Next
प्रतिसाद
प्रतिनिधी
Friday, March 29 | 04:00 PM
15 0 0
Share this story

युवकांसाठी अनमोल भेट
‘झी मराठी दिशा’ हे आठवडापत्र खरोखरच सर्वांसाठी ज्ञानाचे एक भांडार आहे. विशेषत: युवकांना सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, संस्कृती, मनोरंजन अशा सर्व क्षेत्रांतील मुद्देसूद व सखोल माहिती या आठवडापत्रातील विविध लेखांमधून मिळते. सध्याच्या मोबाइल व इंटरनेटच्या वाढत्या वापरात आपल्या वाचनसंस्कृतीचे महत्त्व या आठवडापत्राद्वारे युवकांना जाणवत आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. युवकांना हे आठवडापत्र म्हणजे एक अनमोल भेटच आहे.
 अमोल मांढरे, वाई, सातारा
-------------------------------

हे दुर्दैव, नाइलाज, की टाळण्याजोगे?
‘झी मराठी दिशा’च्या दि. २३ मार्चच्या अंकात गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांना श्रद्धांजली वाहणारे विविध लेख वाचले. मनोहर पर्रीकर, आर.आर. पाटील, विलासराव देशमुख, माधवराव शिंदे, राजेश पायलट, गोपीनाथ मुंडेे, वाय.एस.आर. रेड्डी, प्रमोद महाजन, इंदिराजी, राजीवजी अशी एक मोठी सर्वपक्षीय उभरत्या राजकीय नेतृत्वाची फळीच्या फळी अकाली काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यामागील कारणे विविध स्वरूपाची आहेत. त्यामुळे संबंधित कुटुंबांचे वैयक्तिक नुकसान होतेच, शिवाय देशाचेही अपरिमित नुकसान होतच असते. सर्वसामान्य माणसे याला केवळ नाइलाज किंवा दुर्दैव म्हणून पुढे जातील; परंतु राजकीय धुरीणांच्या हाती परिस्थिती घडवण्याची/बिघडवण्याची क्षमता असते. त्यांनी तरी याबाबत खोलात जाऊन वेगळा विचार केला पाहिजे. कर्करोगासारख्या दुर्धर रोगाचे प्रमाण लक्षणीयरीत्या का वाढते आहे? त्यावर फक्त आधुनिक उपचारांची ‘सुविधा’ निर्माण करायची की रोगाला प्रतिबंध होईल अशी परिस्थिती कठोरपणे (आणि कुठल्याही हितसंबंधांचा मुलाहिजा न ठेवता) निर्माण करायची?  सिक्कीमसारखे सेंद्रिय शेतीचे प्रारूप देशभर का असू नये? रस्ते/विमान अपघात का वाढत आहेत? नियम हे (स्वतःपासून सुरुवात करून) पाळण्याकरता असतात, मोडण्याकरता नसतात, अशी संस्कृती देशात निर्माण का होऊ नये? तात्कालीन राजकीय फायद्यापोटी निर्माण केलेला भस्मासूर पुढे स्वतःसह देशाचा घास घेऊ शकतो हे माहीत असूनही तो मोह टाळता का येऊ नये? सुरक्षेचे नियम मोडून लोकांत मिसळणे टाळता येणार नाही का? राजकीय नेतृत्वाने तरी या प्रश्नांकडे राजकारणाच्या पलिकडे जाऊन बघावे आणि परिस्थितीत सकारात्मक बदल करून भविष्यात हे टाळण्यासारखी परिस्थिती निर्माण करावी. निदान तसे प्रामाणिक प्रयत्न तरी करावेत, असे मनापासून वाटते.
- प्रसाद दीक्षित, ठाणे
-------------------------------

मनाला ‘नवा तजेला’ मिळतो
‘झी मराठी दिशा’चा शुभारंभाचा पहिला अंक सहज उत्सुकता चाळवली म्हणून विकत घेतला आणि चक्क त्याच्या प्रेमात पडलो तो आजतागायत! त्यातील विविध लेख, विविध विषयांवरील उपयुक्त माहिती, शब्द.. शब्द.., मिष्किली, शब्दसूर, साहसकन्या, कुतूहलकट्टा, तालासुरांशी गट्टी, संतप्रबोध, योग, ही वसुंधरा, शायरी प्रेमाची, अशी एक ना अनेक वाचनीय सदरे जणू वाचकांसाठी मेजवानीच असते. या मेजवानीची दर शुक्रवारी मी आतुरतेने वाट बघतो. विशेष म्हणजे सुरुवातीपासूनचे आतापर्यंतचे सर्व अंक मी जपून ठेवले आहेत. कधीही वाटले तर एखादा जुना अंक उघडून वाचतो आणि पुन:प्रत्ययाचा आनंद घेतो. खरोखरच, ‘नव्या तजेल्याचे हे आठवडापत्र’ मनाला उभारी देऊन ‘नवा तजेला’ देते हे मात्र नक्की.
- संजय भातखंडे, गोरेगाव
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link