Next
‘एल निनो’ आणि ‘ला नीन’ची कथा
दिलीप नेर्लीकर
Friday, October 04 | 04:00 PM
15 0 0
Share this story

गोष्ट आहे १८९२ सालची. दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशाच्या आरमारातील एक अधिकारी कॅमिलो काराल्लो याची. नेहमीप्रमाणे देशाच्या सागरी सीमेचं संरक्षण करण्याचं काम तो आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबर इमानेइतबारे करायचा. परंतु काही माणसं नेमून दिलेलं काम तर करतातच शिवाय त्यापलीकडे जाऊन ते इतरही काही महत्त्वाच्या नोंदी, बाबींची नोंद घेत असतात. ही काही त्यांची जबाबदारी नसते, परंतु या माहितीचा इतरांना आणि आपल्या देशाला उपयोग व्हावा हा त्यामागचा उद्देश असतो. अशीच माणसं नकळत काही वेळा कुठल्यातरी क्रांतिकारी शोधाला कारणीभूत होतात. कॅमिलोचंही असंच झालं. तो नेहमीप्रमाणे किनाऱ्यावर गस्त घालत असताना एक असाधारण बाब त्याच्या निदर्शनास आली. सूर्याच्या उष्णतेनं समुद्राचं पाणी तापतं हे आपल्याला माहीत आहे. परंतु त्या दिवशी त्याला जाणवलं, की पाण्याचं तापमान नेहमीपेक्षा अधिक आहे. गोष्ट तशी साधी. कॅमिलोनं किनाऱ्यावर येताच ही बाब आपल्या वरिष्ठांना सांगितली. पृथ्वीवरील अनेक राष्ट्रांना आपल्या असंख्य लीलांनी सतावणाऱ्या आणि कोट्यवधी लोकांच्या जीवनमानावर अगणित परिणाम करणाऱ्या हवामानातील एका परिणामाचा त्यानं नकळत शोध लावला होता.
विषुववृत्ताजवळील प्रशांत समुद्रालगतच्या पेरू आणि पापुआ न्यूगिनी या देशांच्या जवळच्या सागरातील पाण्याचं सरासरी तापमान अर्ध्या डिग्रीनं कमी-जास्त झालं तरी त्याचे दूरगामी परिणाम अनेक देशांतील हवामानावर होतात. हा सागराच्या तापमानातील बदल नेहमी डिसेंबरच्या मध्यास आणि ख्रिसमसच्या आसपास जाणवायला लागतो, असाही अनुभव त्यांना आला. याचमुळे या वातावरणातील बदलाचे नामाभिदान एल निनो असं करण्यात आलं. दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर बोलल्या जाणाऱ्या स्पॅनिश भाषेत याचा अर्थ होतो, छोटा ख्रिस्त किंवा इन्फट जीसस. या समुद्रातील पाण्याच्या वाढलेल्या तापमानाचा जो काही परिणाम जगभर जाणवतो अगदी त्याउलट पाण्याचं तापमान कमी झालं तरी पृथ्वीवरील अनेक भागांत त्याचा परिणाम जाणवतो असाही अनुभव जगानं आजवर घेतला आहे. अशा या उलट्या बदलला ‘ला निना’ या नावानं संबोधण्यात येतं. ‘ला नीना’ म्हणजे छोट्या ख्रिस्ताची छोटी बहीण. बरं हा तापमानातील बदल फार मोठा असण्याची गरज असत नाही. अगदी अर्ध्या डिग्रीनं वाढलेलं किंवा कमी झालेलं तीन महिन्यांचं सरासरी तापमान जगभरात संहारक बदल घडवण्यास कारणीभूत ठरतं. त्याबद्दल आपण जाणून घेऊच, पण त्याआधी थोडी पूर्वपीठिका.
समुद्राच्या पृष्ठभागाजवळून वाहणाऱ्या वाऱ्याना surface winds म्हणतात. परंतु खलाशी लोकांना त्यांची ओळख ‘व्यापारी वारे’ अशीच आहे. याचं कारण पूर्वी शिडांची जहाजं असायची आणि ती पूर्णपणे अशा वाऱ्याच्या जोरावरच चालायची. दळणवळणाची इतर माध्यमं त्याकाळी उपलब्ध नव्हती त्यामुळे जगभरचा व्यापार अशा शिडांच्या जहाजांवर अवलंबून असायचा. त्यामुळे त्या वाऱ्यांना व्यापारी वारे म्हणून संबोधलं जाऊ लागलं. हे व्यापारी वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. दक्षिण अमेरिकेतल्या सागराचं सूर्याच्या उष्णतेनं तापलेलं पाणी हे आपल्या आशिया खंडाकडे वाहू लागतं आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी दक्षिण अमेरिकेतल्या समुद्राच्या तळातलं गार पाणी वर येतं. याचा परिणाम म्हणून इंडोनेशियाजवळील समुद्राची पातळी अर्ध्या एक मीटरनं वाढते. त्यामानानं इक्वाडोर देशाच्या जवळील पाण्याची पातळी कमी होते. हे दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात अनुभवायला मिळतं. काही वेळा व्यापारी वारे नेहमीपेक्षा क्षीण होतात आणि त्यांची ही दरवर्षी जाणवणारी हालचाल मंदावते. अशावेळी पूर्व प्रशांत समुद्रातल्या पाण्याचं तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा वाढतं. त्याचवेळी पश्चिम प्रशांत सागराचं तापमान सरासरीपेक्षा कमी राहतं.
या दोन्ही तापमानांतील फरकाचा परिणाम जगातील अनेक देशांना जाणवतो आणि त्याचे जगातील अनेक देशांवर कसे परिणाम होतात ते आपण पाहू. या परिणामाला एल निनो असं म्हणतात. याच्या उलट परिस्थिती काही वेळा निर्माण होते. व्यापारी वाऱ्याचा वेग वाढला, की प्रशांत सागरातील तापमान खाली येतं आणि त्याचेही पडसाद जगातील अनेक देशांतील हवामानावर उमटतात. अशा या एल निनोच्या अगदी उलट परिणाम देणाऱ्या प्रकाराला ‘ला नीना’ असं म्हणतात. जागतिक हवामानावर नुसते परिणाम करणारे नव्हेत तर अनेक वेळा जीवघेणा धुडगूस हे दोघे बहीण भाऊ घालतात आणि मग काही वेळा आकाशाकडे केविलवाण्या डोळ्यांनी पाहणारा शेतकरी, उन्हात होरपळल्यामुळे भेगाळलेली जमीन, घोटभर पाण्यासाठी वणवण भटकणारे स्त्री-पुरुष आणि त्यांच्या सोबतीला दर्दभऱ्या सुरात गाणारं व्हायोलिन, ही सगळी आपण पाहत आलेली चित्रं ही या एल निनोची देणगी असते. त्याच वेळी या एल निनोचं दुसरं रूप म्हणजे अतोनात पाऊस पडून हाताला आलेली पिकं वाहून जाणं, पुरानं भयावह परिस्थिती निर्माण होणं, अशीही करामत एल निनो करू शकतो. त्याच्या अशा या लहरी वागण्यामुळे दरवर्षी ख्रिसमसच्या आसपास सर्व देशांतील हवामानखाती ‘एल निनो’ आणि ‘ला नीना’चा वेध घ्यायला सुरुवात करतात. बरं हे एल निनो महाशय कसे वागतील हे कधीच नक्की सांगता येत नाही. एखाद्या वर्षी त्याच्या प्रभावानं दुष्काळ पडणार असं भाकीत केलं गेलं, की हे महाशय त्यावर्षी भरपूर पाऊस पाडून, तुमची कशी जिरवली असं सांगत निघून जातात. या एल निनोचे काही वेगवेगळे प्रकारही शास्त्रज्ञांनी अभ्यासले आहेत. त्यात पूर्व प्रशांत भागातला एल निनो आणि प्रशांत सागराच्या मध्यातला एल निनो दोन वेगवेगळे परिणाम दाखवतो. एकूण काय तर हवामानशास्त्रात ‘एल निनो’ आणि ‘ला नीना’चा प्रभाव हा एक अभ्यासाचा वेगळा विषय बनलाय.
ऑस्ट्रेलियात एल निनोचा परिणाम बऱ्याच वेळा अगदी टोकाचे परिणाम दाखवतो. १९९७-९८ साली विसाव्या शतकातला सर्वात ‘पावरफुल’ एल निनो इफेक्ट ऑस्ट्रेलियात पाहायला मिळेल आणि तिथं मोठा दुष्काळ पडेल, असं भाकीत केलं गेलं होतं. प्रत्यक्षात पावसाचं प्रमाण फक्त काही भागांतच कमी झालं. पूर्व ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियाच्या काही भागांत पाऊस कमी पडला, पण इतर ठिकाणी तो नेहमी इतकाच बरसला. तेच २००२-०३ च्या मोसमात तशा काही पूर्वसूचना फारशा नसताना सर्वात मोठा दुष्काळ पडला.
एल निनोमुळे पाऊस कमी पडून किंवा अतिवृष्टीनं फक्त दुष्काळच पडतो असं नाही. आणखी एक प्रकारे हे निनो महाशय छळतात. यामुळे डासांची उत्पत्ती वाढते आणि मलेरिया, डेंग्यूसारखे साथीचे आजार फैलावतात. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) केलेल्या पाहणीत असं आढळून आलं, की एल निनोचा प्रभाव असणाऱ्या वर्षात हे आजार पाचपट वाढतात. साचलेल्या पाण्यामुळे वाढणारी दलदल हेच या मागचं कारण असावं. पण व्हेनिझुएला आणि कोलंबिया या देशांनी तर याचा धसकाच घेतला आहे, कारण एल निनोचा फेरा येऊन गेला, की तिथे हे असे आजार ३०-४० टक्क्यांनी एकदम वाढतात.
बरं, हे एल निनो महाशय नुसत्या अशाच कुरापती काढतात असं नाही, तर ते देशादेशांमधल्या यादवी युद्धालाही कारणीभूत होतात असाही निष्कर्ष एका पाहणीत आढळून आला आहे. २०११ साली कोलंबिया विश्वविद्यालयाचे अर्थशास्त्रज्ञ सालोमनसिंग आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी १९५० सालापासून १७५ देशांत छेडल्या गेलेल्या तब्बल २३४ यादवी युद्धांचा मागोवा घेतला तेव्हा त्यांना असं लक्षात आलं, की यातली २० टक्के युद्धं ही एल निनोच्या काळात घडली आहेत. एल निनोच्या प्रभावानं पडणारा दुष्काळ आणि अन्न पाण्यासाठी झगडणारी जनता या युद्धांना मुख्यत्वे जबाबदार असावी असा निष्कर्ष त्यांनी काढला होता. १९८२-८३ साली अवतरलेल्या एल निनोनं इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियातील जंगलांना प्रचंड आगी लागल्या. ताहिती आणि हवाई बेटांवर संहारक वादळांनी खूप मोठं नुकसान केलं. पेरू आणि इक्वेडोर या देशांतील मासेमारीलाही खूप मोठा धक्का बसला आणि दक्षिण अमेरिकेत अनेक ठिकाणी महापूर आले त्यामुळे जीवित आणि वित्तहानीही प्रचंड प्रमाणात झाली.
अनेकदा एल निनो जाता जाता काही देशांना आशीर्वादही देतो. देशांची सुबत्ता ही त्याच्या जीडीपीच्या वाढीत मोजली जाते. २०१० साली एल निनोच्या प्रभावाखाली असताना अर्जेन्टिना या देशाचा जीडीपी १.०८ टक्क्यांनी वाढला, कॅनडाचा ०.८५ टक्क्यानं तर मेक्सिकोचा १.५७ टक्क्यानं वधारला होता. या मागच्या कारणांचा वेध घेतला तेव्हा, असा निष्कर्ष निघाला, की त्या वर्षात मेक्सिकोच्या किनाऱ्यावर धुमाकूळ घालणाऱ्या वादळांनी त्याकाळात विश्रांती घेतली होती. त्यामुळे तिथल्या खनिजतेलाच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली. तर तापमानात झालेली ही वाढ कॅनडाच्या मच्छीमारीला खूप मोठा हातभार लावून गेली होती. त्याचवेळी चांगला पाऊस पडल्यामुळे अर्जेन्टिनातील सोयाबीनचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. याचा मोठा परिणाम त्यांचं राष्ट्रीय उत्पन्न वाढण्यात झालं. हे वाचल्यावर तुम्हालाही वाटेल, की काहीवेळा आपत्तीलाही सुखाची किनार असू शकते. एल निनोचा आपल्या धरेवर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी आपण एकच करूया, निसर्गानं आपल्याला दिलेल्या देणग्या निसर्गानं आखून दिलेल्या मर्यादेतच वापरून आपल्या एकुलत्या एक पृथ्वीचं जतन करण्याची शपथ घेऊया!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link