, येसूबाई. वादावादीचा प्रसंग होता, वतनाचा. काही झालं तरी तुम्हाला वतन मिळणार नाही, असं संभाजी-येसूबाईंनी गणोजींना सांगितलं. त्यामुळे नात्यात आणि रंगमंचावरील प्रसंगात तणाव आलेला असताना, तो चहावाला पोरगा मधल्या मार्गिकेतून चालत सरळ स्टेजवर आला. ज्यांच्यासाठी चहा आणला त्या बाई स्टेजवर! प्रेक्षक गोंधळले. पण सुधाताईंनी प्रसंगावधान राखत विचारलं, “बाळराजे, कसे आहात?” त्याला काहीच कळलं नाही. पण बाळराजांच्या अनपेक्षित प्रवेशानं हसू आवरणं अशक्य झाल्यानं कलुषा, गणोजी शिर्के आणि प्रल्हाद निराजी मुख्य दारातून बाहेर गेले. संभाजीनं प्रेक्षकांकडे पाठ फिरवली. रंगमंचावर संभाजी, येसू आणि चहावाले बाळराजे. प्रेक्षक हसू लागले. येसूबाईंनी बाळराजेंकडून चहा घेतला, त्याचा आस्वाद घेतला आणि त्या म्हणाल्या, “बाळराजे, आल्या पावली परत जा.” त्याला ते काही कळलं नाही. “काय म्हन्लात?” “जसे आलात तसेच परत जा.”
वसंत कानेटकरांनी येसूबाईंसाठी एक पालुपद दिलं होतं. त्याचाच वापर करत त्या म्हणाल्या, “बस्स, बस्स! हा विषय आता संपला.” कुठला विषय संपला, ते सुजाण प्रेक्षकांना समजल्यानं त्यांनी उत्स्फूर्तपणे हशा-टाळ्यांनी दाद दिली. येसूबाईंनी मग गणोजी, प्रल्हाद, कलुषा यांना हाक मारून बोलावलं आणि ‘हा विषय आता संपला’ म्हणत नाटक पुढे सुरू केलं.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link