Next
नाशिकची मुलगी
प्रतिनिधी
Friday, October 04 | 02:00 PM
15 0 0
Share this story


नमस्कार. राधिकेच्या भूमिकेतून मी तुमच्याशी रोजच बोलते. आज मी बोलणार आहे ती अनिता म्हणून. मी मूळची नाशिकची. माझं शालेय-महाविद्यालयीन शिक्षणही नाशिकमध्येच झालं आणि नाटकाचे किंवा अभिनयाचे पहिले संस्कार झाले तेही नाशिकमध्येच.
माझे बाबा नरेंद्र दाते आणि काका उपेंद्र दाते हे दोघंही उत्तम अभिनेते. बाबा बँका, एसटी महामंडळ वगैरे संस्थांची नाटकं बसवायचे. राज्य नाट्यस्पर्धा, कामगारस्पर्धा त्यावेळी जोरात असायच्या. माझ्या लहानपणी नाशिकमध्ये गणेशोत्सवात चांगली नाटकं सादर व्हायची. बाबा त्यात भूमिकाही करायचे. त्यामुळे लहानपणापासूनच बाबांनी बसवलेली किंवा त्यांनी अभिनय केलेली नाटकं मी पाहत आले आहे. माझे काका म्हणजे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र दाते. ते व्यावसायिक रंगभूमीवर काम करायचे. त्यामुळे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘गरूडझेप’ अशी ऐतिहासिक नाटकं मी लहानपणीच बघितली होती. त्या नाटकांच्या  तालमी बघायला जायचे आणि मला ते सगळं वातावरण फार आवडायचं. माझं पाठांतरही चांगलं होतं, त्यामुळे एकदा ऐकलं की मी हुबेहूब म्हणून दाखवायचे. मात्र कुणाच्या समोर वगैरे करून दाखव म्हटलं की लाजायचे. पूर्वी रात्री नऊ-साडेनऊला नाटकं सुरू व्हायची. त्यामुळे जेमतेम एक अंक बघून व्हायचा आणि झोप यायची. तरीही आई-बाबा नाटकांना घेऊन जायचे. त्यांनी आम्हाला खूप नाटकं दाखवली. त्यावेळी मला वंदना गुप्ते खूप आवडायच्या. त्यांची सगळी नाटकं मी पाहिलेली आहेत. साहित्यमूल्य चांगलं असलेली, चांगले अभिनेते असलेली नाटकं मला बघावीशी वाटायची. नाटकांचा कधी कंटाळा यायचा नाही. कळायचं कितपत माहीत नाही, परंतु नाटक आवडायचं हे नक्की. तशीच नृत्याचीही आवड होती, म्हणून नृत्य शिकायला जायचे. ‘परफॉर्मन्स’ तोपर्यंत मला चांगला कळायला लागला होता. त्यातली गंमत मला कळली होती.
तेव्हा बॉलीवूडच्या गाण्यांवर रेकॉर्ड डान्स हा प्रकार खूप प्रसिद्ध झाला होता. मला ती नृत्यं जमायची नाहीत, परंतु त्रिताल मी एक वर्ष गिरवला. त्या गाण्यांवरची नृत्यं मला जमतील, या आशेवर मी ते करत राहिले. हे सगळं करताना रियाज लागतो, परफॉर्मन्सच्या मागे खूप मेहनत असते हे मला कळलं होतं.
शाळेमध्ये अनेक विद्यार्थी असतात आणि त्यात जे स्मार्ट असतात ते भराभर परफॉर्मन्स करून दाखवतात. मात्र माझं तसं नव्हतं. माझ्या चेहऱ्याकडे बघितल्यास ‘हिला जमेल की नाही’ अशी शंका लोकांना यावी,  असा माझा चेहरा असायचा. त्यामुळे शाळेतल्या कार्यक्रमांमध्ये मी फारशी नसायचे. शाळेकडून कुठल्या स्पर्धेला पाठवायचं असेल आणि अगदीच कुणी नसेल तर माझा विचार व्हायचा. परंतु यादरम्यान मी इतकी नाटकं बघत होते की मला माहीत होतं, की परफॉर्मन्सची वेळ येईल तेव्हा मला हे नक्कीच जमेल.
नाशिकमध्ये तेव्हा ‘नाट्यवाचनस्पर्धा’ व्हायची. मी सातवीत असताना त्या स्पर्धेत भाग घेतला होता आणि मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. ते बक्षीस मला पहिल्यांदा आत्मविश्वास देणारं ठरलं. तेव्हा आजूबाजूची सगळी मुलं सगळंकाही करत होती. मीसुद्धा नृत्याबरोबर जिम्नॅस्टिकला जायचे, कबड्डी खेळायचे, पण अभिनयाचं काय करायचं हे माहीत नव्हतं. माझ्या आईला वाटायचं मी गाणं शिकावं म्हणून ती मला गाण्याच्या क्लासलाही घेऊन गेली होती, पण एवढं सगळं एकदम कसं जमणार म्हणून मी गाणं शिकले नाही.
बारावीत असताना मी पहिल्यांदा राज्यनाट्यस्पर्धेत भाग घेतला. त्याआधी एकदा बाबांनी मला त्यांच्या एका नाटकात घेतलं होतं. रवींद्र ढवळे नावाचे एक नाशिकमधील मोठे दिग्दर्शक होते. त्यांनी योगेश सोमण यांची ‘बेबी बर्थ’ नावाची एकांकिका केली होती आणि त्यात मला त्या ‘बेबी’ची भूमिका दिली होती. तेव्हा मी सहावीत होते. मी ती भूमिका खूप चांगली केली होती, अशा प्रतिक्रिया आल्या. मघाशी म्हटलं त्याप्रमाणे, माझ्या चेहऱ्यावरून असं वाटायचं नाही की ही काही बरं करेल. परंतु मला ते जमायचं आणि आपल्याला हे जमणार आहे हे मला पक्कं ठाऊक असायचं. मला आतून विश्वास वाटायचा, पण लोकांना काही माझ्याबद्दल विश्वास वाटायचा नाही. कॉलेजला गेल्यावर मला कळलं की लोकांना आपल्याबद्दल तेव्हाच विश्वास वाटेल जेव्हा माझ्या आतला आत्मविश्वास माझ्या चेहऱ्यावर किंवा माझ्या कामातून दिसेल. मग मी स्वतःवर त्यादृष्टीनं काम करायला सुरुवात केली आणि हळूहळू बाहेरच्या नाटकांमधून कामं केली. आपल्या कामाला एक अधिष्ठान हवं, एक पक्की बैठक असायला हवी हे जाणवलं. नाटकात काम करणं जमलं नाही तरी आपल्याला नाटकाचा अभ्यास करता आला पाहिजे, आपल्याला त्या कलाकृतीचा आनंद लुटता आला पाहिजे, रसग्रहण करता आलं पाहिजे, कौतुक करता आलं पाहिजे, नाटकाबद्दल लिहिता आलं पाहिजे, समीक्षा करता यायला हवी, असं सतत वाटायचं.
मी नाट्यपरिषदेच्या नाशिक शाखेमध्ये लेखापाल म्हणून पार्टटाइम नोकरी करत होते. महाकवी कालिदास नाट्यगृहात आमचं कार्यालय होतं. वेळ मिळेल तेव्हा मी बाल्कनीत जाऊन बसायचे आणि जो कोणता कार्यक्रम लागला असेल तो बघायचे. लावणीचा कार्यक्रम असेल तर लावण्या बघायचे. त्यामुळे मला नाटकं बघायची सवय लागली. नाशिकमध्ये अधृंटकर नावाची एक मोठी व्यक्ती होऊन गेली. त्यांना कलेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी होती. ते वारल्यानंतर ‘नाटक’ नावाचं एक त्रैमासिक सुरू करण्यात आलं, ज्यात कलेच्या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींच्या दीर्घ मुलाखती छापून यायच्या. सत्यदेव दुबे, विजया मेहता, अरविंद देशपांडे यांच्या मुलाखती वाचल्यानंतर त्यात त्यांनी जे म्हटलेलं असायचं, ते मी शोधायचे. त्यावेळी सायबर कॅफे नुकतेच आले होते. तिकडे जाऊन मी इंटरनेटवर ते संदर्भ शोधायचे. त्यातून वेगवेगळ्या शैली, पद्धती, वेगवेगळी नाटकं कळायला लागली आणि मग आपण याचाच अभ्यास करावा या निर्णयापर्यंत मी येऊन पोचले. हा माझ्या आयुष्यातील अभिनयाच्या प्रवासाचा पहिला टप्पा होता. आई-बाबांबरोबर नाटकं पाहणारी छोटी अनिता आता याच क्षेत्राचा अभ्यास करायचा हा विचार करून पुण्याच्या ललित कलाकेंद्रात दाखल झाली. नाटकाचा शास्त्रोक्त अभ्यास करायचा हेच डोक्यात होतं. ही थोड्याच दिवसांत परत येईल, असंच आई-बाबांना वाटत होतं, पण तसं झालं नाही. ललित कलाकेंद्रात प्रवेश घेतल्यावर मी तिथे काय शिकले, कशी घडले याची गोष्ट वाचा पुढील भागात...
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link