Next
काेल्हापूरचे एक्के
रविराज गायकवाड
Friday, October 12 | 03:00 PM
15 0 0
Share this storyकोल्हापूरचे खेळाडू केवळ करवीरनगरीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मैदानं गाजवली आहेत. या यादीत रिची फर्नांडिस, सुरेश मंडलिक, शिवाजी पाटील, विजय कदम, किशोर खेडकर, कैलास पाटील, विश्वास कांबळे, अकबर मकानदार, सुधाकर पाटील, विक्रम पाटील अशा अनेक ज्येष्ठांची नावं घेता येतील. उदयोन्मुख खेळाडूंमध्ये अनिकेत वरेकर आणि प्रवीण कणसे यूथ ड्रिम क्लबकडून सध्या जर्मनीमध्ये खेळत आहेत. १७ वर्षांखालील वर्ल्डकप फूटबॉलमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेल्या अनिकेत जाधवनंही लक्ष वेधून घेतलं आहे. आता यंदाच्या इंडियन सुपर लीगमध्ये सुखदेव पाटील (दिल्ली डायनामोज) आणि निखिल कदम (नॉर्थ ईस्ट युनायटेड) हे दोन कोल्हापूरचे एक्के मैदानावर वेगळी छाप पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत.

दिल्ली डायनामोजचं ‘नाक’ असं म्हणतात, की गोली हे संघाचं नाक असतं. नाक जेवढं देखणं तेवढं व्यक्तिमत्त्व खुलून दिसतं. तसंच गोलकीपरच्या परफॉर्मन्सचा संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा असतो. यंदाच्या इंडियन सुपर लीगमध्ये एक गोलकीपर कोल्हापूरचं आणि महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणार आहे. त्याचं नाव आहे सुखदेव पाटील. सुखदेव हा कोल्हापूरच्या गुणी खेळाडूंपैकी एक. पेनल्टी स्पेशालिस्ट अशीही त्याची ओळख आहे. सहा फूट दोन इंच उंच असलेला जिगरबाज सुखदेव गोलपोस्ट पुढे उभा राहिला, की पेनल्टी मारणाऱ्याचा निम्मा आत्मविश्वास गळून जातो.

सुखदेव यंदा तिसऱ्यांदा इंडियन सुपर लीगमधून खेळणार आहे. सुरुवातीला एफसी गोवा आणि गेल्या वर्षीपासून दिल्ली डायनामोजचं तो प्रतिनिधित्व करतोय. सध्या भारतीय फूटबॉल टीमचा तो सेकंड गोलकीपर आहे. मात्र आयएसएलमध्ये तो दिल्ली डायनामोजचा आधारस्तंभ आहे. भारतीय संघातून खेळताना मिळणाऱ्या अनुभवाचा आयएसएलमध्ये फायदा होईल, असं सुखदेवला वाटत आहे.

कागल तालुक्यातील वाळवे खुर्द इथं जन्मलेल्या सुखदेवनं २००७मध्ये पुण्याच्या क्रीडाप्रबोधिनीत प्रवेश मिळवला. शालेय राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धेत विविध विजेतेपदं मिळवून देण्यात गोलरक्षक सुखदेवनं महत्त्वाची भूमिका बजावली. सुखदेव आयएसएल खेळणारा कोल्हापूरचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे कोल्हापूरकरांचं अधिक लक्ष असतं. गोव्याकडून खेळताना तो अगदीच नवखा होता. सामन्यात मैदानावर उतरायची संधी फारशी मिळाली नाही. पण, दिल्ली डायनामोजकडून खेळताना मुख्य गोलकीपर म्हणून सुखदेव मैदानात उतरतो. जर्मनीचा गोलकीपर मॅन्युएल न्यूअरला तो त्याचा आयडॉल मानतो.
सुखदेवला व्यावसायिक फूटबॉलचे दरवाजे खूप लवकर उघडले. आयएसएलमधील गोवा एफसी आणि दिल्ली डायनामोज तर आहेच, शिवाय डीएसके शिवाजीयन्स, मिनेरवा अॅकॅडमी आणि ओएनजीसीकडूनही सुखदेव फूटबॉलच्या मैदानात उतरला आहे. विशेष म्हणजे, १९ आणि २३ वर्षांखालील भारतीय फूटबॉलसंघातही सुखदेवचा समावेश होता. आता तो भारताच्या मुख्य फूटबॉलसंघाचा घटक आहे. भारतीय संघासोबत सुखदेव ऑस्ट्रेलियाला गेला होता. वीस दिवसांच्या दौऱ्यात भरपूर सामने खेळता आल्यानं चांगला अनुभव मिळाल्याचं सुखदेव सांगतो. विदेशातील व्यवसायिक फूटबॉलसंघांशी खेळताना व्यावसायिक फूटबॉल आणखी जवळून कळतो. त्याचा फायदा आम्हाला सॅफ इंटरनॅशनल स्पर्धेत झाला. बांगलादेशमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला होता. मालदिवविरुद्ध १-२ असा पराभव स्वीकारावा लागला असला, तरी उपविजेतेपदही आत्मविश्वास वाढवणारं आहे, असं त्याला वाटतं. सुखदेवसह भारतीय संघातले चार खेळाडू दिल्लीच्या संघात आहेत. त्यामुळे आमच्या संघाचं पारडं थोडं जड आहे, असा दावा सुखदेवनं केलाय.

‘नॉर्थ ईस्ट युनायटेड’चे ‘विंग्ज’
फूटबॉलची थोडीफार जाण असलेल्या प्रत्येकाला मोहन बागान क्लब माहीत असतो. कोलकात्यातील हा क्लब देशातील सर्वांत जुन्या क्लबपैकी एक. या क्लबपर्यंत पोहोचणं अनेक फूटबॉलपटूंना शक्य झालं नाही, पण कोल्हापूरच्या निखिल कदमनं एक वर्ष या संघाचं प्रतिनिधित्व करून स्वतःला वेगळ्या उंचीवर नेलं. गेल्या वर्षी आय लीगमध्ये निखिल मोहन बागानकडून खेळला आणि त्या फरफॉर्मन्सच्या जोरावर या वर्षी तो इंडियन सुपर लीग खेळतोय. निखिलचा खेळ पाहून त्याला सुपर लीगसाठी अनेक संघांकडून ऑफर होती. अखेर गुवाहाटीच्या नॉर्थ ईस्ट युनायटेड क्लबकडून मैदानात उतरण्याचं त्यानं निश्चित केलं. सीझनमधील आणि आयएसएलच्या पहिल्याच सामन्यात निखिलला इमर्जिंग प्लेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यामुळे कोल्हापूरच्या मातीतला हा रांगडा गडी यंदाच्या सीझनमध्ये धुमाकूळ घालणार असं दिसतंय.

मुळात फूटबॉल हा निखिलच्या रक्तातच आहे. वडील सुरेश कदम कोल्हापुरात एसटीच्या संघाकडून खेळायचे, तर काका राजेंद्र कदम यांनी कोल्हापूर पोलिस, महाराष्ट्र पोलिस आणि शिवाजी तरुण मंडळ या संघांचं प्रतिनिधित्व केलं. निखिल घडला काकांच्या तालमीतच. त्यांच्या हाताला धरून मैदानात जाताना निखिलला खेळाची गोडी लागली. आज, मी जे काही आहे, ते काका आणि वडिलांमुळे असं निखिल सांगतो. फूटबॉलमधील निखिलची गोडी लक्षात आल्यानंतर त्याला पुण्यातील क्रीडाप्रबोधिनीमध्ये पाठवण्यात आलं. तिथे निखिलमधून त्याच्यातला व्यावसायिक फूटबॉलपटू घडला.

फूटबॉलमध्ये दोन्ही पायांनी त्यात ताकदीनं किक मारणं, काहीसं अवघड असतं. पण, निखिलनं हे अवघड सोपं करून दाखवलंय. मेस्सीला आदर्श मानणारा निखिल डावखुरा आहे. पण, संघात विंगर म्हणून तो उडव्या आणि डाव्या दोन्ही बाजूंनी खेळू शकतो. हीच त्याच्या खेळाची ताकद आहे. त्यामुळे संघातील इतर दहा खेळाडूंमध्ये तो वेगळा ठरतो.

क्रीडाप्रबोधिनीनंतर पुणे एफसीकडून खेळताना निखिलनं संघाला अनेक सामने एकहाती जिंकून दिले. आय लीगच्या एका सीझनमध्ये तर सर्वाधिक सहा गोल निखिलच्या नावावर होते. त्यानंतर डीएसके शिवाजीयन्स, मुंबई एफसी असा प्रवास करत तो मोहन बागानमध्ये दाखल झाला. या क्लबकडून खेळाताना तेथील समर्थकांनी निखिलला अक्षरशः डोक्यावर घेतलं. कोलकात्यातील तो सगळा अनुभव खूपच वेगळा असल्याचं निखिल सांगतो. तो म्हणाला, ‘मोहन बागाननं मला लोकप्रियता मिळवून दिली. तिथल्या प्रत्येक सामन्यागणिक माझा अनुभव वाढत गेला. मोहन बागानसारख्या व्यावसायिक क्लबकडून खेळण्याची संधी खूपच मोठी होती. गेल्या वर्षी मोहन बागानविरुद्ध ईस्ट बंगाल हा सामना मी खेळलो. हे दोन्ही क्लब एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी. पण, सामन्यानंतर ईस्ट बंगालच्या काही समर्थकांनी माझी प्रत्यक्ष भेट घेऊन कौतुक केलं. हे माझ्यासाठी खूपच वेगळं होतं.’ सुपर लीगसाठी आमच्या संघाची तयारी खूप चांगली झाली आहे. गुवाहाटीमध्ये आमचा प्री टूर्नामेंट कॅम्प झाला. आयएसएलमध्ये गोव्याविरुद्ध पहिला सामना बरोबरीत सुटला. मला अॅवॉर्ड मिळालं असलं, तरी अजून खूप सामने आहेत आणि गाजवायचे आहेत, असं निखिलनं सांगितलं.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link