Next
घरचे अन्न - केव्हाव्ही, कुठेही!
पल्लवी मुजुमदार
Friday, August 02 | 03:00 PM
15 0 0
Share this story

“मी ८५ वर्षांची आहे, माझ्या हातच्या पुरणपोळ्या माझ्या मुला-नातवडांना खूप आवडतात. ते  दीर्घकाळ टिकावे, यासाठी काय करता येईल?” असा एक प्रश्न विचारला जातो. 

“हो, प्रयत्न चालू आहेत,” डॉ. वैशाली बांबोले हसत उत्तरतात आणि ऎकणाऱ्यांच्या भुवया उंचावतात. 

डॉ. वैशाली बांबोले सांगायला लागतात- “इलेक्ट्रोनिक बीम रेडिएशन या तंत्रज्ञानाचा वापर करून धान्य, मसाले यांची साठवणूक पूर्वीपासून होते आहे.  घरगुती पातळीवर शिजलेले अन्न वाया जाऊ नये, ते टिकावे यासाठी आपण ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो. शिवाय, लोणच्यात तेल, व्हिनेगर  किंवा तत्सम पदार्थ वापरून त्याची साठवणूक केली जाते. मात्र मोठ्या प्रमाणात अन्न टिकवण्यासाठी काही आधुनिक पद्धती वापरल्या जातात. 

प्रा. डॉ. वैशाली बांबोले या मुंबई विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.  ‘Extended shelf life of ready to eat  food’ - ‘तयार खाद्यपदार्थांचा टिकाऊपणा’ हा विषय त्यांनी अभ्यासाला आहे. पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ अभ्यासातून डॉ. वैशाली बांबोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबतचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. त्यामुळे शिजवलेले अन्न कित्येक वर्षांपर्यंत वापरात येऊ शकते. इलेक्ट्रॉनिक बीम रेडिएशन या तंत्रज्ञानाचा वापर पहिल्यांदाच शिजवलेल्या अन्नावर  केला गेला. यामुळे, अन्नाचे ‘शेल्फ लाइफ’ वृद्धिंगत झाले आहे. भारतातल्या पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थांना आधुनिक व परदेशी रेडी टू इट खाद्यपदार्थांची मोठी स्पर्धा आहे. पोषणमूल्ये, प्रथिने, तंतुमय पदार्थ, फॅट्स यांचा समतोल राखलेले भारतीय पदार्थ जर या तंत्राने साठवले गेले तर ते सर्वार्थाने फायद्याचे होऊ शकेल, या विचाराने डॉ. वैशाली यांनी हा अभ्यास करण्याचे ठरवले.   

डॉ. वैशाली यांनी या संशोधनाचा विषय The Board of Research in Nuclear Sciences (BRNS) यांच्या समितीसमोर मांडला.  राष्ट्रीय पातळीवरील समितीला या उपक्रमात वेगळेपणा  आणि उपयुक्तता असल्याचे जाणवले.  त्यांनी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीचा वापर करत डॉ. वैशाली यांनी मुंबई विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात बायोनॅनो प्रयोगशाळा उभी केली. तिथे काही भारतीय पदार्थांवर प्रयोग सुरू झाले.  पुरणपोळी, ठेपले, उपमा, व्हेज बिर्यानी या भारतीय खाद्यपदार्थांवर हा प्रयोग सुरू झाला. प्रथिनेयुक्त पदार्थांपेक्षा  कार्बोहायड्रेट आणि तंतुमय पदार्थांना हा प्रयोग अधिक चांगल्या प्रकारे दाद देत असल्याचे लक्षात आले. 

डॉ. वैशाली यांनी सांगितले, समजा या तंत्राने इडली टिकवण्याचे ठरवले तर तांदूळ ठरावीक प्रकारचे घेऊन त्याचे विशिष्ट प्रकारे पीठ तयार करणे आवश्यक आहे.  तयार झालेली इडली विशिष्ट प्रकारच्या पॅकेट्समध्ये पॅक करावी लागते. त्यांनतर घातक (फूड स्पॉइलिंग) बॅक्टेरिया अर्थात, अन्नपदार्थाना नासवणारे बॅक्टेरिया निर्माण होऊच नयेत म्हणून त्यांची पाळेमुळेच नष्ट केली जातात. नाशवंत करणारे बॅक्टरिया यात मारले जातात, तरी इडलीतले अणूरेणू मात्र विस्कळीत होत नाहीत. अशा विशिष्ट प्रकारे साठवलेली इडली सुमारे १००० दिवस उत्तम राहिल्याचे लक्षात आले.  या  तंत्रज्ञानाच्या वापरासाठी फार जास्त खर्च येत नाही. थोडक्यात काय तर फ्रोझन पदार्थांपेक्षाही याचा खर्च कमी आहे, तसेच या तंत्राचे साइड इफेक्ट नाहीत. FSSAI आणि इतर अन्नसुरक्षा मानांकनांनीही या तंत्रज्ञानाला मान्यता दिलेली आहे, असेही डॉ. वैशाली नमूद करतात.   

ही संपूर्ण प्रणाली, ती प्रक्रिया, पदार्थ दीर्घकाळ टिकणे या पद्धतीचे पेटंट आणि हक्कही डॉ. वैशाली यांनी घेतलेले आहेत. भारतीयांसाठी ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे!  

आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील या प्रयोगाची दखल घेतलेली आहे. मांसाहारी पदार्थांचे अधिक सेवन अमेरिकेत होत असल्याने लाल मांस आणि तत्सम मांसाहारी पदार्थ किमान दोन महिने टिकावेत, यासाठी त्यांच्याकडे खास विचारणा होत आहे. दुग्धजन्य उत्पादनासाठी नेदरलँडनेही या तंत्रज्ञानाबाबत उत्सुकता दाखवली आहे. आता, आंतरराष्ट्रीय पेटंटसाठीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.    

या मोहिमेच्या यशस्वितेचे श्रेय डॉ. वैशाली त्यांच्या टीममधील सहकारी सिम्मी, मनोज, डॉ. के एस शर्मा, सुयोग जामदार या वैज्ञानिकांच्या नोंदींनाही देतात. मुंबई विद्यपीठाने यासाठी इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर उपलब्ध करून दिल्याचे त्या आवर्जून नमूद करतात.  

भारतीय कंपंन्यांसाठी हे तंत्रज्ञान त्यांनी सहज उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. यात उच्च पातळीवरील ऊर्जा समाविष्ट असल्याने, यासाठी Atomic Energy Regulatory Board यांची परवानगी घेणे क्रमप्राप्त आहे. यानंतर  एक एकर जागेमध्ये प्लांट टाकता येणे शक्य असल्याचे त्या सांगतात. जगाला अन्नपुरवठा करण्यात भविष्यात भारत अग्रणी देश असेल, त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर उपयुक्त ठरू शकतो, असे डॉ. वैशाली यांना वाटते. 

या तंत्रज्ञानाने टिकवून ठेवलेले पदार्थ भारतीयांना जगभरात कुठेही, कोणत्याही वेळी खाता येतील. दुर्गम सीमाभागात तैनात असलेल्या जवानांसाठी पाठवता येतील. आपत्कालीन किंवा युद्धजन्य परिस्थितीतही ही फूड पॅकेट्स उपयुक्त ठरू शकतील. लिची, आंबा अशा ठरावीक ऋतूत मिळणाऱ्या फळांच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद केव्हाही घेता येऊ शकेल. 

आपले संशोधन रोजच्या वापरातले असावे, या ईर्ष्येने डॉ. वैशाली यांनी हे संशोधन सुरू केले.  सध्या जरी हे तंत्रज्ञान औद्योगिक पातळीवर वापरणे शक्य असले तरी ते जास्तीत जास्त प्रमाणात वापरले जावे, असे त्यांना वाटते. या तंत्रामुळे सैनिक, अंतराळवीर, गिर्यारोहक, परदेशात  शिकणारे विद्यार्थी यांना ‘घर का खाना’ उपलब्ध होऊ शकेल, हा विश्वास डॉ. वैशाली व्यक्त करतात.  संस्कृती आणि विज्ञान यांचा मेळ घालत विकसित केलेले हे तंत्रज्ञान आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link