Next
सर्वांगसुंदर सूर्यनमस्कार
वृंदा प्रभुतेंडुलकर
Friday, September 06 | 04:00 AM
15 0 0
Share this story

सूर्यनमस्कार या व्यायामप्रकाराची प्राथमिक माहिती आपण मागील लेखात घेतली. आता या दहा अंकी आसनमालिकेतील प्रत्येक आसन रेचक-पूरकासह करण्याची सविस्तर कृती पाहू.
सूर्यनमस्कारासाठी विश्राम व सावधानची स्थिती पुढीलप्रमाणे असावी.
विश्राम : दोन्ही पायांमध्ये एक ते दीड फुटाचे अंतर ठेवावे. डाव्या हाताच्या तळव्यामध्ये उजवा हात याप्रमाणे दोन्ही हात पाठीमागे पकडावे.
सावधान : डावा पाय उचलून उजव्या पायाजवळ आणावा. पायांच्या टाचा एकमेकांना जुळलेल्या ठेवाव्या. दोन्ही पायांचे पंजे ४५ अंशांच्या कोनात असावेत. दोन्ही हातांच्या मुठी अर्धवट मिटलेल्या व दोन्ही हात शरीराच्या जवळ ठेवावेत.
१० आसनांच्या मालिकेचा सूर्यनमस्कार पुढीलप्रमाणे करावा.ऊर्ध्वनमस्कारासन
सावधान. दोन्ही हात जुळवून श्वास भरत भरत डोक्यावर न्यावे. कंबरेखालचे शरीर वाकू न देता वरील शरीराला मागे बाक द्यावा. मस्तक मागे झुकवलेले ठेवावे. दोन्ही दंड कानाला स्पर्श केलेले आणि हात कोपरांमधून सरळ ठेवावेत.
 
 


जानुशिरासन
श्वास सोडत कंबरेतून पुढे येऊन दोन्ही हातांचे तळवे दोन्ही पावलांच्या बाजूला जमिनीवर टेकवावेत. डोके गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही पायांचे गुडघे ताठ ठेवावेत. पाय गुडघ्यांतून वाकवू नयेत.
 


एकपाद प्रसरण
पूरक करून डावा पाय मागे न्यावा. डाव्या पायाचा चवडा व गुडघा जमिनीला टेकवावा. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर स्थिर ठेवून हात कोपरांमध्ये ताठ ठेवावेत. छातीचा भाग पुढे काढून कंबरेचा भाग जास्तीत जास्त जमिनीकडे दाबावा. नजर समोर स्थिर ठेवावी.
 द्विपाद प्रसरण
उजवा पाय मागे नेऊन डाव्या पायास समांतर ठेवावा. दोन्ही खांद्यांपासून पायाच्या टाचांपर्यंत सर्व शरीर एका रेषेत ठेवावे. पायांचे गुडघे व हातांचे कोपरे ताठ ठेवावेत. दृष्टी शरीराला काटकोनामध्ये जमिनीकडे असावी. दोन्ही हातांचे तळवे व पायांच्या चवड्यांवर शरीर तोलून रेचक करावा. पुन्हा पूरक करावा.
 


अष्टांगनमस्कार
दोन्ही हातांचे तळवे व पायांचे चवडे ही चार अंगे जमिनीस लागलेली असताना दोन्ही गुडघे, छाती व कपाळ ही चार अंगे जमिनीस एकाच वेळी लावावी व रेचक करावा. या वेळी गुदद्वाराचा भाग वर उचलला जाऊन ओटीपोटाचा भाग दाबला जाईल असे पाहावे. दोन्ही हातांचे कोपरे शरीराच्या जवळ ठेवावेत.
            


सर्पासन
पूरक करत डोक्यापासून कंबरेपर्यंतचे शरीर वर उचलावे. छाती फुलवलेली असावी. समोर पाहावे. दोन्ही हातांच्या कोपरांमध्ये बाक असावा. गुडघे शक्यतो जमिनीला टेकवू नयेत.
भूधरासन
पायांचे चवडे आणि तळहात जागचे न हलवता कंबरेचा भाग रेचक करत करत शक्य तितका वर उचलावा. हात व पाय ताठ असावेत. पायाच्या टाचा पूर्णपणे जमिनीला टेकलेल्या ठेवण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे नजर ठेवावी. रेचक पूर्ण करावा.  
 एकपाद आकर्षण
पूरक करत प्रथम मागे नेलेला पाय म्हणजे डावा पाय पुन्हा पुढे आणावा. त्याचे पाऊल दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये आणावे. कंबरेचा भाग जमिनीकडे दाबावा. छाती पुढे काढावी. नजर समोर ठेवावी. (एकपाद प्रसरण सारखीच स्थिती, पण पाय बदलून).
 


द्विपाद आकर्षण
हातांचे पंजे न हलवता उजवा पाय पुढे आणून डाव्या पायाशेजारी, दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये ठेवावा. दोन्ही पाय गुडघ्यांतून सरळ ठेवावेत व कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करावा. (जानुशिरासन स्थितीप्रमाणे) रेचक करावा.
 
 


सावधान स्थिती
पूरक करत ताठ उभे राहावे.
   
 रेचक-पूरकांचा क्रम लक्षात न राहिल्यास पूर्ण वेळ स्वाभाविक श्वास-प्रश्वास चालू ठेवले तरी चालेल.
वरील प्रकारे दहा अंकांचा सूर्यनमस्कार करण्यापूर्वी ॐ आणि बीजाक्षरासह सूर्याचे नाव घेण्याचा प्रघात आहे. ऱ्हाम्, ऱ्हीम्, ऱ्हूम्, ऱ्हैम्, ऱ्हौम्, ऱ्ह: ही सहा बीजाक्षरे असून प्रत्येकाच्या उच्चारणाने जिभेचा टाळूला वेगवेगळेळ्या प्रकारे स्पर्श होतो व त्यामुळे मेंदूमध्ये चालना उत्पन्न होते. चेतनेचा प्रवाह ज्ञानतंतूंमार्फत सर्व स्थूल व सूक्ष्म ज्ञानेंद्रियांपर्यंत पोहोचून शरीरात स्फूर्तिदायक ऊर्मी जागृत होतात. मन प्रसन्न व सकारात्मक होत जाते. ॐच्या उच्चाराने हृदयक्रियेला उत्तेजना मिळते. सूर्यनमस्कारांतर्गत आसनांचे जे अनेकविध लाभ आहेत, त्यांच्या जोडीने हे मानसिक व आध्यात्मिक लाभ मिळवण्यासाठी पुढीलप्रमाणे सराव करावा.
सहा बीजाक्षरे आणि सूर्याची बारा नामे यांची सांगड घालताना प्रथम ॐ, नंतर बीजाक्षर व त्यानंतर सूर्याच्या एका नावाचा उच्चार करावा, आणि दहा अंकांचा एक सूर्यनमस्कार घालावा. अशाप्रकारे सहा सूर्यनमस्कारांपर्यंत क्रमश: सहा बीजाक्षरे पूर्ण झाल्यानंतर उरलेल्या सहा नामांसाठी पुन्हा हीच बीजाक्षरे त्याच क्रमाने उच्चारावीत.
ॐ ऱ्हाम् मित्राय नम:    ॐ ऱ्हीम् रवये नम:    ॐ ऱ्हूम् सूर्याय नम:
ॐ ऱ्हैम् भानवे नम:    ॐ ऱ्हौम् खगाय नम:    ॐ ऱ्ह: पूर्ष्णे नम:
ॐ ऱ्हाम् हिरण्यगर्भाय नम:    ॐ ऱ्हीम् मरिचये नम:    ॐ ऱ्हूम् आदित्याय नम:
ॐ ऱ्हैम् सवित्रे नम:    ॐ ऱ्हौम् अर्काय नम:    ॐ ऱ्ह: भास्कराय नम:


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link