Next
बाजारपेठ ते मॉलसंस्कृती
शशिकांत कोठेकर
Friday, November 02 | 04:00 PM
15 0 0
Share this story

एकेकाळी तलावांचे शहर म्हणून ओळख असलेले ठाणे शहर आता मॉलचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. शहरात किती अंतरावर किती मॉल असावेत याचे काही निश्चित ठोकताळे नसले तरी, व्यापाराच्या दृष्टीने विचार करता दोन मॉलमधील अंतर किमान पाच किमीपेक्षा जास्त असेल तरच व्यावहारिकदृष्ट्या ते यशस्वी होऊ शकतात. ठाणे शहरात मात्र एकाच हायवेच्या बाजूला दर दोन-तीन किमी अंतरावर मोठे मॉल उभे राहिले आहेत.

ठाण्याच्या इतिहासात तलावांना महत्त्व आहे. पूर्वी संध्याकाळ झाली, शनिवार-रविवार आला, की तलावाकाठी फिरायला जाणारी मंडळी आता गाडी घेऊन मॉलला भटकायला जातात. शॉपिंग करा नाहीतर विंडो शॉपिंग करा... आणि मग मनसोक्त हव्वे ते खा... थोडी मौजमजा करा... सिनेमा पाहा आणि घरी जा.. असा ट्रेन्ड पसरू लागला आहे. प्रत्येक जिल्हा, तालुक्याच्या ठिकाणी असते तशी जुनी बाजारपेठ आजही ठाण्यात आहे. सकाळच्या वेळेस भाज्यांचे ट्रक येथे येतात आणि स्टेशन रोडवरच सकाळचा भाजीबाजार भरतो. तेथे अगदी स्वस्तात होलसेल दरात आठवडाभराच्या भाज्या घेऊन जायला आजही जुने ठाणेकर येत असतात. तसाच प्रकार स्टेडियमजवळील फिश मार्केटपाशी होतो. सकाळी ५.३० ते ६ च्या सुमारास जिल्हयाच्या ग्रामीण भागातून आदिवासी, स्थानिक आगरी-कोळी त्यांनी पकडलेले मासे, गावठी कोंबड्या वगैरे घेऊन विक्रीसाठी येथे येतात. अगदी पाटीभर मासे, खेकडे, ताज्या भाज्या विकल्या जातात. येथील जुन्या बाजारपेठा पिढयान्पिढ्या ग्राहकांशी नाते जोडून आहेत. आता व्यापाऱ्यांचीही नवीन पिढी दुकानावर बसू लागली आहे आणि मॉल कल्चरचा आग्रह धरत ग्राहकांच्या सोयीसाठी होलसेल मार्केटमधील काही दुकानदारांनी त्यांच्या दुकानात बदल करून त्याला मिनी स्टोअर, मॉलचे स्वरूप दिले आहे. त्याला ग्राहकांची पसंतीदेखील मिळत आहे. ही जुनी बाजारपेठ मात्र ग्राहकांसाठी आजही सर्व प्रकारच्या खरेदीसाठी पसंतीचे ठिकाण बनली आहे. सणांच्या दिवसांत तर येथील रस्त्यावरून चालायलाही जागा नसते. आजही ठाण्याच्या विविध भागांत असलेल्या दुकानांना बाजारपेठेतील होलसेल मार्केटमधील दुकानांतून पुरवठा केला जातो. ठाण्याच्या विविध भागात आठवडा बाजाराची संकल्पना होती. ती काहीशी आता मोडीत निघत आहे.

नवीन पिढी मात्र बाजारपेठेतील अरुंद रस्त्यावर सामान घ्यायला जाण्यापेक्षा मॉलमध्ये गाडी पार्क करून एसीमधील शॉपिंग करायला लागली आहे. मॉलसंस्कृतीचा मुंबई-ठाण्यातील इतिहास पाहिला तर, १९९९ साली ताडदेव-हाजीअलीला १४ हजार चौरस मीटर जागेवर क्रॉसरोड मॉल, ज्याचे नाव नंतर सोबो मॉल केले तो, सुरू झाला. याच काळात गावपण जपत असलेल्या ठाणे शहरात टी. चंद्रशेखर हे धडाकेबाज आयएएस अधिकारी पालिका आयुक्त म्हणून आले आणि शहराचे रूपडे बदलायला सुरुवात झाली. शहरातील रस्ते, चौक रुंद झाले. २००० सालापर्यंत चंद्रशेखर ठाण्यात होते. त्या काळात बडे बिल्डर, विकासक यांचे ठाण्याकडे लक्ष जाऊ लागले. औद्योगिक नगरी असलेल्या ठाण्यात मोठ्या प्रमाणावर जमिनी विकासासाठी उपलब्ध होऊ लागल्या आणि ठाण्यातील अनेक मोठे बिल्डर ठाण्यात आले. घोडबंदर रोडच्या दोन्ही बाजूला असलेल्या मोकळ्या जागा स्वस्तात मिळू लागल्या, तेव्हा अनेक विकासकांनी खाजगी बससेवा त्यांच्या कॉम्प्लेक्सपासून स्टेशनला सुरू केली.

ठाण्यातील तीन हात नाका या महत्त्वाच्या जंक्शनला इटर्निटी हा ठाण्यातील पहिला शॉपिंग मॉल सुरू झाला. तो काळ होता २००५ चा. मुंबईतील अकबरअलीजच्या धर्तीवर मॉलची रचना होती. पुढे कोरम, विवियाना, बिग बाजार ठाण्यात सुरू झाले आणि इटर्निटी मॉलची सद्दी केव्हाच संपली. आता तेथे केवळ थिएटर व ऑफिसेस सुरू आहेत.

सन २००० नंतर ठाण्यात हायपरसिटी, रिलायन्स, स्टार बाजारसारखे मोठे ब्रॅन्ड येऊ लागले. मात्र त्यातील कोणीही मोठे मॉल सुरू केले नाहीत. अपना बाजार, सहकारी भांडारसारखे छोट्या जागेत त्यांनी पहिली एक-दोन वर्षे सुपर मार्केट धर्तीवर काम सुरू केले. हे छोटे सुपर मार्केट म्हणजे आमच्यासाठी लिटमस टेस्ट असते, एखाद्या शहरात मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा छोटी जागा भाड्य़ाने घेऊन तेथे व्यवसाय करायचा आणि त्या शहरातील ग्राहकांची पत, खरेदीची टेस्ट तपासायची असे आमचे मार्केटिंगचे सूत्र असते, अशी माहिती या क्षेत्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

छोट्या सुपर मार्केटचा फंडा यशस्वी ठरल्यावर मग मोठे ब्रॅन्ड शहरात हातपाय पसरू लागले. २००५ च्या सुमारास रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी मंदी आली होती. त्यानंतर हळूहळू मंदी उठली आणि रिअल इस्टेटने जोर धरला. त्यानंतर फ्युचर ग्रुपच्या बिग बाजारचा ठाण्यात प्रवेश झाला. तीनमजली वास्तूत बिग बाजार सुरू झाले आणि ठाणे-भिवंडी-कल्याणपासून लोक खरेदीसाठी येथे येऊ लागले. त्याआधी डी-मार्टसारखा ब्रॅन्ड ठाण्यात खेवरा सर्कल परिसरात छोट्या जागेत पाय रोवू पाहत होता. कापूरबावडी नाक्यावरील बिग बाजारला चांगलाच प्रतिसाद मिळू लागला. इतर मॉल्स सुरू झाल्यावर बिग बाजारकडील गर्दी काहीशी कमी झाली. मध्यमवर्गींयांची पसंती मात्र बिग बाजारलाच होती. सध्या बिग बाजारने त्यांची तीनमजली वास्तू एका शाळेला दिली असून बिग बाजार बाजूला असलेल्या हाय स्ट्रीट मॉलमध्ये स्थलांतरित झाले आहे.

२००९ साली हायवेला लागून शहरातच कॅडबरी कंपनीजवळ तब्बल १० लाख चौरस फूट क्षेत्रफळावर उभारलेला कोरम मॉल ठाणेकरांचे आकर्षण बनला. ११०० मोटारी व ७०० दुचाकी पार्किंगची भव्य सोय येथे आहे आणि सुट्टीच्या दिवशी हे पार्किंगही भरून जाते. कोरम मॉलमध्ये सगळे प्रसिद्ध ब्रॅन्ड आले आणि शॉपिंगचा व हौशी खादाडीचा वेगळा चस्का ठाणेकर अनुभवू लागले. कोरम मॉल हा ठाण्यातील इटर्निटी मॉलपासून दोन किमीवर तर बिग बाजारपासून तीन किमीच्या आत आहे. 

यानंतर २०१३ साली सुरू झालेला विवियाना मॉल हा ठाणे-मुंबईतील सर्वात मोठा मॉल ठरला. १३ एकर जागेवर हा मॉल वसलेला आहे. २५० पेक्षा जास्त दुकाने येथे आहेत. जगभरातील सगळे ब्रॅन्ड येथे उपलब्ध आहेत. पार्किंगसाठी दीड हजारांहून अधिक चारचाकी व हजारपेक्षा जास्त दुचाकींची सुविधा येथे आहे. कोरम व विवियाना दोन्ही मॉल शनिवार-रविवार खच्चून भरलेले असतात. या मॉलपासून कोरम व बिग बाजार दोन किमीच्या आत आहे.

घोडबंदर रोडवरच पुढे मानपाडा येथे आर मॉल सुरू झालेला आहे. तेथेही शॉपिंगची सगळी सुविधा आहे. त्यानंतर कोलशेत रस्त्यावर व आनंदनगरला डी-मार्ट शोरूम आहे. तेथे फक्त किराणा सामान शॉपिंगची सोय आहे. ठाण्याहून बोरीवलीला जायला निघालो की कासारवडवलीला बिग मॉल आहे. येथेही पार्किंगची चांगली सोय आहे.

रिलायन्सने एकदम भल्या मोठ्या जागा घेण्यापेक्षा मॉलमधील जागा भाड्याने घेऊन रिलायन्स फ्रेश, डिजिटल स्टोअर आदी सुरू केले. इलेक्ट्रॉनिक्स विक्रीसाठी कोहिनूर, विजय सेल्ससारख्या मोठ्या ब्रॅन्डची अनेक शोरूम ठाण्यात आहेत.   ठाणे शहरातून जात असलेल्या हायवेच्या दोन्ही बाजूला हे मॉल उभे राहिले आहेत. एकीकडे मॉल कल्चर विकसित होत असताना ठाण्यातील जुने सहकारी भांडार, समर्थ भांडार, मात्र या स्पर्धेत टिकू शकले नाही. ठाण्याचे उपनगर असलेल्या कळव्यातील सहकार बाजार मात्र या स्पर्धेत तग धरून राहिलेला दिसतो.

बड्या मॉल्समधून शनिवार-रविवार वगळता खरेदीसाठी फारशी गर्दी दिसत नाही हे सत्य असले तरी, मॉल कल्चर जिवंत ठेवण्यासाठी, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मॉलवाल्यांना विविध कार्यक्रम नेहमी ठेवावे लागतात. पूर्वी एखादा सिनेमा प्रदर्शित व्हायचा त्याआधी सिनेमंडळी केवळ मुंबईत हजेरी लावायची, आता ठाण्यातही बडे सिनेस्टार येऊन चित्रपटाची प्रमोशन्स करतात. गाव असलेले ठाणे आता बदलले आहे. मालाड, अंधेरी, कांदिवलीचे घरांचे दर आणि ठाण्यातील घरांचे दर आता समान झाले आहेत. वाढत्या शहरीकरणात गावाचे गावपण, इथली संस्कृती... कल्चर आता बदलत चालले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link