Next
विस्तारली चहाची पाळेमुळे
जगन्नाथ श्रावगेे
Friday, September 06 | 01:30 PM
15 0 0
Share this story


चीन हा चहा पिणारा जगातील पहिला देश. ख्रिस्तपूर्व २७३७ मध्ये चीनचा राजा शेंग नुंग याला चहाच्या शोधाचा मान दिला जातो. अशी वंदता आहे, की एकेदिवशी शेंग नुंग शेकोटीवर पाणी गरम करत असताना जी झाडे जाळत होता, त्याची काही पाने उकळत्या पाण्यात पडली आणि त्याला अनोखा रंग आणि चव आली. ही चहाची पाने होती. अशा रीतीने जगातील पहिला चहा तयार झाला म्हणे! चहाच्या उगमाची दुसरी कथा ख्रिस्तपूर्वी ३०० ते २२१ दरम्यानची. त्याकाळी एक महान निसर्गोपचारतज्ज्ञ होता आणि त्याला ८४ हजार औषधी वनस्पतींचे ज्ञान होते. मात्र त्यातील केवळ ६२ हजार औषधी वनस्पतींची माहितीच तो मुलापर्यंत पोहोचवू शकला आणि त्याचा मृत्यू झाला. परिणामी २२ हजार औषधी वनस्पतींची माहितीही त्याच्यासोबत लुप्त झाली. मात्र याच २२ हजार वनस्पती त्याच्या समाधीवर उगवल्या म्हणे, आणि या वनस्पती म्हणजेच चहा.
चीनने अशा रंजक कथा सांगितल्यावर जपान थोडेच मागे राहणार. त्यांचे म्हणणे असे, की बोधिधर्म नावाचा संन्यासी ध्यान करत होता. त्यातच त्याला झोप लागली. यामुळे चिडून त्याने स्वतःच्या पापण्याच कापून टाकल्या. आश्चर्य म्हणजे त्याच्या पापण्यांपासून एक झाड तयार झाले आणि त्यात अद्वितीय शक्ती होती-झोप लागू न देण्याची. हे झाड म्हणजेच चहाचे झाड.
या सुरस कथांच्या पलीकडे जाऊन शोध घ्यायचा ठरवल्यास चीनमध्ये इसवी सनपूर्व ६ मध्ये औषधी म्हणून चहाचा उपयोग होत होता, याचे पुरावे सापडतात. त्यामुळे चहाचे पहिले व्यावसायिक उत्पादनही चीनमध्येच सुरू झाले. कालांतराने जपान, दक्षिण पूर्वेतील आशियायि देश, मंगोलिया, तिबेट वगैरे देशांमध्ये चहा पिण्याची पद्धत रूढ झाली. पुढे हे पेय मध्य-पूर्वेतील देशांपर्यंत पोहोचले. पाश्चिमात्य देशांना १७व्या शतकात चहाची चटक लागली. युरोपीयन व्यापाऱ्यांनी जहाजाच्या मार्गाने चहा आपल्या देशात नेला आणि जागतिक नकाशावर या पेयाची ओळख निर्माण झाली.
ब्रिटिश सरकारने १ फेब्रुवारी १९३४ रोजी ‘टी कमिटी’ची स्थापना केली व देशात कुठे कुठे चहाची लागवड होऊ शकते, याचा आढावा घ्यायला सुरुवात केली आणि आसामची निवड केली. पण ‘मूळ’ चिनी चहावरील प्रेम काही कमी होत नव्हते, म्हणून त्यांनी पुन्हा चिनी चहाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र व्यावसायिकदृष्ट्या त्यात यश आले नाही. मग त्याची एक हायब्रिड प्रजाती लावण्यात आली आणि १८३६ मध्ये त्याचा पहिला नमुना टी कमिटीच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला. या नमुन्याला व्हाइसरॉय लॉर्ड ऑकलंडचीही मंजुरी मिळाली.

चहाचा पहिला लिलाव
आसामी चहाचे काही नमुने पुढच्या वर्षी पुन्हा टी कमिटीकडे पाठविण्यात आले. त्यांनी पुढे त्याला लंडनला लिलावासाठी पाठविले आणि १० जानेवारी १८३९ रोजी भारतातून गेलेल्या चहाचा लंडनमध्ये पहिला लिलाव झाला. यामुळे लंडनमध्ये चांगली उत्सुकता निर्माण झाली आणि आपल्या लोकांनी तयार केलेला चहा मिळाल्याबद्दल ‘देशाभिमान’ही जागृत झाला. यातून मग चहा कंपनीच्या स्थापनेच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात झाली आणि त्याच वर्षी ‘आसाम कंपनी’ची स्थापना झाली. या कंपनीने ५ लाख डॉलरचे (आजच्या भावाने ३ कोटी ६० लाख रुपये) शेअर्सही विक्रीसाठी आणले आणि आधीच झालेल्या वातावरणनिर्मितीमुळे ते हातोहात विकलेही गेले. १८५१ मध्ये आसाममध्ये ५१ चहाचे मळे होते १८६२ पर्यंत ही संख्या तिपटीहून अधिक वाढून १६० पर्यंत पोहोचली. आसाममधील चहाला मिळालेल्या यशानंतर कुमाऊं, गढवाल, देहराडून, कांगडा, कुलू, डूअर्स, निलगिरी, दार्जिलिंग या क्षेत्रात चहाचा विस्तार होऊ लागला.

चहाचे उत्पादन

जागतिक पातळीवर चीन हा सर्वाधिक चहाउत्पादन (सुमारे २६ लाख मेट्रिक टन) करणारा देश. त्यानंतर भारत (१३ लाख मेट्रिक टन), केनिया (५ लाख मेट्रिक टन), श्रीलंका (३ लाख मेट्रिक टन), व्हिएतनाम (१.७ लाख मेट्रिक टन), इंडोनेशिया (१.३ लाख मेट्रिक टन) यांचा क्रमांक लागतो. देशात चहाचे सर्वाधिक उत्पादन आसाममध्ये होते. त्यानंतर पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ वगैरेंचा क्रमांक लागतो. गेल्या आर्थिक वर्षात उत्तर भारतात ११२४ दशलक्ष किलो तर दक्षिण भारतात २२६ दशलक्ष किलो चहाचे उत्पादन झाले.

चहाचा खप
जगाच्या चहाच्या गरजेपेक्षा ५ टक्के अधिक चहाचे उत्पादन होते. भारत चहाचे उत्पादन करणारा दुसरा सर्वात मोठा देश आणि चहाचा सर्वाधिक वापर करणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश. देशात उत्पादन झालेला ८० टक्के चहा देशातच विकला जातो. टी बोर्डाने काही वर्षांपूर्वी देशातील नागरिकांचा चहा पिण्याचा कल जाणून घेतला. त्यानुसार, देशातील ६४ टक्के जनता चहा पिणारी आहे. जवळपास ८८ टक्के कुटुंब आणि त्यातील ९६ टक्के लोक चहा पितात. आश्चर्याची बाब म्हणजे देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागात चहाचे उत्पादन होत असले तरी या ठिकाणी सर्वात कमी (१८-१९टक्के) खप होतो. उत्तर आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये चहा पिण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

चहाची निर्यात
उत्पादनात तिसरा क्रमांक असला तरी निर्यातीत केनियाचा पहिला क्रमांक लागतो. उत्पादनापैकी ९० टक्के म्हणजे पावणेपाच लाख मेट्रिक टन चहा केनिया निर्यात करतो. त्यानंतर चीन (३.६४ लाख मेट्रिक टन), श्रीलंका (२.७१ लाख मेट्रिक टन), भारत (अडीच लाख मेट्रिक टन) यांचा क्रमांक लागतो. भारतातून सर्वाधिक चहा रशिया आणि आसपासच्या देशांना पाठविला जातो. त्यानंतर अनुक्रमे इराण, संयुक्त अरब अमिराती, ब्रिटन, पाकिस्तान, अमेरिका, जर्मनी, चीन यांचा क्रमांक लागतो.

चहाचा प्रचार-प्रसार
जगातील सर्वाधिक चहा भारतात प्यायला जात असला तरी त्याचा दरडोई खप हा जगातील इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. भारतात वर्षाला दरडोई ७५० ग्रॅम चहा प्यायला जातो आणि गेली ४ काही वर्षे हे प्रमाण कायम आहे. एकीकडे उत्पादन वाढत असताना मागणी कमी असल्याने संतुलन बिघडते आहे. त्यामुळे टी-बोर्ड, इंडियन टी असोसिएशनने चहाच्या प्रचार प्रसारासाठी अनेक प्रयत्न हाती घेतले आहेत. टी असोसिएशनने जुलै २००१ मध्ये ‘चहा आणि आरोग्य’ याविषयावर दिल्लीमध्ये एका परिषदेचे आयोजन केले होते. देशातील १७ ते २४ वयोगटातील ५० टक्क्यांहून कमी युवक दिवसाला एक कपापेक्षा कमी चहा पितात हे लक्षात आल्यावर त्यांना केंद्रस्थानी ठेवून मोहीम आखण्यात आली. त्यासाठी कोल्ड टी, फ्लेवर्ड टी या मार्गाने कॉलेजांच्या फेस्टिव्हलमध्ये जाऊन प्रचार-प्रसार करण्यात आला. टी बोर्डाकडूनही देशविदेशातील प्रदर्शनांमध्ये सहभाग, महोत्सवांचे आयोजन, बैठका, परिषदा याद्वारे चहाच्या प्रसार-प्रचारासाठी आणि खप वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात.

उत्पादक आणि मजूरसंघटना
देशातील नक्षलवादी चळवळीचा उगम चहाउत्पादक आणि चहाच्या मळ्यातील मजूर यांच्यामध्ये आहे. पण, ही चळवळ सुरू होण्याच्या आधी सुमारे ७५ वर्षांपूर्वीच चहाचा वाढता व्यापार आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या कायदा सुव्यवस्था, मजूर यांच्या समस्यांमुळे देशात १८८१ मध्ये ‘इंडियन टी असोसिएशन’ची स्थापना झाली तर १८९५ मध्ये ‘युनायटेड प्लांटर्स असोसिएशन ऑफ साउथ इंडिया’ची स्थापना झाली. त्यानंतर विभागनिहाय, राज्यनिहाय, पक्षनिहाय संघटना स्थापन झाल्या. परंतु एकजूट केली तर समस्या लवकर सोडवता येतील हे ध्यानात आल्यावर १९५६ मध्ये ‘कन्सल्टेेटिव्ह कमिटी ऑफ टी प्रोड्युसर्स असोसिएशन’ची स्थापना झाली.

छोट्यांची संघटना
देशातील प्रामुख्याने आसाममधील छोट्या चहा उत्पादकांना एकत्र आणण्यासाठीही विविध संघटना स्थापन होऊ लागल्या आहेत. त्यापैकी एक असलेल्या आसाम शुद्रं चहा शेती उन्नयन समन्वय समितीने या छोट्या उत्पादकांमार्फत तयार होणाऱ्या चहाच्या ब्रँडिंगचे प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्याच महिन्यात त्यांनी आसामिया रेड आणि आसामिया ग्रीन नावाने दोन नवे ब्रँड सादर केले. हे सादर करण्यापूर्वी अनेक चाचण्या, प्रयोग करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.

७५ हजार रुपये किलोचा चहा

देशातील लिलावातील चहाच्या सरासरी किमती किलोमागे १४० रुपयांच्या आसपास आहेत. दार्जिलिंग टी सर्वाधिक महाग म्हणजे सरासरी ४१९ रुपये किलोने तर उत्तराखंडमधील सीटीसी सर्वात स्वस्त म्हणजे ७२ रुपये किलोने लिलावात विकला गेला. पण चहाच्या काही विशिष्ट जातींच्या किमती किलोमागे ५० हजार, ७० हजार, ७५हजार अशासुद्धा आहेत. गेल्याच महिन्यात आसाममधील डिकोम टी इस्टेट गार्डनमधील गोल्डन बटरफ्लाय आणि अरुणाचलच्या डोन्यीपोलो टी इस्टेटमधील गोल्डन नीडल चहाला ७५ हजार रुपये किलो हा विक्रमी भाव मिळाला. यापूर्वी हा विक्रम मैजान ऑर्थोडॉक्स गोल्डन टीच्या (७० हजार रुपये किलो) नावावर होता. तिने मनोहारी गोल्डचा (५० हजार रुपये किलो) विक्रम मोडीत काढला होता. गोल्डन बटरफ्लाय ही चहाची पाने नव्हे तर कळ्या आहेत. त्यामुळे यापासून काळ्या नव्हे तर सोनेरी रंगाचा चहा तयार होतो. संध्याकाळी सूर्य मावळतीला गेल्यावर फुलपाखरे चहाच्या झाडाच्या ज्या कळ्यांवर बसतात, त्यांचा पाठलाग करून या कळ्या चहासाठी निवडल्या जातात.

दार्जिलिंगच्या नावाखाली नेपाळी
दार्जिलिंगच्या चहाचे स्वतःचे खास वैशिष्ट्य आहे. शॅम्पेनप्रमाणे केवळ दार्जिलिंगमध्ये अशाप्रकारचा चहा तयार होतो. या चहाला जीआय टॅगही मिळाला आहे, टी बोर्डाकडून यासाठी स्वतंत्र लोगो विकसित करण्यात आला आहे. दार्जिलिंग भागातील ८७ चहाच्या मळ्यांतून तयार होणाऱ्या चहासाठीच हा लोगो वापरण्याची मुभा आहे. मात्र या ठिकाणी तयार होणाऱ्या चहाच्या चौपट चहा दार्जिलिंग चहा नावाने जगभरात विकला जातो आहे. येथून जवळच असलेल्या नेपाळमधील छोट्यामोठ्या उत्पादकांचा चहा, जगभरात दार्जिलिंग चहा या नावाने विकला जातो.

आर्थिक संकट

देशातील चहाची मागणी, निर्यात, किंमत गेल्या कित्येक वर्षांत फारशी वाढलेली नाही. उत्पादन, उत्पादनखर्च, कामगारांचे पगार मात्र मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. चहाच्या लिलावात मिळणाऱ्या किमतीतून उत्पादनखर्चही निघत नाही. त्यातच छोट्या चहाउत्पादकांकडून होणारे चहाचे उत्पादन गेल्या ५ वर्षांत ५६ टक्क्यांनी वाढले. बँकांनी कर्ज देणेही थांबविले आहे. त्यामुळे दरवर्षी नवरात्रीच्या काळात दिला जाणारा २० टक्के बोनस यंदा देणे शक्य नसल्याचे कन्सल्टेटिव्ह कमिटी ऑफ प्लँटेशन असोसिएशनचे म्हणणे आहे. उलट सरकारनेच आम्हाला आर्थिक पॅकेज द्यावे अशी त्यांची मागणी आहे. 


चहा विषयाचे महात्म्य आणखी वेगळ्या पद्धतीने उलगडणारे


हे दोन्ही लेख जरूर वाचा...

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link