Next
‘मिशन शक्ती’
प्रतिनिधी
Friday, March 29 | 04:00 PM
15 0 0
Share this story

भारताने बुधवारी ‘मिशन शक्ती’ कार्यक्रमाअंतर्गत पृथ्वीनिकटच्या कक्षेतील उपद्रवी उपग्रह पाडण्याचे कसब साध्य करून एक महत्त्वाची तांत्रिक व संरक्षणक्षमता प्राप्त केली आहे. सध्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत तसेच आसपासच्या परिसरात सुरू झालेली शस्त्रस्पर्धा लक्षात घेता, भारताने ही क्षमता प्राप्त करणे आवश्यक होते. अवकाशविषयक तंत्रज्ञान हे भारताला कुणाकडूनही उसने मिळालेले नाही. जी काही परदेशी मदत मिळाली, ती अगदीच जुजबी व प्राथमिक स्वरूपाची आहे. त्यामुळे भारताला या क्षेत्रात स्वावलंबी होणे आवश्यक होते. या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी देशातील शास्त्रज्ञांनी फारशी साधने हाताशी नसताना भरपूर परिश्रम केले व देशातच हे तंत्रज्ञान विकसित केले हे विशेष. हे तंत्रज्ञान प्राप्त करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश आहे. अवकाशात शस्त्रस्पर्धा जाणे हे मानवजातीसाठी हिताचे नाही. अशा स्पर्धेत जाण्याची भारताची इच्छाही नव्हती. परंतु भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शेजारी देशांनी ही स्पर्धा अवकाशात नेल्यामुळे भारतापुढे पर्याय राहिला नाही. जगात गेल्या शतकाच्या मध्यात अण्वस्त्रांचा भीषण प्रादुर्भाव झाल्यानंतरही भारताने देशांतर्गत विकसित केलेल्या अणुतंत्रज्ञानाचा दीर्घकाळ शांतताकार्यासाठी वापर केला. शेजारी देशांनी अण्वस्त्रे निर्माण केल्यानंतरही भारताने त्या स्पर्धेत पडण्याचा मोह दीर्घकाळ टाळला. मात्र भारताला घेरण्याचे प्रयत्न सुरू झाले तेव्हा अण्वस्त्रनिर्मितीचा निर्णय घेण्याखेरीज भारतापुढे पर्याय राहिला नाही. पृथ्वीनिकटच्या कक्षेत व त्याही पलिकडच्या कक्षेत अनेक देश सध्या लष्करी उपयोगाचे उपग्रह पाठवित आहेत. या उपग्रहांमुळेच भारताला अणुस्फोट करणे अशक्य झाले होते. त्यामुळे भारतीय अणुशास्त्रज्ञांना या हेरगिरी करणाऱ्या परकी उपग्रहांचा डोळा चुकवून १९९९ साली पोखरणचा दुसरा अणुस्फोट करावा लागला. आताही भारताच्या आकाशावर हेरगिरी करणारे अनेक परकी उपग्रह आहेत. त्यांना आवर घालणे आता भारताला शक्य होईल. भारताने हे अत्यंत महत्त्वाचे तंत्रज्ञान प्राप्त केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाणीवरून केली. सध्याच्या निवडणुकीच्या काळात त्यांनी ही घोषणा करावी की नाही अशी चर्चा सध्या सुरू आहे. परंतु ही राष्ट्रीय उपलब्धी आहे व तिची घोषणा पंतप्रधानांनी केली यात वावगे काही नाही. हे महत्त्वाचे यश काही एका व्यक्तीचे किंवा एका सरकारचे नाही. याचा पाया देश स्वतंत्र झाल्यानंतर तेव्हाचे पंतप्रधान पं. नेहरूंनी घातला होता व त्यानंतरच्या प्रत्येक सरकारने त्यात आपल्या परीने भर घातली होती. हे यश एका पंतप्रधानाचे, एका पक्षाचे वा एका व्यक्तीचे नाही, ते देशाचे व देशातील शास्त्रज्ञांचे आहे. याचा फायदा निवडणूक जिंकण्यासाठी कुणालाही होण्याची शक्यता नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत पोखरणचा दुसरा अणुस्फोट झाला व कारगिलचे युद्धही त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने जिंकले, पण त्याचा फायदा नंतरच्या निवडणुकीत त्यांना झाला नाही. त्यामुळे आताच्या सरकारलाही तसा फायदा होणार नाही. मतदार सरकारच्या व विरोधी पक्षांच्या कामगिरीचे योग्य मूल्यमापन करतो व त्याआधारे मतदान करतो. त्यामुळे ही महत्त्वाची घटना देशाला आपणच सांगावी असे पंतप्रधानांना वाटले असेल तर त्यात काहूर उठवण्यासारखे काही नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भारत आता एक मोठी सत्ता होण्याची सुरुवात झाली आहे. भारताच्या चांद्रयानमोहिमा यशस्वी झाल्या की त्यावर पूर्णपणे शिक्कामोर्तब होईल, तो दिवस आता दूर नाही.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link