Next
सीए सोडून रंगभूमीकडे
निपुण धर्माधिकारी
Friday, September 20 | 04:00 PM
15 0 0
Share this story

नमस्कार. ‘लूज कंट्रोल’ हे नाटक दीर्घांक म्हणून सादर करताना किती गाजलं होतं, याबद्दल मी मागच्या भागात सांगितलं. त्या नाटकाचं सगळ्या स्तरांवर कौतुक झालं. दिग्दर्शक म्हणून समीक्षकांनी, प्रसारमाध्यमांनी माझी खूप प्रशंसा केली होती, अक्षरशः पाठ थोपटली होती. त्यामुळे त्या नाटकाकडे अनेक निर्माते आकर्षित झाले. निर्मात्यांची रांग लागणं म्हणजे काय हे मी त्यावेळी अनुभवलं आहे.
माझ्या पहिल्याच नाटकाच्या बाबतीत हे सगळं घडून आल्यामुळे मीही खुश होतो. आपलं नाटक व्यायसायिक रंगभूमीवरही धुमाकूळ घालेल, भरपूर प्रसिद्धी मिळेल, नाटकाला पुरस्कार मिळतील, असं वाटत होतं. मी तेव्हा फक्त एकोणीस वर्षांचा होतो. त्यामुळे ‘एकोणिसाव्या वर्षी दिग्दर्शक म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण’ असं आपल्या बाबतीत म्हटलं जाईल वगैरे चित्र रंगवू लागलो होतो. परंतु ते नाटक व्यावसायिक रंगभूमीवर जबरदस्त आपटलं. म्हणजे असं आपटलं की त्याचं काही नामोनिशाणच उरलं नाही. अवघ्या चोवीस प्रयोगांत ते बंद पडलं. आज त्या अपयशाचा विचार करतो तेव्हा जाणवतं की मुळात त्या नाटकाचा जीव दीर्घांकापुरताच होता. व्यावसायिक नाटक करताना त्याची लांबी-रुंदी वाढवली, कलाकार बदलले आणि हे बदल करताना त्यातली मजाच निघून गेली. अर्थात हे तेव्हा लक्षात आलं नाही. अनुभवसुद्धा किती महत्त्वाचा असतो, हे आता लक्षात येतंय. त्या अनुभवावरून नाटकाकडे वेगळ्या दृष्टीनं बघण्याचीही गरज असते, हेही कळून चुकलं.
अपयश मिळालं असलं तरी पुढेही आपल्याला नाटक करायचं आहेच हे पक्क होतं. दरम्यान माझा सीएचा अभ्यास वाढू लागला. नाटक आणि अभ्यास या दोन्ही आघाड्या मी सांभाळत होतो. परंतु माझी आर्टिकलशिप सुरू झाली आणि वेळेची गणितं बिघडू लागली. म्हणजे सकाळी ऑफिसला जायची वेळ ठाऊक असायची, पण परत यायची वेळ ठाऊक नसायची. तरीही मी तालमी करत होतो. पण, मला नाटकांच्या स्पर्धेत आता अडकायचं नव्हतं. म्हणून मग कॉलेजमधून पासआऊट झाल्यावर ‘नाटक कंपनी’ या संस्थेची आम्ही स्थापना केली. मी, अमेय वाघ, पर्ण पेठे, आलोक राजवाडे, गंधार संगोराम असे आम्ही सगळे एकत्र होतो. त्या संस्थेतर्फे मी दोन-चार नाटकं केली, परंतु नंतर माझा आर्टिकलशिपचा व्याप कमालीचा वाढत गेला आणि तालमीला पोहोचणंसुद्धा मला अशक्य होऊ लागलं. एकदा तर मी अजिबातच तालमीला जाऊ शकलो नाही आणि ते मला खूपच लागलं. सीए फारसं आवडत होतं असं नाही, परंतु आर्टिकलशिप पूर्ण करायची हे ठरवलं होतं. ते पूर्ण होताच मी आई-बाबांना एकदाचं सांगून टाकलं, की ‘हे जे मी करतोय ते मला आवडत नाहीये. मला पूर्णवेळ नाटकच करायचं आहे.’ अर्थात त्यांनी अगदी सहज मान्य केलं असं नाही. बरेच दिवस त्यावर चर्चा चालली होती. शेवटी त्यांनी माझं म्हणणं मान्य केलं. दरम्यान ‘लूज कंट्रोल’ या नाटकाचे प्रयोग लंडनमध्ये सादर करण्याची संधी चालून आली आणि आम्ही थेट लंडन गाठलं. पहिल्यांदा मी परदेशात गेलो तो नाटकामुळे. तिथे वीकेंडला प्रयोग होणार होते. मग तोपर्यंत मी आणि अमेयनं तिथल्या रंगभूमीवरची नाटकं पाहिली आणि आम्ही अवाक् झालो. कक्षा रुंदावल्या म्हणतात ना, तसं काहीसं झालं आणि चौकटीबाहेरचं एक जग आम्हाला दिसलं. आम्ही तिकडून परतलो तो एक नवा विचार घेऊन. नाटकाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळाली होती. अखेर २०११ साली मी सीए विषयाला रामराम ठोकला. ते ऑफिसही सोडलं आणि त्यानंतर दोन-चार दिवसांतच मला राहुल देशपांडेचा फोन आला. त्यानं ‘संगीत संशयकल्लोळ’ नाटक दिग्दर्शित करशील का, असं विचारलं. माझ्यासाठी ती सुवर्णसंधी होती आणि साक्षात राहुल विचारतोय म्हटल्यावर मी लगेच होकार कळवला. ते पाच अंकी नाटक मी दोन अंकांत बसवलं. राहुलनं मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. तो माझ्यापेक्षा वयानं, अनुभवानं, कीर्तीनं मोठा असला तरी आमच्या विचारांच्या तारा जुळल्या आणि संगीत नाटकांच्या दिग्दर्शनाचा माझा प्रवास राहुलसारख्या जाणकार मित्राबरोबर सुरू झाला. त्या प्रवासात मग ‘संगीत मानापमान’, ‘संगीत सौभद्र’ अशा क्लासिक नाटकांची भर पडत गेली. याच नाटकांमधून मला माझी सहधर्मचारिणी संहिता चांदोरकरही भेटली. या नाटकांमुळे दिग्दर्शक म्हणून माझ्याकडे पुन्हा पाहिलं जाऊ लागलं. या संगीत नाटकांमध्ये मी अनेक नवीन तांत्रिक प्रयोग करून पाहिले आणि ते प्रेक्षकांना आवडू लागले. पारंपरिक नाटकं आम्ही आधुनिकतेची जोड देऊन सादर केली. हे सगळं सुरू असतानाच हिंदीत रमेश सिप्पी यांच्या ‘नौटंकी साला’ या चित्रपटाचं सहलेखन करण्याची संधी मला मिळाली आणि माझा चित्रपटक्षेत्रात प्रवास सुरू झाला. दरम्यान ‘हायवे’ या मराठी चित्रपटातही मला काम करण्याची संधी मिळाली आणि चित्रपट हे माध्यम खुणावू लागलं. त्याच दरम्यान मी ‘रारंगढांग’ कादंबरीवरील ऑडिओ बुकसाठी काम केलं. नाटकाव्यतिरिक्त मी इतर माध्यमांमधून स्वतःला आजमावून बघत होतो, कथा सांगण्यासाठी विविध माध्यमांचा आधार घेत होतो. परंतु आणखी एक ठोस काहीतरी करायला हवंय, हा विचार डोक्यात घोळत होता. कार्यक्षेत्र निश्चित करायचं तर दिग्दर्शनावरच आपण लक्ष केंद्रित करावं, असं मी ठरवलं. कारण ते मला जास्त आवडत होतं. एक अभिनेता म्हणून मला माझी मर्यादा माहीत होती. अभिनेता म्हणून टाइपकास्ट होण्यापेक्षा जे आवडतंय ते करूया इथपर्यंत मी येऊन पोहोचलो. ‘हायवे’ चित्रपट झाल्यानंतर मला गिरीश कुलकर्णी यांचा फोन आला आणि त्यानं एक कथा सांगितली. त्यावर चित्रपट करायचा असं ठरवून त्यानं दिग्दर्शनाची जबाबदारी माझ्या खांद्यांवर टाकली, तो चित्रपट होता ‘धप्पा.’ दिग्दर्शक म्हणून माझा पहिला चित्रपट. त्याविषयी आणि तिथून पुढच्या कारकिर्दीविषयी पुढच्या भागात...
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link