Next
शोध अर्थाचा ...
- डॉ. नीलिमा गुंडी
Friday, October 04 | 04:00 PM
15 0 0
Share this story

तुम्ही तळ्यात दगड टाकल्यावर उमटणारे तरंग पाहिले असतील ना! कवितेतल्या शब्दांमुळेही मनात अर्थाचे तरंग उमटतात. त्यामुळे कवितेचा अर्थ शोधण्याचा प्रवास दरवेळी शब्दकोश पाहिल्यासरशी संपत नाही!
नारायण सुर्वे यांनी वेगळ्या ढंगाची कविता लिहिली आहे. ते गिरणी कामगार होते. त्यांचे बालपण कठीण परिस्थितीत गेले होते. त्यांच्या कवितेतून कामगारांची सुखदुःखं व्यक्त झाली आहेत. त्यांच्या एका कवितेत आईच्या मृत्यूचं चित्रण आहे. त्यात कवी भावना व्यक्त करतो त्या अशा : ‘आधीचे काहीच नव्हते, आता आई तीही नाही!’ या एका ओळीत खूप भावना दडलेल्या आहेत. घरातली गरिबी, साध्याशा सोयींचा असणारा अभाव अशी परिस्थिती असते, तेव्हा ‘आई असणं’ हीच मोठी ‘श्रीमंती’ असते! तिची माया अनुभवताना मनाला बळ मिळतं! हे त्या एका ओळीतून कळतं! हे सारं केवळ शब्दाचा अर्थ शोधून कळणार नाही. त्यासाठी कवितेचा भावार्थ कळावा लागतो.
काही वेळा भावना सरळपणे व्यक्त झालेल्या नसतात. दया पवार यांच्या एका कवितेतल्या ओळी आहेत :
‘कशाला झाली पुस्तकांची ओळख?,

बरा ओहोळाचा गोटा!  
गावची गुरं वळली असती!
असल्या इंगळ्या डसल्या नसत्या!’

या ओळी तुम्हा मुलांना कदाचित बुचकळ्यात टाकतील! कारण पुस्तकवाचनाचं महत्त्व घरातून नि शाळेतून तुमच्या मनावर बिंबवलेलं असतं. मात्र सुखाला वंचित राहिलेल्या, अन्याय नि उपेक्षा अनुभवलेल्या या कवीनं या ओळी कोणत्या सुरात लिहिल्या आहेत, हे लक्षात आलं की त्यामागची भावना कळतं. प्रतिकूल परिस्थितीच्या रेट्यामुळे कवीनं हे चिडून म्हटलं आहे. त्यामागे उपरोध आहे. ही परिस्थिती बदलायला हवी, हा कवीचा निर्धार आहे. हाच कवितेचा अर्थ आहे! म्हणजे कधीकधी कवितेचा अर्थ शोधण्यासाठी कवीच्या जगण्याचाही शोध घ्यावा लागतो!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link